मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लखवीला १५ वर्षांची शिक्षा 

वृत्तसंस्था
Saturday, 9 January 2021

दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरविल्याच्या आरोपावरून लखवीला ही शिक्षा दिली आहे. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेला लखवी मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात २०१५ पासून जामिनावर बाहेर आहे.

लाहोर - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘लष्करे तैयबा’ (एलईटी) या संघटनेचा प्रमुख झकीउर रेहमान लखवी (वय ६१) याला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तसेच दंडही ठोठावण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरविल्याच्या आरोपावरून लखवीला ही शिक्षा दिली आहे. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेला लखवी मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात २०१५ पासून जामिनावर बाहेर आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील दहशतवादीविरोधी विभागाने त्याला गेल्या शनिवारी (ता. २) अटक केली होती. दहशतवादविरोधी कायदा १९९७ मधील विविध कलमांखाली त्यावर गुन्हे दाखल करून त्याला१५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिली. न्यायाधीश इजाझ अहमद बटार यांनी लखवीला तीन वेगवेगळ्या प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानचे नाटक 
‘फायनान्शियल ॲक्शन टॉस्क फोर्स’ (एफएटीएफ)ची बैठक लवकरच होणार आहे. पाकिस्तान सध्या ‘एफएटीएफ’च्या ग्रे यादीत आहे. यंदाही या गटातच पाकिस्तानचा समावेश करण्याचा विचार सुरू असून हे टाळण्यासाठी पाकिस्तानने लखवीला शिक्षा दिल्‍याची चर्चा आहे. पाकिस्तानच्या या नाटकावर भारतीय अधिकाऱ्यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. ‘एफएटीएफ’च्या बैठकीआधी प्रमुख दहशतवाद्याला अटक करण्याचे पाकिस्तानचे हे नाटक सर्वांना माहीत आहे. याआधी २०१९ मध्ये या बैठकीच्या आधी पाकिस्तानने लष्करे तैयबाचा संस्थापक हाफिज सईद याला अटक केली होती. त्या वेळी ‘एफएटीएफ’कडून पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा विचार सुरू होता.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zakiur Rehman Lakhvi the mastermind of the Mumbai terror attacks has been sentenced by a Pakistani anti-terrorism court to 15 years in jail