
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सिडनीत योगदिन उत्साहात साजरा
सिडनी - ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, भारतीय दूतावासाने श्रीमद् राजचंद्र मिशन धर्मपूरच्या सहकार्याने सिडनीतील शताब्दी सभागृह, सिडनी टाऊनहॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विविध देशांचे ४०० जण सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगाही फडकाविण्यात आला. भारताचे सिडनीतील राजदूत मनिष गुप्ता, ऑस्ट्रेलियाचे माजी विरोधी पक्षनेते जोदी मॅके, गोर्डोनच्या उपमहापौर बार्बरा वार्ड, सिडनीचे नगरसेवक विल्यम चान, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राचे संचालक रामानंद गर्गे, श्रीमद् राजचंद्र मिशन धर्मपूरचे अध्यक्ष डॉ.धवल घेलानी, बॅंक ऑफ बडोदाच्या सिडनी शाखेचे मुख्याधिकारी रवीशकुमार आदी यावेळी उपस्थित होते.
यजुर्वेदातील शांतीपीठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बेलरोसमधील जॉन कोलेट स्कूलमधील विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.
त्याचप्रमाणे, सिडनीतील योगाचार्य डॉ. अमित शर्मा व त्यांच्या शिष्यांनी तसेच धम्मयोगच्या बालशिष्यांनी सादर केलेल्या कठीण आसनांनी प्रेक्षकांना मोहित केले. त्यानंतर, सिडनीतील कलाकार विकास पवार यांचे बासरीवादन तसेच अमन पाल यांच्या तबलावादनानेही उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दोघांही कलाकारांनी यमनरागातील सुमधूर रचना सादर केली. त्यामुळे, शांत, प्रसन्न झालेल्या वातावरणात श्रीमद् राजचंद्र मिशन धर्मपूरच्या डॉ.बिजल घेलानी व स्वयंसेवकांनी श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम व ध्यान सादर केले. त्यांनी सहजसोप्या पद्धतीने केलेल्या या ध्यानामुळे उपस्थित सर्व वयोगटातील साधकांनी सहभाग घेतला. त्यानंतर, योगासने छायाचित्र व व्हिडिओ स्पर्धेतील (प्रौढ आणि बालक) विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेही देण्यात आली. डॉ. धवल घेलानी यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी पाहुण्यांनी दैनंदिन जीवनात योगसाधनेचे महत्त्व विशद केले. ऑस्ट्रेलियातील नॅचरोपथी औषधे राष्ट्रीय केंद्र, सदर्न क्रॉस विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
Web Title: Yoga Day Celebrate In Sydney
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..