World No Tobacco Day: माझे नाव आनंद, खऱ्या अर्थाने घरी आनंद आला... l World No Tobacco Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World No Tobacco Day

World No Tobacco Day: माझे नाव आनंद, खऱ्या अर्थाने घरी आनंद आला...

कोल्हापूर : दिवसभरात सात-आठ गुटख्याच्या पुड्या, चार-पाच सिगारेट आणि अधूनमधून तंबाखूची (Tobacco) गोळी तोंडात असायची. घरी माहीत होते; पण उघड नव्हते. कधी तर बाजूला जाऊन तंबाखू खाताना लहान मुलगी जवळ यायची तेव्हा तिची नजर चुकवायचो. तीही ‘‘बाबा, हे बरं नव्हे’’ म्हणायची. तरीही माझ्यात बदल होत नव्हता. एके दिवशी सागर वासुदेव हा मित्र एका ऑफिसजवळ भेटला. तोंडातील तंबाखू पाहून तो अवाक् झाला. तेथेच त्याने तासभर ‘बी पॉझिटिव्ह’ पद्धतीने समुपदेशन (Counseling)केले.

व्यसन शरीराला नव्हे, तर मनाला लागलेले असते. ते सोडवायचे आपल्या हातात असते, यासह प्रबोधन करून माझ्या हातात त्याने लवंगा ठेवल्या आणि काय बदल झाला मलाच कळाला नाही. मी माझ्या खिशात असलेल्या पुड्या थेट समोरील डस्टबिनमध्ये टाकल्या. मी चूळ भरण्यासाठी गेलो असतानाच सागरने त्या पुड्या आपल्याकडे काढून घेतल्या. थोड्याच वेळात सागरच्याच गाडीवरून शहरात फेरफटका मारला.

शेवटी एका सार्वजनिक मुतारीच्या ठिकाणी थांबविले. डस्टबिनमध्ये घेतलेल्या पुड्या सागरने हातात दिल्या आणि टाकून देण्यास सांगितले. मी त्या पुड्या टाकल्या आणि घरी आलो. घरातील पुड्याही टाकून दिल्या. मुलगी, पत्नीलाही विश्‍वास बसला नाही. पण त्यानंतर आजपर्यंत एकदाही तंबाखू, सिगारेट, गुटख्याला हात लावला नाही. कोणी थुंकले तर त्याचाही तिरस्कार वाटतो. सिगारेट ओढणाऱ्यांच्या जवळही थांबत नाही.

हेही वाचा: जगातील सर्वात लहान उंचीची महिला 'एलीफ कोकामन'चा मृत्यू

विशेष म्हणजे माझे आई-वडील डॉक्टर. त्यात वडील डेन्टिस्ट. जनावरांना लागणाऱ्या औषधांचा माझा व्यवसाय. तरीही मी व्यसनात गुरफटलो होतो. सागर वासुदेव यांच्या समुपदेशनामुळे मी आज व्यसनमुक्त झालो आहे. माझे नाव आनंद; मात्र आता खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात आनंद आला आहे.

- तुमचाच आनंद

(पूर्ण नाव मुद्दाम वापरले नाही)

त्या रुग्णांच्या रांगेत मी नव्हतो

कधी आनंद म्हणून, कधी दुःख म्हणून तर कधी सेलिब्रेशन तर कधी टेन्शन फ्री म्हणून मित्रांच्या संगतीने व्यसन जडले. सुरुवातीला गुड फीलिंग होते. ‘ट्रेस लेस’ झालो होतो. तोंडात गुटखा, तंबाखू कायम असायचा; मात्र किळस वाटत नव्हती. मी व्यसन सोडल्यावर सागर वासुदेवने एका कॅन्सर हॉस्पिटलला मला घेऊन भेट दिली. त्या रुग्णांच्या रांगेत मी नव्हतो, पुढे असणार नाही, याचा मला अभिमान वाटला; आजही वाटतो, असेही आनंद सांगत होते.

मी जगातील सर्वांत श्रीमंत आई

आनंद यांच्या आईने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की सागर वासुदेव यांच्या माध्यमातून आमच्या घरी खरा आनंद आला आहे. आज मी जगातील सर्वांत श्रीमंत आई आहे, जिचा मुलगा व्यसनमुक्त झाला आहे. आनंदचा मला अभिमान वाटतो. व्यसनाधीन तरुणांनी कुटुंबीयांसाठी तरी व्यसनमुक्त व्हायला पाहिजे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top