''नशीबाचे दार आपोआप उघडत नाही त्यासाठी मेहनत करावीच लागते''

''नशीबाचे दार आपोआप उघडत नाही त्यासाठी मेहनत करावीच लागते''

स्वतःला शिस्त लावणे फार कठीण गोष्ट असते. मात्र, त्या शिस्तीचे योग्यरीत्या पालन केल्यास आपल्याला आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतात. मी मॉडेलिंग करते. त्यामुळे मला फिटनेसबाबत खूपच दक्ष राहावे लागते. कारण, कॅमेरासमोर कोणतीही गोष्ट दुप्पट मोठी दिसते. त्यामुळे तुमचे थोडे जरी वजन वाढले, तरी कॅमेरा लगेच कॅच करतो. फिटनेस म्हटले की सर्वांत अगोदर माझ्या डोक्‍यात येतो वर्कआउट. त्यामध्ये रनिंग, सायकलिंग, स्कीपिंग, डान्सिंग, वेट ट्रेनिंग या गोष्टी मी करते. वेळ कितीही कमी असला तरी, आपल्या शरीरासाठी व उत्तम आरोग्यासाठी एक तास बाजूला काढू शकतो, असे माझे स्पष्ट मत आहे. व्यायामामुळे मला खूप फ्रेश वाटते. त्याचा परिणाम फक्त बॉडीच नव्हे, तर स्कीनवरही होतो. चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे टवटवीतपणा दिसतो. विशेष म्हणजे, आपल्यापासून आजारही दूर राहतात. आरोग्य उत्तम राखण्यासाठी डाएटचा मोठा वाटा असतो. मी तो व्यवस्थित पाळते. मी बाहेरील पदार्थ खाणे टाळते.

आपण स्वतःच्या हाताने अन्नपदार्थ बनवितो, ते नेहमीच आरोग्यासाठी पोषकच असतात. आपण काय आणि किती खातो, याची जाणीवही आपल्याला असते. अंडी, केळी, प्रोटिन शेक, बदाम या गोष्टींचा मी जेवणात नेहमीच सहभागी करून घेते. मला सर्वच प्रकारची फळे आवडतात. त्यामुळे दिवसातून एक-दोन वेळा सीझनल फळे नक्कीच खाते. त्याचबरोबर चपाती-भाजी किंवा भाकरी हा आहार घेतल्याशिवाय माझे पोट भरत नाही. मला भेळ व पाणीपुरी फार आवडते, त्यासाठी आठवड्यातून एक दिवस मी ‘चीट डे’ ठेवते व त्याचा खूप आनंद घेते. माझा आदर्श मी स्वतःलाच मानते. कारण, माझे मत आहे की दुसरे कोणासारखे बनण्यापेक्षा, कालपेक्षा आज मी किती सुधारले या गोष्टीकडे लक्ष दिल्यास अधिक समाधान मिळते. फिटनेसला कोणताही शॉर्टकट नसतो. दररोजच नियमितपणे आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावेच लागते. त्यामुळे व्यवस्थित व चांगले खाण्याबरोबरच भरपूर व्यायाम करून दिवसात भरपूर पाणीही प्यायले पाहिजे. कारण, नशीबाचे दार आपोआप उघडत नाही. त्यासाठी मेहनत करावीच लागते, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. 

शब्दांकन - अरुण सुर्वे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com