योग ‘ऊर्जा’ : ‘ती’चे आरोग्य : मासिक धर्म

देवयानी एम.
Tuesday, 27 October 2020

स्त्रियांची प्रजनन संस्था (female reproductive system) ही पुरुषांच्या प्रजनन संस्थेपेक्षा अधिक क्लिष्ट असते. अर्थातच, त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याची गुंतागुंत जास्त असते. प्रजनन संस्थेच्या कार्यामध्ये होणारे त्रास ही अनेक महिलांची समस्या आहे. कित्येक वर्षे स्त्रिया या त्रासासह जगत असतात. याची सुरुवात लहान वयात म्हणजे बारा-तेराव्या वर्षापासून होते, जेव्हा मासिक पाळी पहिल्यांदा सुरू होते.

स्त्रियांची प्रजनन संस्था (female reproductive system) ही पुरुषांच्या प्रजनन संस्थेपेक्षा अधिक क्लिष्ट असते. अर्थातच, त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याची गुंतागुंत जास्त असते. प्रजनन संस्थेच्या कार्यामध्ये होणारे त्रास ही अनेक महिलांची समस्या आहे. कित्येक वर्षे स्त्रिया या त्रासासह जगत असतात. याची सुरुवात लहान वयात म्हणजे बारा-तेराव्या वर्षापासून होते, जेव्हा मासिक पाळी पहिल्यांदा सुरू होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वांत आधी आपल्या मुलींशी या विषयावर मोकळेपणाने बोला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मासिक पाळी हे मोठे गुपित असल्यासारखे त्याचा बाऊ होऊ देऊ नका. लाज वाटणे, चुकीच्या संकल्पना किंवा अंधश्रद्धांना बळी पडू नका. अशाने काही त्रास होत असल्यास मुली मोकळेपणाने मदत मागू शकणार नाहीत. मासिक धर्म ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलींना लहान वयात भरपूर खेळू द्या. नको तिथे मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका, त्यांची भावनिक कुचंबणा होऊ देऊ नका आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मुलींना पोषक आहार द्या.

मासिक पाळीची अनियमितता हॉर्मोन्सवर अवलंबून असते आणि हॉर्मोन्सचे संतुलन हे मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. त्यामुळे मनाची शांतता हे हॉर्मोन्स आणि पाळीच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. भीती, ताणतणाव, भावनिक ओढाताण हे मासिक धर्मात बाधा निर्माण करतात. लहान मुलींमध्ये पाळी वेळेवर न येणे, लवकर येणे, अतिरक्तस्राव, खूप वेदना हे संकेत आहेत की त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्याची कुठेतरी हेळसांड होत आहे.

अतिवेदना आणि अस्वस्थता हे शारीरिक ताण व मानसिक-भावनिक प्रतिकार दर्शवितात. त्यामुळे ज्या स्त्रिया कायम तणावाखाली असतात त्यांना प्रत्येक महिन्यात त्रास होतो. याउलट ज्या स्त्रिया शांत, शक्तीचा ऱ्हास न होऊ देणाऱ्या असतात, त्यांना फार त्रास होत नाही. हा त्रास कमी करण्यासाठी गोळ्या घेणे हा सर्वांत सोपा आणि तेवढ्यापुरता उपयोगी असा उपाय असला, तरी पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतो आणि अनेक वैद्यकीय समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक स्त्रिया गोळ्या न घेता जीवनशैलीतून याचे उत्तर शोधण्याच्या दिशेने जात आहेत.

मासिक धर्म आणि योगाभ्यास
सूर्यनमस्कार : सुरुवातीला चार; मग हळूहळू बारापर्यंत किंवा क्षमतेनुसार त्यापुढे सूर्यनमस्कार घातल्याने शारीरिक व प्राणिक संतुलन राखले जाते.

आसने : मार्जारासन, व्याघ्रासन, शशांकासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, सर्वांगासन, हलासन, चक्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्यासन, अर्धमच्छेंद्रासन, विपरीत करणी, उत्तानासन, पादहस्तासन, शीर्षासन, ताडासन अशी विविध आसने नियमित केली पाहिजेत. पाळीच्या काळात फार ताण घेऊन कोणताही व्यायाम किंवा आसने करू नयेत.

प्राणायाम : अनुलोम-विलोम, भस्रिका, उज्जयी, भ्रामरी या प्राणायामांनी ताण, चिडचिडेपणा कमी होतो आणि हॉर्मोन्सचे संतुलन राखले जाते.

शुद्धिक्रिया : नेती, वमनधौती, शंखप्रक्षालन इत्यादी गरजेप्रमाणे करावे. बद्धकोष्ठतेमुळेसुद्धा पाळीच्या काळात क्रॅम्प्स वाढू शकतात.

शिथिलीकरण : शवासन, योगनिद्रा यांनी शरीराच्या सर्व भागांतील तणाव कमी होतो. व्यायामानंतर हे रोज थोडा वेळ तरी करावे.

ध्यान : मंत्रजपाचा नाद आणि ध्यान हे अत्यंत आवश्यक आहेत. ध्यानाचे शास्त्रीय फायदे आपण काही आठवड्यांपूर्वीच्या लेखात सविस्तर पाहिले आहेत.

योग्य आहार : हलके, पौष्टिक, घरचे अन्न खावे. मांसाहाराने पाळीच्या वेदना वाढतात, त्यामुळे शक्य तितका शाकाहारी आहार असावा. अतितेलकट, तिखट, बाहेरचे जंक फूड टाळावे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article devyani m on yoga