जगाने यापेक्षाही भयंकर महामारीसाठी तयार रहावं; WHO प्रमुखांचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 September 2020

देशांनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी, असंही who ने म्हणाले आहेत. 

जिनिव्हा- सध्या जगभरात कोरोना महामारी थैमान घालत आहे. मात्र, जगाने यापेक्षाही भयंकर महामारीसाठी तयार राहायला हवं, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेस World Health Organization chief Tedros Adhanom Ghebreyesus यांनी केलंय. जिनिव्हा येथील एका परिषदेत ते बोलत होते. देशांनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी, असंही ते म्हणाले आहेत. 

कोरोना महामारीपुढे सर्व देश हतबल होताना दिसत आहेत. अनेक देशांना या विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे. मात्र, ही महामारी शेवटची नाही. यापुढे जगाला यापेक्षाही भयंकर महामारीला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा टेड्रोस यांनी दिला आहे. महामारी येणे आणि जाणे हे मानवी जीवनाचा भाग असल्याचे आपल्याला इतिहासाने शिकवले आहे. त्यामुळे पुढील महामारीसाठी आपण तयार राहायला हवं. आज आपण जितके तयार आहोत, त्यापेक्षा अधिक तयार राहायला हवं, असंही ते म्हणाले आहेत.

कोरोना झालेल्या 18 दिवसांच्या बाळाला जन्मदात्यांनी सोडलं मृत्यूच्या दारात;.

जगभरात कोरोना महामारीने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात २.७२ कोटींपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर आतापर्यंत जगभरात ८,८८,३२६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिला कोरोनाबाधित रुग्ण चीनच्या वुहान प्रांतात डिसेंबर २०१९ मध्ये सापडला होता. त्यानंतर जगभरात या विषाणूने हातपाय पसरले आहेत. तेव्हापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच गेली आहे.

दरम्यान, भारतामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देशात ४२ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत ७२ हजारांपेक्षा अधिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ९० हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने नुकतेच ब्राझीलला मागे टाकले. आता आपल्यापुढे केवळ अमेरिका आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांच्या पुढे आहे. देशात कोरोनाबाधित रुग्ण वाढीचा दर असाच सुरु राहिल्यास भारत पुढील काही आठवड्यात अमेरिकेला मागे टाकेल.

(edited by- karti pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Must Be More Ready For Next Pandemic Than It Was This Time said who