श्रीलंकेतील हल्ल्याचा जगभरातून निषेध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमुळे जगालाही धक्का बसला असून, बहुतेक जागतिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत श्रीलंका सरकारला सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

कोलंबो (पीटीआय) : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमुळे जगालाही धक्का बसला असून, बहुतेक जागतिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत श्रीलंका सरकारला सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

या बॉंबस्फोटांमध्ये ब्रिटिश, हॉलंड, जपानी आणि अमेरिकी नागरिकांचाही मृत्यू झाला. "ईस्टर संडे'च्या दिवशीच चर्च आणि हॉटेलमध्ये हे स्फोट केले गेल्याने ख्रिस्ती धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्फोट घडवून आणल्याचा अंदाज आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र राहून प्रत्येक धर्माच्या नागरिकाला निर्भयपणे वावरण्यास सहकार्य केले पाहिजे, असे थेरेसा मे म्हणाल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांना आणि पंतप्रधानांना दूरध्वनी करत त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या. 

जागतिक नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया 
- मार्क रूट, पंतप्रधान, हॉलंड : ही अत्यंत वाईट घटना असून, ईस्टर संडेला हा हल्ला होणे धक्कादायक आहे. 
- स्कॉट मॉरिसन, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया : श्रीलंकेच्या नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. 
- जेसिंडा अर्डर्न, पंतप्रधान, न्यूझीलंड : सर्व प्रकारच्या दहशतवादाला आमचा विरोध आहे. आम्ही धर्मस्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. आपण सर्वांनी एकत्र येऊन हिंसाचारावर उत्तर शोधायला हवे. 
- कॅथोलिक चर्च, जेरुसलेम : या हल्ल्यात मृत झालेल्यांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. श्रीलंकेतील सर्व धर्मांच्या आणि वंशाच्या नागरिकांच्या बरोबर आहोत. 

ट्रम्प यांची चूक 
चुकून विपरीत विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीलंकेतील हल्ल्यांचा निषेध करतानाही चूक केली. या हल्ल्यांबाबत दु:ख व्यक्त करतानाच या घटनेत 13.80 कोटी नागरिक मृत्युमुखी पडल्याचे त्यांनी ट्‌वीटरवर जाहीर केले होते. यावर लोकांनी त्यांच्यावर टीका केली. एका श्रीलंकेच्या नागरिकाने तर, "आमची लोकसंख्याच दोन कोटी आहे. त्यामुळे तुमची आकडेवारी चुकीची आहे. तुमचे सांत्वन तुमच्याजवळच ठेवा, आम्हाला नको,' असे फटकारले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worldwide protests from Sri Lankan terrorist attacks