योग ‘ऊर्जा’ : जीवेत् शरद: शतम्

Devyani-M
Devyani-M

आपल्या घरातील मोठे, वडीलधारे, आई-बाबा, आजी-आजोबा गेले सात महिने घराबाहेर पडू शकले नाहीत. म्हणजे आपल्या देशातील जवळजवळ बारा कोटी लोक अनेक महिने मोकळेपणाने वावरू शकले नाहीत. वयाच्या साठीपुढील लोकांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असल्याने, त्यांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, अशी नियमावली सरकारने जाहीर केली.

आजारी पडू नये यासाठी घेतलेल्या या काळजीमुळे आपण जे सातत्याने करायला पाहिजे, जसं व्यायाम, योग... तेही होऊ शकलं नाही. शाळा, ऑफिस ‘फ्रॉम होम’ सुरू झाले, परंतु ज्येष्ठ नागरिक बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिले. लॉकडाउनच्या बंधनांनी त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता खुंटली असल्याचे दिसून येत आहे. अशा अवघड काळात हलकासा योगाभ्यास अनेक समस्यांचे ओझे हलके करू शकतो!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) शारीरिक आरोग्य (physical health)
कमी झालेल्या हालचालींमुळे अशा वयात होणारे अनेक त्रास वाढत गेले. जसे स्नायूंचे कमकुवत होणे, लवचिकता कमी होणे, बद्धकोष्ठता, श्वसनाचे विकार, झोप कमी होणे, रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, शरीरावरचा एक प्रकारचा आत्मविश्वास कमी होणे इत्यादी. दिवसातील पाऊण ते एक तास किंवा सकाळ-संध्याकाळ अर्धा तास सूक्ष्म व्यायाम, सौम्य प्रकारची योगासने व ताण न आणणारा प्राणायाम यासाठी वेळ राखून ठेवल्यास कित्येक समस्या टाळता येऊ शकतात. खुर्चीत बसूनही सूर्यनमस्कार करू शकता. दिवसात दर तीन तासांनी घरातल्या घरात फेऱ्या मारल्यानेही स्नायू व सांध्यांना चलनवलन मिळते, रक्ताभिसरण सुधारते. वयोमानानुसार पडण्याचे प्रमाण वाढते. वरील प्रकारांच्या नियमित व्यायामामुळे स्नायूंची मजबुती व शरीराचे संतुलन टिकविण्यास मदत होते.

2) संज्ञानात्मक आरोग्य (cognitive health)
आसने, प्राणायाम, ध्यान यांनी मेंदूचे आरोग्य चांगले राहते. वयानुरूप मेंदूमध्ये रासायनिक बदल होत असतात. विस्मृती, आकलनशक्‍ती कमी होणे, शरीराच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या केंद्राची झीज या सर्व बाबींवर उपाय म्हणजे पुरेशी झोप, व्यायाम, प्राणायाम, ध्यान, योग्य आहार व ब्रेन जिम्नॅस्टिक्स. अतिशय स्वाभिमानी असलेले आपले आई-वडील यांना आपल्या मेंदूचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव असतेच.

3) मानसिक आरोग्य (mental health)
तणाव, नैराश्य, एकटेपणा, भीती, असंतुष्ट वाटणे यासाठी अभ्यास म्हणजे ‘स्वतः’बरोबर राहून वाचन, मनन, चिंतन करणे आवश्यक आहे. घरात अनेक जण असूनही आतमध्ये एकटेपणाची भावना सर्वत्र आहे. उत्तम ग्रंथांच्या सोबतीमध्ये आतून भरीव आणि भक्कम वाटण्याची ताकद आहे. तसेच आध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाने संसाराची पकड सैल करून स्वतःच्या आंतरिक प्रगतीवर लक्ष देण्याची हीच वेळ!

4) जीवनशैलीचे विकार (lifestyle disorders)
उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, सांधेदुखी, मेंदूचे विकार, श्‍वसनाचे विकार, पचनाचे विकार यांना नियंत्रणात ठेवून क्वॉलिटी ऑफ लाइफ वाढवण्यासाठी वरीलप्रमाणे रोजचे जीवन आखून नियमित सराव असावा. खरे म्हणजे तरुण वयातच याची सुरुवात झाल्यास आपण ‘लंबी रेस के घोडे’ बनू शकू. योग-अध्यात्म हे रिटायर झाल्यावर करण्याची गोष्ट नाही, हे ज्यांना समजेल त्यांना याचा फायदा मिळणार हे नक्की! काहीतरी होतेय म्हणून उपचार करण्यापेक्षा, जास्तीत जास्त काळ काही होऊच नये यासाठीचे आपले प्रयत्न कमी पडतात.

वय होणे हा प्रत्येकाच्या हृदयाचा हळवा कोपरा आहे. तिसावे वर्ष लागल्यावर ‘अब बूढ़ा हो गया मै’ म्हणणारे तरुण असतात, तर काही ऐंशीव्या वर्षीही ‘अभी तो मै जवान हूं’, ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणतात. आपण शरीराची तंदुरुस्ती राखून मनाचे तारुण्य टिकवून आयुष्य आनंदाने जगायला शिकूया. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये ‘जीवेत् शरद: शतम्’ असा ऋषी-मुनींनीच आशीर्वाद दिला आहे!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com