योग ‘ऊर्जा’ : प्रत्याहार समजून घेताना...

देवयानी एम. योग प्रशिक्षक
मंगळवार, 24 मार्च 2020

तुम्हाला पोपटांची गोष्ट सांगते. एक पोपट पिंजऱ्याच्या बाहेर येण्याची धडपड करतोय. दुसरा पोपट पिंजऱ्याच्या बाहेर आहे. तो शांतपणे आत जाऊ पाहतोय. तिसरा पिंजऱ्यात आहे. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा आहे. पण, तरीही तो बाहेर येऊ इच्छित नाही. आपलं मन पहिल्या पोपटासारखं बाहेर धावण्यापासून तिसऱ्या पोपटाप्रमाणं अंतरंगात रमण्यापर्यंतचा प्रवास करू लागलं, की आपण खऱ्या अर्थानं योगमार्गात शिरलो. आसनं-प्राणायाम करणारे ध्यानापर्यंत पोचण्यामध्ये अडखळतात, ते प्रत्याहार न समजल्यामुळं. महर्षी पतंजलींच्या अष्टांग योगातील पाचवे अंग ‘प्रत्याहार’ समजून घेऊ.

तुम्हाला पोपटांची गोष्ट सांगते. एक पोपट पिंजऱ्याच्या बाहेर येण्याची धडपड करतोय. दुसरा पोपट पिंजऱ्याच्या बाहेर आहे. तो शांतपणे आत जाऊ पाहतोय. तिसरा पिंजऱ्यात आहे. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा आहे. पण, तरीही तो बाहेर येऊ इच्छित नाही. आपलं मन पहिल्या पोपटासारखं बाहेर धावण्यापासून तिसऱ्या पोपटाप्रमाणं अंतरंगात रमण्यापर्यंतचा प्रवास करू लागलं, की आपण खऱ्या अर्थानं योगमार्गात शिरलो. आसनं-प्राणायाम करणारे ध्यानापर्यंत पोचण्यामध्ये अडखळतात, ते प्रत्याहार न समजल्यामुळं. महर्षी पतंजलींच्या अष्टांग योगातील पाचवे अंग ‘प्रत्याहार’ समजून घेऊ.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रियं म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक यांना उत्तेजन देणारे त्यांचे विषय म्हणजे शब्द (काहीतरी ऐकावं), स्पर्श (काहीतरी स्पर्शावं), रूप (काही तरी पाहावं), रस (काहीतरी खावं) आणि गंध (काहीतरी हुंगावं) यांच्याद्वारे आपलं मन बाहेरच्या जगात कायम आकर्षित होत असतं. आता ही ज्ञानेंद्रियं बंद ठेवायचं स्विच तर आपल्याकडं नाही. पण, आपल्या ज्ञानेंद्रियांना उत्तेजन असूनही आपलं चित्त (अवधान) त्यावर नसल्यास त्या उत्तेजनेचा परिणाम होणार नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा प्रसंग आलाच असेल, की समोर टीव्ही सुरू आहे आणि बाजूला कोणीतरी बोलत आहे. त्याचे शब्द ऐकू येऊनही डोक्यात जात नाहीत.

कारण, आपलं लक्ष टीव्हीकडं असतं. याचा अर्थ आपलं मन जिथं गढलं आहे, ते सोडून दुसऱ्या कशाचीही संवेदना होत नाही. हेच तत्त्व योगात लावलं तर - आपण योगाभ्यास करताना, आपल्या भरकटणाऱ्या मनातील विचारांना प्रक्रियेनं थांबवतो. त्या वेळी ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संबंध येऊनही तिथं मन अडकलं नसल्यानं त्या विषयांची संवेदना होत नाही. उदा. तुम्ही डोळे मिटून जरा वेळ बसला आहात आणि कुठून तरी आवाज किंवा सुगंध आल्यास लगेच म्हणतो, ‘काय झालं’, ‘किती छान सुगंध आहे.’ असं मन बाहेर फेकलं न जाता आपण आहोत त्याच मनाच्या शांत-विचारशून्य अवस्थेत राहणं म्हणजे ‘प्रत्याहार’ होय.

प्रत्याहार म्हणजे नेमकं काय?
मन बहिर्मुख असल्यास ते दिसेल तिकडं भरकटत राहतं. याउलट चंचल मनाची बहिर्मुख प्रवृत्ती मोडून मनाला खेचून अंतर्मुख करण्याचा अभ्यास म्हणजे प्रत्याहार. त्याची सवय होत गेली, की कुठल्याही चांगल्या-वाईट गोष्टींचा मनावर होणारा परिणाम हळूहळू कमी होत जाईल. तुम्हाला जाणवेल, एरवी व्यवहारात वागतानासुद्धा मन एका शांत लयीत आहे. मन ताब्यात राहायला लागेल. सारखा मूड जाणं, बोअर होणं, काहीतरी तोंडात टाकावंसं वाटणं, उगीच फोन चेक करावासा वाटणं, हे बंद होऊ लागेल. काहीही न करण्यात तुम्ही रमू लागाल.

धारणेचा अर्थ समजून घ्या
आता प्रत्याहारात पाहिल्याप्रमाणं आपलं चित्त बाहेरून खेचून तर आणलं; पण ते आत ठेवायचं कुठं? म्हणून, महर्षी पतंजली पुढील अंग सांगतात ‘धारणा’. ते खेचून आत आणलेलं चित्त (अवधान) एका निश्‍चित ठिकाणी स्थिर ठेवायचा अभ्यास म्हणजे धारणा. धारणा म्हणजे धरणं, धारण करणं. धारणा ही ध्यानापूर्वीची महत्त्वाची प्रक्रिया आहे. हे ठिकाण आपल्या शरीरातील कोणताही भाग असू शकतं, जसे भ्रूमध्य (दोन भुवयांच्या मध्यभागी - आज्ञाचक्र). अशा ठिकाणी आपल्या चित्ताला बांधून ठेवल्यासारखं स्थिर ठेवलं, की ध्यानाची योग्यता किंवा ध्यान ‘लागण्याची’ प्रक्रिया सुरू होते. मन धावलं की त्याला धरा व खेचून आत आणा आणि एका ठिकाणी बांधून ठेवा. असा प्रत्याहार-धारणा यांचा अभ्यास हा पुन:पुन्हा करावा लागतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article devyani m on yoga

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: