
‘अल्झायमर डे’; दर ३ सेकंदात एकाला स्मृतीभ्रंश
नागपूर : वय वाढले की विसरभोळेपणा आपोआपच येतो, असे म्हणतात. परंतु, एखादी गोष्ट तुमच्या लक्षात आहे आणि तरुणवयातही ती तुम्ही चटकन विसरत असाल, काही क्षणांपूर्वी केलेल्या हालचाली, सभोवताली वावरणाऱ्या व्यक्तींना क्षणात विसरत असाल तर तुमची ‘अल्झायमर’ आजाराशी मैत्री होत असल्याचे नक्की समजा. पूर्वी हा आजार वयाची ऐंशी लोटलेल्या वृद्धांमध्ये आढळून येत होता; परंतु अलीकडे साठी उलटलेल्या व्यक्तींमध्ये अल्झायमर (स्मृतीभ्रंश) आजार दिसून येतो.
स्मृतीभ्रंश हा स्मृती, विचार, भावना आणि वागणुकीत अडचणी निर्माण करणारा मेंदूचा आजार आहे. देशात वयाची साठी-पासष्टी उलटलेल्या एकूण व्यक्तींच्या १० टक्के व्यक्ती या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. जसजसे वय वाढते, तसतशी या आजाराची टक्केवारी दुपटीने वाढते. जागतिक आरोग्य संघटनेने १९९४ मध्ये या आजाराची दखल घेतली. दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी अल्झायमर दिवस जगभरात पाळला जातो. सध्या जगात स्मृतीभ्रंशाचे सुमारे ५ कोटी लोक आहेत. भारतात एक हजार पैकी ४ लोकांना हा आजार दिसून येतो. पुढील १० वर्षांत याचे प्रमाण दुप्पट होईल.
हेही वाचा: नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळला; एकाची केली हत्या
अशी आहेत लक्षणे
विसरभोळेपणा
घराचा पत्ता विसरणे
नातेवाइकांची नावे विसरणे
नवीन गोष्टी शिकण्यात अडचण
कपडे व्यवस्थित न घालणे
अशी आहेत कारणे
मेंदू पेशींच्या क्रयशक्तीचा ऱ्हास
मेंदू आकुंचन पावणे
मेंदूपेशी खराब होणे
मेंदूला रक्तपुरवठा वाहिन्यांत अवरोध
बाळंतपण, पाळी, हल्लीचा ताणतणाव, स्पर्धा यासारख्या बाबींमुळे महिलांमध्येही ताण वाढत आहे. उतारवयात त्याचे परिणाम दिसू लागतात. स्मृतिभ्रंश हा त्यातील एक आजार आहे. यात अगदी क्षुल्लक गोष्टीदेखील लक्षात राहत नाहीत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या स्मृतिभ्रंशाची जोखीम दीडपट अधिक असते.- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ मेंदूविकारतज्ज्ञ
हेही वाचा: फायब्रोमायल्जिया : रुग्ण हरवून बसतो स्वत:वरचे नियंत्रण
स्मृतिभंश आजारात तारखा, घटना विसरणे, ठिकाणांचा मागोवा गमावणे, घराचा मार्ग विसरणे, वाचनाची अडचण, मित्रांना न ओळखणे, नातेसंबंध विसरणे, निर्णय घेणाची क्षमता कमी होणे. दैनंदिन दिनचर्येमध्ये अडचण येणे, व्यक्ती छंद, सामाजिक कार्यक्रमातून माघार घेणे, असा व्यक्तिमत्त्वात बदल येतो. गोंधळलेले, संशयास्पद, निराश, भयभीत किंवा चिंताग्रस्त दिसतात.- डॉ. सुधीर भावे, मानसोपचार तज्ज्ञ
अल्झायमरवर कोणतेही औषधे उपलब्ध नाहीत. काही औषधांनी लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे, हायपोथायरॉईडीझममुळे स्मृतिभ्रंश झाल्यास तो औषधांद्वारे बरा होऊ शकतो. अल्झायमरचे निदान झाले ते लोक ६५ किंवा त्याहून अधिक वयाचे असतात. निदान होण्याआधी सुमारे २० वर्षे रोगाची प्रक्रिया सुरू होऊ शकते.- डॉ. अतनू बिस्वास, मेंदूरोग तज्ज्ञ
जे लोक उच्च कार्बोहायड्रेट आहार घेतात. जंक फूड, साखर, पॅकेजमधील अन्न, कोल्ड ड्रिंक्स, फळांचे रस, सूर्यफूल तेल, राईस ब्रॅण्ड ऑईल, सोयाबीन तेल आणि हायड्रोजनयुक्त वनस्पती तेल स्वयंपाकासाठी वापरतात त्यांना स्मृतिभ्रंशांची शक्यता अधिक असते. आरोग्यदायी मेंदूसाठी शारीरिक, मानसिक व्यायाम महत्त्वाचे आहेत. तंबाखू, धूम्रपान, मद्यपानापासून दूर राहावे.- डॉ. जेएमके मूर्ती, मेंदूरोग तज्ज्ञ
हेही वाचा: ड्रॅगन पॅलेस टेम्पल : बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध
स्मृतिभंश आजारात पाठीच्या कण्यातील द्रवाचा स्तर कमी होतो. मेंदूत बदल होत असल्याचा भास होतो. साठीतील व्यक्ती या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. भविष्यात पन्नाशीतील व्यक्ती ‘अल्झायमर’च्या विळख्यात सापडू नये यासाठी या आजाराबाबत जनजागरण करण्याची गरज आहे.- डॉ. जी. अर्जुनदास, मेंदूरोग तज्ज्ञ
Web Title: Alzheimers Day Forget Something Brain Disease Forgetfulness
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..