तिच्या असह्य वेदनाही झाल्यात लॉक

मनीषा मोहोड-येरखेडे
शनिवार, 30 मे 2020

वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून पन्नाशीपर्यंत स्त्री प्रजननक्षम असते. याचाच अर्थ, या काळात ती प्रत्येक महिन्यात मासिक पाळीच्या चक्रातून जात असते. महिन्याच्या या चार ते पाच दिवसांत होणाऱ्या रक्तस्रावाच्या काळात स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते. 

नागपूर : मासिक पाळीत वापरता येणारी विविध साधने बाजारात उपलब्ध होत असली, तरी सॅनिटरी नॅपकिन वापराकडे महिलांचा अधिक कल असतो. परंतु, कोरोनामुळे सध्या सर्वच औषधांचा तुटवडा जाणवायला लागला आहे. मेडिकल स्टोअर्समधील सॅनिटरी नॅपकिनचा साठाही संपत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 
लॉकडाउनच्या काळात महिलांच्या आरोग्याचे प्रश्‍न अधिक गंभीर होण्याची शक्‍यता जागतिक मासिक पाळी स्वच्छता सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर विविध स्तरांतून समोर येत आहेत.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित

दरम्यान, महिला व किशोरवयीन मुलींसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अस्मिता योजनाही थंडबस्त्यात असल्याने लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अनेक महिलांना मासिक पाळीतील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 
पाळीच्या कालावधीत महिला साधनांची निवड, रक्तस्राव शोषण्याची क्षमता, त्वचेला पूरक आणि वापरण्यास अधिक सोपे यासोबतच आर्थिक विचार करून महिला मासिक पाळीसाठीची साधने वापरतात. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून पन्नाशीपर्यंत स्त्री प्रजननक्षम असते. याचाच अर्थ, या काळात ती प्रत्येक महिन्यात मासिक पाळीच्या चक्रातून जात असते. महिन्याच्या या चार ते पाच दिवसांत होणाऱ्या रक्तस्रावाच्या काळात स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता असते.

"अस्मिते'ला घरघर 
राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने सुरू केलेल्या ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन पुरवणाऱ्या "अस्मिता प्लस' योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेणाऱ्या या योजनेला वर्षभरातच घरघर लागली. सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन मिळणे बंद झाले आहे. दिवाळीनंतर सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठाच झालेला नसल्याने मोठ्या कंपन्यांच्या दबावातून ही योजना गुंडाळली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त यंत्रणेलादेखील काहीच सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे. 

जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिनचा तुटवडा 
शहरासह ग्रामीण भागात महिलांना सॅनिटरी नॅपकिनचा तुटवडा जाणवत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याची दखल घेत, घाऊक विक्रेत्यांना सॅनिटरी नॅपकिनची वाहतूक सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. यासह अस्मिता योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची मागणी महिला व बालविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे केली आहे. 
मनीषा पापडकर, शहराध्यक्ष, मनसे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Her pain is also locked