
यून सूक-येओल यांच्या हाती दक्षिण कोरियाची सूत्र, सत्तेत येताच लष्कराला आदेश
सेऊल: दक्षिण कोरियात सत्ता बदल झाल्याने आता पूर्वेकडील देशांमध्ये राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता बळावली आहे. यून सुक-येओल यांनी मंगळवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. सेऊलच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एका मोठ्या समारंभात हा शपथग्रहण सोहळा पार पडला. सत्तेत येताच त्यांनी उत्तर कोरियावर टीप्पणी केली. अण्वस्त्रधारी उत्तर कोरियासोबत सुरू असणाऱ्या तणावाच्या काळात त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे. (Yoon Suk-Yeol Sworn as a South Korean President)
"मी लोकांसमोर शपथ घेतो की मी राष्ट्राध्यक्षांची कर्तव्ये निष्ठेने पार पाडीन," असं येओल म्हणाले.
येओल हे आधी सर्वोच्च अभियोक्ता पदावर कार्यरत होते. त्यांनी सोमवारच्या मध्यरात्री दक्षिण कोरियाच्या 5,55,000 सदस्यीय सैन्याची कमान सांभाळली. मध्य सेऊलमधील नवीन अध्यक्षीय कार्यालयात त्यांना लष्करी प्रमुखांकडून उत्तर कोरियाबद्दल ब्रीफिंग देण्यात आलं. यानंतर त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ सुरू केला आहे.
सध्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील विखार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेरिंग समुद्रात शांतता कायम राहण्यासाठी आणि दक्षिण चीन समुद्रात चीनचा प्रभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी दक्षिण कोरियाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
यासाठी दक्षिण कोरियाला अमेरिकेककडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या रशियाच्या युद्ध पुकारण्यामुळे जागतिक अशांततेत भर पडली आहे. यातच ड्रॅगनची जागतिक डिप्लोमसी आणि विस्तारवादी भूमिका जपानची अडवणूक करत आहे. अशा वेळी पूर्वेकडील देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड निर्णायक ठरू शकते.
लष्कराने सज्ज राहा
वॉन इन-चौल, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमन यांनी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ब्रीफिंग दिलं. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी अणुचाचणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यानंतर येओल यांनी लष्करी कमांडर्सना “कोरियन द्वीपकल्पातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत गंभीर आहे” असे म्हणत लष्करी तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहे.
Web Title: Yoon Suk Yeol Sworn As A South Korean President
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..