Video : अभिनेत्री इलाश्री गुप्ता सांगतेय फिटनेस मंत्र

actress gupta
actress gupta

तुझा फिटनेसचा मंत्र काय? 
मी वेळेवर योग्य आहार घेते. जिममध्ये दीड तास इंटेन्स वर्कआउट आणि पिलाटेस सेशन करते. त्याचप्रमाणे सव्वा तास मार्शल आर्टही करते. या दोन्हीही एक्‍सरसाइज मी एक दिवसाआड प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करते. मार्शल आर्टमुळे शारीरिक हालचाली वेगवान होतात. त्यामुळे आपल्यामध्ये खूपच उत्साह संचारतो. त्यातून मिळालेली एनर्जी दिवसभर पुरते. परिणामी, ताणतणाव येत नाही. मी आउटडोअर व्यायामाला प्राधान्य देत नाही. जिममध्येच व्यायाम करायला आवडते.

आहार काय घेतेस? 
नियमितपणे वर्कआउट करते. त्यामुळे केळी आणि प्रोटिनचा शेक पिते. उकडलेले अंडे, ऑम्लेटही खाते. दुपारच्या जेवणामध्ये सोयाबीन, पनीरचा समावेश असतो. त्यातूनही प्रोटिन मिळते. संध्याकाळी फळे आणि डाळिंबाचा ज्यूस पिते. रात्रीच्या जेवणामध्ये हलकासा आहार घेते. दिवसभरामध्ये दोन लिटर तरी पाणी पिते. मात्र, ज्यूसचाही समावेश असल्याने पाण्याची कमतरता जाणवत नाही. मांसाहारी जेवण मात्र घेत नाही. 

मनःशांतीसाठी काय करते? 
मी आठवी-नववीपासून ब्रह्मकुमारीचे ध्यान करते. ही सवय मला आई-वडिलांमुळेच लागली. त्यांनी मला सुरुवातीला ध्यानधारणेसाठी जबरदस्ती केली. मात्र, आता मी स्वतःहून ध्यानधारणा करते. झोपण्यापूर्वी व सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाच मिनिटे न चुकता मेडिटेशन करते. त्याचप्रमाणे प्राणायामही करते. तसेच, सात तास झोप घेते. त्यामुळे मन प्रसन्न राहते. ध्यानधारणेच्या वेळी डोळे बंदच असले पाहिजेत, हा नियम मी घालून घेतलेला नाही. कारण, शांतपणे कुठे बसले असल्यास मनात स्मरण करते, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. आपल्या ध्येयावर ध्यान केंद्रित करते. यामधूनच मला शांती मिळते. 

वजन कमी-जास्त केलेस का? 
खरेतर मी अकोल्याची आहे. त्यामुळे मला चटपटीत, तिखट पदार्थ खायला खूपच आवडतात. त्यामुळे वजन वाढते. मात्र, मी नियमितपणे डाएट फॉलो करते. त्याचप्रमाणे वर्कआउट दररोज असल्याने वजन संतुलित राहते. आपण स्क्रीनसमोर येणार असतो, त्या वेळी चांगलेच असावे लागते. त्यामुळे वजन मापात ठेवणे गरजेचे असते. त्यातच ॲक्‍शन व स्ट्रॉंग पात्र साकारण्यासाठी एक्‍सरसाइजशिवाय पर्यायच नाही. ‘तानाजी’ या चित्रपटामध्ये सोयराबाईची भूमिका साकारताना तसेच ‘कोल्ड लस्सी’ व ‘चिकन मसाला’ या वेबसीरिजमध्ये काम करताना मला वर्कआउटच कामी आला. 

फिटनेसबाबत आदर्श कोण? 
फिटनेस फ्रिक म्हणून मला टायगर श्रॉफ खूपच आवडतो. त्याने खूप मेहनतीने आपली शरीरयष्टी बनविली आहे. चित्रपटामधील त्याच्या किक्‍स आणि ॲक्‍शनने सर्व प्रेक्षक भारावून जातात. त्याचप्रमाणे दिशा पटणीही माझ्यासाठी फिटनेसबाबत आयडॉल आहे. आपली शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक मुलीने व्यायाम करावा. 

शब्दांकन - अरुण सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com