धोका मोठ्या धरणांचा;आयुष्मान संपूनही कार्यरत असल्याने संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त

पीटीआय
Monday, 25 January 2021

संयुक्त राष्ट्रांच्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’ने ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या नावाने हा अहवाल तयार केला आहे.

न्यूयॉर्क - भारतातल्या मोठ्या धरणांपैकी जवळपास १ हजार धरणे २०२५ मध्ये साधारणपणे ५० वर्षांची होतील. ही आणि जगातील अशी अनेक जुनी धरणे धोकादायक ठरू शकतात, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रांनी याबाबत अहवाल तयार केला असून त्यानुसार २०५० पर्यंत जगातील बहुतांश लोकसंख्या विसाव्या शतकात बांधलेल्या शेकडो धरणांच्या प्रभावक्षेत्रात असेल, असा अंदाजही व्यक्त केला आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’ने ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या नावाने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, जगातील ५८,७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणे १९३० ते १९७० या कालावधीत बांधण्यात आली आहेत. बांधताना त्यांची कालमर्यादा ५० ते १०० वर्षे अशी निश्‍चित करण्यात आली होती. कोणत्याही धरणाला ५० वर्षे होऊन गेल्यावर त्यापासून असलेला धोका वाढत जातो. धरण फुटणे, दुरुस्तीचा आणि देखभालीचा खर्च वाढत जाणे, गाळ साचण्याचे प्रमाण वाढणे, प्रणालीत तांत्रिक बिघाड होणे असे प्रकार होतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२०५० पर्यंत जगातील बहुसंख्य लोक अशा जुन्या धरणांच्या प्रभावक्षेत्रातच राहत असतील. यातील अनेक धरणांचा आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा आगामी काही काळात संपणार आहे. 

१८९५ मध्ये बांधून पूर्ण झालेले केरळमधील मुल्लपेरियार धरण अद्यापही कार्यरत असून त्यात अनेक त्रुटी दिसून येत आहेत. या धरणाच्या व्यवस्थापनावरून केरळ व तमिळनाडूमध्ये वाद आहेत. योग्य रचना, बांधकाम आणि व्यवस्थापन असलेली धरणे १०० वर्षांपर्यंत चांगली टिकू शकतात. मात्र, कालानुरुप त्यात बदल करणे अवघड जात असल्याने त्यांचा वापर थांबविण्याचा अमेरिका आणि युरोपमध्ये कल आहे, असे अहवालात म्हटले आहे. येत्या काही कालावधीत नवीन धरणे बांधण्याकडे जगभरात कल वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या देशांतील धरणांचे सर्वेक्षण
अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, भारत, जपान, झाम्बिया आणि झिम्बाब्वे

धरणांचा थोडक्यात आढावा
  ३२,७१६ मोठी धरणे (एकूण धरणांपैकी ५५ टक्के) चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये
  यातील बहुतेक धरणे लवकरच वयाची पन्नाशी पूर्ण करणार
  आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पूर्व युरोपातही मोठी धरणे

भारतातील धरणे
  २०२५ पर्यंत : १११५ मोठी धरणे ५० वर्षांची होणार
  २०५० पर्यंत : ४२५० मोठी धरणे ५० वर्षांहून अधिक वयाची, ६४ धरणे १५० वर्षांची 
  केरळमधील शंभर वर्ष जुने मुल्लपेरियार धरण फुटल्यास ३५ लाख लोकांचा जीव धोक्यात

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील धरणे
  ९०,५८० धरणांचे सरासरी वय ५६ वर्षे
  ८५ टक्के धरणांचे नियोजित आयुष्यमान संपले असूनही कार्यरत
  धरणांच्या पुनर्बांधणीसाठी ६४ अब्ज डॉलरचा खर्च येऊ शकतो
  गेल्या ३० वर्षांत १२७५ धरणे काढली गेली 
महत्त्वाचे मुद्दे
  जगभरातील मोठ्या धरणांमध्ये ७००० ते ८३०० घन किलोमीटर पाणीसाठा (कॅनडाची ८० टक्के जमीन व्यापण्याएवढा)
  ९३ टक्के मोठी धरणे केवळ २५ देशांमध्ये
  गेल्या चार दशकांत मोठी धरणे बांधण्याचे प्रमाण घटले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world oldest dams could be dangerous the United Nations has warned