योग ‘ऊर्जा’ : वजन कमी करायचंय?

देवयानी एम., योग प्रशिक्षक
Tuesday, 24 November 2020

‘Moderation is the mother of all’. मराठी भाषेत ‘अति’ करण्यावरून अनेक म्हणी आहेत. अनुभवाशिवाय त्या तयार झाल्या नाहीत. कोणतीही गोष्ट माफक करण्यात त्याची गोडी आहे. अनेकदा आपल्याला कळतही नाही कोणती गोष्ट कधी अति होऊन बसली, नंतर त्याचे परिणाम दिसायला लागल्यावर आपली धांदल उडते.

‘Moderation is the mother of all’. मराठी भाषेत ‘अति’ करण्यावरून अनेक म्हणी आहेत. अनुभवाशिवाय त्या तयार झाल्या नाहीत. कोणतीही गोष्ट माफक करण्यात त्याची गोडी आहे. अनेकदा आपल्याला कळतही नाही कोणती गोष्ट कधी अति होऊन बसली, नंतर त्याचे परिणाम दिसायला लागल्यावर आपली धांदल उडते. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, बिघडलेल्या उठण्या-झोपण्याच्या वेळा, स्ट्रेस, व्यायाम न करणे आणि ध्येयहीन आयुष्य जगणे, हे सर्व वजन वाढण्याचे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वजन वाढूच दिले नाही, तर कमी करण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यासाठी घेतलेला ताणही येणार नाही. हे बऱ्याच लोकांना जमत नाही. कारण, टार्गेटशिवाय काम करण्याची आपल्याला सवयच नसते. माझ्याकडे अनेक जणी येतात आणि म्हणतात, ‘मला दोन महिन्यांत वजन आणि पोट कमी करायचेय; कारण माझे लग्न आहे.’ असे टारगेट ठेवणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यास हानिकारक आहे. वजन कमी करण्याचा स्ट्रेस, ते कमी करण्याच्या प्रयत्नांच्या आड येतो. पोट कमी करणे हा सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.

पोट कसे असावे?

  • हिपच्या घेरापेक्षा पोटाचा घेर कमी असावा.
  • स्त्रियांचा पोटाचा घेर ३५ इंच आणि पुरुषांचा ४० इंचापेक्षा जास्त असणे हानिकारक आहे.
  • बोटांनी पोट दाबून पाहिले, तर ते मऊ लागले पाहिजे, कडक नसावे.
  • पोट कायम हलके जाणवणे आरोग्याचे लक्षण आहे.

वजन नियंत्रणात ठेवण्यात आनुवंशिकता, हार्मोन्स, सवयी आणि वातावरण, हे चार निर्णायक पैलू आहेत.
1) आहार :
कोणताही फॅड डाएट करू नका, ज्याला इंग्रजीत ''yo yo diet'' म्हणतात. कारण, या फॅन्सी डाएटमुळे वजन कमी तर होते; पण लगेच पुन्हा वाढते आणि यात आधीपेक्षा जास्त वजन वाढण्याची दाट शक्‍यता असते. कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकली, तरच ती दीर्घकाळ परिणामकारक ठरते. आपल्या भुकेच्या ७५ ते ८० टक्केच अन्न खावे, पोट पूर्ण भरेपर्यंत खाऊ नये. अति गोड, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, दारूचे सेवन पूर्णपणे टाळावे. ‘डाएटचा खरा अर्थ’ या जानेवारी २०२०मध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या लेखात आहार कसा असावा, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

2) व्यायाम : दिवसातून तीन वेळा खातो, तसे आठवड्यातून कमीत कमी तीन ते चारवेळा नियोजनपूर्वक व्यायाम व्हायला हवा. वजन व पोट कमी करायचे असल्यास रोज व्यायाम व्हायला हवा. रोज एकाच पद्धतीचा व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळे व्यायामप्रकार दिवसाप्रमाणे ठरवून घ्या. अशाने शरीरासही आव्हान मिळेल आणि कंटाळाही येणार नाही. यामध्ये कार्डियो, वेट ट्रेनिंग, योगासने होणे गरजेचे आहे. इतर वेळी ॲक्टिव्ह लाइफस्टाईल असावी. एका जागी खूप काळ बसू नका, थोडा वेळ उभे राहून काम करा, फोन आला की चालत चालत बोला, बसल्या बसल्या हलके स्ट्रेचिंग करा, अशाने अंग मोकळे व हलके राहील.

3) स्ट्रेस : अनेकांना वाटते, डाएट आणि व्यायाम केला की झाले. परंतु, स्ट्रेसमुळे तुमच्या फॅट लॉस जर्नीमध्ये अनेक अडथळे येतात. मैत्रिणीच्या लग्नात लेहेंगा घालायचाय म्हणून एक महिना भरपूर व्यायाम केला आणि नेमक्या लग्नाच्या दिवशी पोट जास्त दिसले, जे एरवीही दिसत नाही, असे झालेय ना? स्ट्रेसमुळे जास्त खाल्ले जाते, रक्तातील स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलनही बिघडते व शरीराचे वॉटर रिटेंशन वाढते. आहार व व्यायामाच्या सवयीबरोबरच ताण कमी ठेवण्यासाठी रोज थोडावेळ प्राणायाम व ध्यान करावे. तुम्ही खूप बिझी असल्यास जास्त ध्यान करण्याची गरज आहे, असे समजा.

4) झोप : अपुरी झोप रक्तातील स्ट्रेस हार्मोन वाढवते. अशाने वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बाधा निर्माण होते. मेटाबॉलिजम कमी होऊन जाडी आणखी वाढते. झोपेवर एक संपूर्ण लेख लिहून त्यामागील शास्त्र व सविस्तर माहिती एप्रिल २०२०मधील माझ्या लेखात प्रकाशित झाली आहे. रात्री लवकर झोपून, झोप पूर्ण झालेल्या अवस्थेत पहाटे लवकर उठणे, ही वजन कमी करण्यासाठीची सर्वांत महत्त्वाची टीप आहे.

लक्षात घ्या, वजन किंवा जाडी कमी करणे, हे शरीरास पीडा देऊन शिक्षा केल्यासारखे वाटू नये. तेही प्रेमाने, आनंदाने आणि मुख्य म्हणजे आरोग्य टिकवून साध्य करायचे आहे. मी अनेकांना कमी काळात पटकन बारीक झालेले पाहिले आहे. परंतु, ते अचानक दहा वर्षांनी वय वाढल्यासारखे दिसायला लागतात. वजन कमी करून तारुण्य आणि तेज टिकले, तर याचा अर्थ तुमचे प्रयत्न योग्य दिशेने चालू आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article devyani m on Want to lose weight