नेमके कुणाला निरोगी म्हणायचे ?

According to the World Health Organization someone is called healthy
According to the World Health Organization someone is called healthy

जो शारीरिक, मानसिक व सामाजिकरीत्या सुदृढ आहे, त्यालाच आपण निरोगी म्हणू शकतो. याला जोड हवी ती सामाजिक आरोग्याची. चारचौघांत कसे वागावे, कसे बोलावे, भूतदया, परोपकार, शिस्त हेही सामाजिक आरोग्याच्या मोजमापात येतात. माणसाने सतत कार्यरत असावे. व्यायाम, राहणीमान, जेवण-खाण्याविषयी दक्ष असावे, सकारात्मक चिंतन करावे, सामाजिक बांधिलकी जपावी, असे केल्यास आरोग्यमय वातावरणात जीवन बहरेल, यात शंकाच नाही.

माणूस हा समाजप्रिय आहे. समाजाची एक चौकट असते. जरी 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' असे म्हणत आलो, तरी सर्वसाधारण आयुष्य जगताना त्या सामाजिक चौकटीचे भान ठेवणे क्रमप्राप्त असते. आता कोणी एक ती चौकट न मानता, ती लक्ष्मणरेषा ओलांडून आपले जीवन स्वैरपणे जगणे स्वीकारतो; पण अधिकतम माणसे समाजाने आखून दिलेल्या सीमेत राहणे पसंत करतात. जीवन जगताना सामाजिक भान, जाणीव, जबाबदारी अतिशय महत्त्वाची. जसे रहदारी, वाहतूक नियम सर्वांनी पाळले, तर कित्येक अपघातांत जीवांची हानी झाली नसती. आपण सामाजिक जबाबदारी किंवा जगण्याचे नियम अव्हेरू शकत नाही. मानसिक आरोग्य आजकाल बिघडत चाललेले आहे. पूर्वीची परिस्थिती राहिलेली नाही, असे म्हणून आपण तेवढ्यापुरते आपल्या बदललेल्या जीवनशैलीचे, खाण्यापिण्याचे, आचारविचारांचे समर्थन करतो. काही अंशी ते बरोबरही आहे; पण थोडे तरी त्यावर आत्मचिंतन व्हायला पाहिजे.

आजची स्त्री सुशिक्षित, कमावती आहे; पण रूढी, परंपरा, घरसंसार, प्रापंचिक जबाबदाऱ्या यांतून मुक्त झालेली नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागत असल्याने स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. घरातली शांती, मुलांवर संस्कार व बाहेरच्या जबाबदाऱ्या अशा अनेक आघाड्या सांभाळाव्या लागल्याने स्त्रीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनेकदा विपरीत परिणाम जाणवू लागतात. मानसिकरीत्या सक्षम असायला मनात भावनेचा, संवेदनांचा ओलावा असावा लागतो. पडद्यावर हृदयद्रावक प्रसंग पाहिल्यावर नयनांना पूर येतो; तर एकीकडे काळीज फाटणाऱ्या अपघाताचे मोबाईलवरून हसत-हसत चित्रण करून एकमेकांना पाठविण्याचे हृदयशून्य प्रकार घडतात, तेव्हा मानसिक आरोग्याबद्दल प्रश्‍नचिन्ह उमटते.

सांजवेळी देवाला दिवा लावल्यानंतर शुभंकरोती ही प्रार्थना म्हणत असायचो व नंतर सर्व मोठ्यांना नमस्कार केला जायचा. तेव्हा मग "परीक्षेत सुयश लाभो,' यापासून "चांगली मोठी हो, शिक्षण मिळू दे'पासून "चांगले दीर्घायुष्य लाभो' हे आशीर्वाद दिले जायचे. बालपणीच्या या आशीर्वादांच्या पुंजीवर न जाणो कित्येक जणांचे आयुष्य आरोग्याच्या तक्रारीशिवाय गेले आहे व जात आहे. इंग्रजीत एक म्हण आहे "अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, मेक्‍स अ मॅन हेल्दी ऍण्ड वाइज.' या म्हणीत तर पुरेपूर तथ्य आहे. सकाळी लवकर उठून आपली दैनंदिन कामे उरकून आपल्या नोकरी-व्यवसायात, घरातल्या विविध कामांत मग्न असणाऱ्यांना हे अगदीच पटलेले असते.

शारीरिक आरोग्याला माणूस खूप जपतो. आजकाल चाळिशीनंतर मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, हृदयविकार, कर्करोग व इतर अनेक व्याधी हात धुऊन पाठीशी लागतात किंवा सुजाण माणूस वेळच्या वेळी रोगाच्या चाचण्या करून तब्येतीला जपतो. मानसिक आरोग्यालाही तेवढेच जपले पाहिजे. सुसंस्कार, वाचन, एकमेकांशी सुसंवाद, नातेसंबंधांतील जिव्हाळा, शेजार धर्म, व्यवसाय, नोकरीतील वातावरण व इतर अनेक घटकांवर मानसिकरीत्या आपण बांधले गेलेलो आहोत. तेव्हा मानसिकरीत्या कमकुवत झाल्यास शारीरिक व्याधी अंगावर ओढवून घेतल्यासारखे होते.
आरोग्य अतिशय महत्त्वाचे. आरोग्य चांगले असले, तर माणूस कितीही कमवू शकतो. आपल्या पचेंद्रियांचे मोल एखाद्या बहिऱ्या, मुक्‍या किंवा आंधळ्याला विचारा किंवा हात-पाय हलविण्याच्या स्वातंत्र्याचे महत्त्व एखाद्या रुग्णालयात खाटेवर जायबंदी अवस्थेत पडलेल्या अपघातग्रस्त रुग्णाला विचारा. सतत तोळामासा प्रकृती असणाऱ्या एखाद्याला 'चांगले आरोग्य लाभू दे' हा आशीर्वाद लाखमोलाचा असेल, यात शंका नाही.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com