पुतिन यांची वाटचाल शी जिनपिंग यांच्या मार्गाने?

योगेश कानगुडे
मंगळवार, 27 मार्च 2018

गुप्तहेर म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू करून रशियाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले आणि गेल्या अठरा वर्षांपासून सत्तेवर असलेले पुतिन पुन्हा एकदा अध्यक्ष झाले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याप्रमाणे तहहयात अध्यक्ष बनण्याचा मनसुबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले असले, तरी सत्तेसाठी अध्यक्षपद आणि पंतप्रधानपद असा खो-खो त्यांनी खेळला असल्याने तो खरा ठरेलच हे आता सांगता येत नाही.या निवडणूक निकालानंतर ते आणखी सहा वर्षांसाठी अध्यक्षपदी राहतील. म्हणजे २०२४ साली त्यांची ही अध्यक्षपदाची मुदत संपेल त्या वेळी रशियाच्या सत्ताप्रमुखपदाची त्यांची २४ वर्षे पूर्ण होतील.

गुप्तहेर म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू करून रशियाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले आणि गेल्या अठरा वर्षांपासून सत्तेवर असलेले पुतिन पुन्हा एकदा अध्यक्ष झाले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याप्रमाणे तहहयात अध्यक्ष बनण्याचा मनसुबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले असले, तरी सत्तेसाठी अध्यक्षपद आणि पंतप्रधानपद असा खो-खो त्यांनी खेळला असल्याने तो खरा ठरेलच हे आता सांगता येत नाही.या निवडणूक निकालानंतर ते आणखी सहा वर्षांसाठी अध्यक्षपदी राहतील. म्हणजे २०२४ साली त्यांची ही अध्यक्षपदाची मुदत संपेल त्या वेळी रशियाच्या सत्ताप्रमुखपदाची त्यांची २४ वर्षे पूर्ण होतील. इतका काळ रशियात सत्ता उपभोगली ती फक्त स्टालिन यानेच. १९२९ ते १९५३ अशी २४ वर्षे स्टालिनसत्तेची होती. पुतिन यांचे आरोग्य पाहता ते हा विक्रम सहज मोडतील. 

पुतिन यांना या निवडणुकीत जवळपास ७६ टक्के इतकी मते पडली. म्हणजे २०१२ सालच्या निवडणुकीपेक्षाही अधिक. याचा अर्थ या काळात पुतिन यांची लोकप्रियता वाढली असा जर कोणी करीत असेल तर तो समज चुकीचा आहे. रशियात निवडणुका या लुटुपुटुच्या म्हणता येतील अशा असतात. लोकांनी मते द्यायलाच हवीत असे काही बंधन त्यात नसते. पुतिन यांच्या सुरुवातीच्या काळात तर निवडणुकांत ९० टक्के वा अधिक मतदान झाल्याची नोंद आहे. तीदेखील नागरिक घराबाहेर न पडताच. तेव्हा निवडणुका आणि राजकीय वास्तव यांचा काही संबंध असलाच तर तो उलट आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदान ६७ टक्के झाले. यापैकी ७६ टक्के यांच्या मते पुतिन हेच लायक आहेत. पुतिन यांच्या विरोधात उभे असलेले साम्यवादी पक्षाचे पावेल ग्रुडिनीन यांना १२ टक्के इतकी मते मिळाली तर स्थानिक एका पक्षाचे व्लादिमीर जिनिव्होस्की यांना साडेपाच टक्क्यांनी कौल दिला. परंतु हे सर्व तसे शोभेचेच. कारण निवडणूकपूर्व काळात जे लोकप्रिय होते ते अलेक्सी नोव्होल्नी यांना या निवडणुकीत बंदी होती. या अलेक्सी यांनी गेले काही महिने रशियात भ्रष्टाचारविरोधात आंदोलन चालवले होते आणि त्यांना जनतेचा चांगलाच पाठिंबा होता. परंतु त्यांना तेथील निवडणूक आयोगाने रिंगणात उतरल्यापासून रोखले. त्यावर त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची हाक दिली. तीस काही फारसा प्रतिसाद लाभला नाही आणि समजा तो लाभला जरी असता तरी त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता नव्हती.

पुतिन यांचा जन्म झाला तेव्हा सोव्हिएत संघाचे साम्राज्य एका विशिष्ट उंचीवर होते. शीतयुद्धही जोरात होते. सोव्हिएत राष्ट्रवादाच्या, गुप्तहेरांच्या कथा चवीने सांगितल्या जात होत्या. अशा वातावरणात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पूर्व जर्मनीत गेले. त्याच सुमारास साम्यवादाचा प्रभाव अगदी क्षीण  होऊ लागला होता. चारच वर्षांत बर्लिन भिंत कोसळली आणि सोव्हिएत साम्राज्याच्या शेवटाची सुरुवात झाली. पुढील दोन वर्षांत २१ देशांवरील नियंत्रण मॉस्कोने गमावले. या पतनाचा पुतिन यांच्यावर परिणाम झाला. त्या काळातच ते रशियाला परतले. काही काळ सेंट पीटर्सबर्गमध्ये काढल्यानंतर मॉस्कोत दाखल झाले आणि काही काळातच त्यांनी तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांच्यावर छाप उमटवली. त्यानंतर ते सत्तेच्या जवळ जात राहिले आणि १९९९च्या अखेरीस येल्तसिन पायउतार झाल्यानंतर ते रशियाचे हंगामी अध्यक्ष बनले. तेव्हापासून पुतिन यांची रशियातील सत्तेवर पकड आहे.

चेचेन बंडखोरांविरोधात जी काही मोहीम उघडली त्यामुळे सामान्य रशियनांच्या नजरेत ते एकदम नायक ठरले. अरेला त्याहूनही मोठय़ा आवाजात कारे असे म्हणणारा आणि प्रसंगी थेट अरे म्हणणाऱ्यास गोळ्याच घालणारा हा सरकारप्रमुख अशक्त येल्तसिन यांच्या पाश्र्वभूमीवर चांगलाच लोकप्रिय ठरला. परंतु ही लोकप्रियता आखीव होती. म्हणजे चेचेन बंडखोरांविरोधातील त्यांची मोहीम हा शुद्ध बनाव होता. इस्रायलने अरबांना चेचण्यासाठी जशा काही दहशतवादी घटना घडवून आणल्या तशाच प्रकारे चेचेन बंडखोर हे दहशतवादी कृत्ये करीत असल्याचे चित्र पुतिन यांनी तयार केले. प्रत्यक्षात ती सारी कृत्ये रशियन गुप्तहेरांनीच केली होती. परंतु हे उघड होण्यास वेळ लागला. तोपर्यंत पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन विजयी झाले. 

अध्यक्षाला सलग तीन टर्म कालावधी मिळत नसल्याने त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला अध्यक्ष करून ते स्वत: पंतप्रधान झाले. त्यानंतर २०११मध्ये घटनेत बदल करून अध्यक्षीय कालावधी सहा वर्षांचा केला आणि पुतिन पुन्हा अध्यक्षपदी आले. आणखी सहा वर्षांसाठी ते अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या काळात त्यांनी रशियाची सर्व शक्ती आपल्याभोवती एकवटली असून, अमेरिकोबरोबर स्पर्धाही सुरू केली आहे. सोव्हिएत साम्राज्य लयाला गेल्यानंतर पाश्चात्य देशांनी दिलेली वागणूणुकीची परतफेड करण्यासाठी आपले आसन पक्के करणारे पुतिन लोकशाहीच्या मार्गाने एकाधिकारशाहीच्या दिशेने वेगाने निघाले आहेत. सध्याची त्यांची वाटचाल ही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याप्रमाणे चालू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Xi Jinping and Vladimir Putin behave like the best of buddies