वुमन हेल्थ : पीसीओएस - समजून घेऊया!

डॉ. ममता दिघे
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

चला तर मग, हा त्रास होऊ नये म्हणून पुढील काही गोष्टी नक्की लक्षात ठेऊया

  • तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्याने सकस आहार घ्या.
  • नियमित आणि पुरेसा व्यायाम करा.
  • वजन जास्त वाढू देऊ नका.
  • झोपेच्या वेळा सांभाळा
  • वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास या त्रासाविषयी माहिती करून घ्या
  • जागरूक राहून वेळीच उपाय करा.

रियाचे आजकाल कशातच लक्ष लागत नव्हते. सारखी आरशात बघायची आणि रडायची. तिच्या चेहऱ्यावर खूपच केस आले होते, शिवाय मुरुमांनी चेहरा भरून गेला होता. ती जाडही झाली होती. यामुळे तिने घरातून बाहेर पडणे बंद केले आणि तिच्या मनात प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला. तिला घरच्यांनी उपचारासाठी आणले, तेव्हा लक्षात आले की तिला ‘पीसीओएस’चा त्रास आहे. भारतात प्रजननक्षम, वयात असलेल्या १० पैकी एका तरुणीला ‘पीसीओएस’च्या समस्येने हैराण केले आहे. एंडोक्रायनल सिस्टीमचा हा एक आजार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी लक्षणे असू शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कारणे : हा त्रास आनुवंशिक असू शकतो, शिवाय भारतासारख्या आग्नेय आशियातील देशात इन्शुलिनचा प्रतिकारही वाढतो आहे आणि ‘पीसीओएस’चे हे एक महत्त्‍‍वाचे कारण आहे. याचबरोबर हल्ली जीवनशैली खूपच चुकीच्या प्रकारे बदलली आहे. स्त्रिया वाटेल त्या वेळी काम करतात, झोपेच्या वेळा बिघडल्या आहेत आणि जंक फूड खाणे, कोल्ड्रिंक पिणे आणि शारीरिक व्यायाम न करणे यांमुळे या त्रासाचे प्रमाण खूपच वाढले आहे.

लक्षणे : हा त्रास असलेल्या स्त्रिया बरेच वेळा स्थूल असतात. फेशियल हेअर ग्रोथ, मुरुमे, डोक्यावरचे केस गळणे, सगळ्यात जास्त आढळणारे लक्षण म्हणजे पाळी वेळेवर न येणे, पुढे जाऊन वंध्यत्व असू शकणे, अशी लक्षणे दिसून येतात. अंडाशयाचा आकार वाढून त्यात सिस्टही होऊ शकतात. वेळेवर अंडे बाहेर न पडल्याने हे सिस्ट होतात. अनियमित पाळी आणि पीसीओएस असलेल्या तरुणींना भविष्यात उच्च रक्तदाब, मधुमेह असे इतर त्रास मागे लागण्याची जास्त शक्यता असते. अशा स्त्रियांचा गर्भपात होण्याचे प्रमाण अधिक असते.

पीसीओएस उपचाराने बरा होत नाही, पण अनेक गोष्टींनी यावर नियंत्रण ठेवता येते आणि त्रासही आटोक्यात आणता येतो. संशोधनाने सिद्ध झाले आहे की, यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणे. तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घेऊन आहार आणि नियमित व्यायामाने पाळी नियमित होऊन, रक्तातील साखर आटोक्यात ठेवल्यास त्रास कमी होतो. या त्रासासाठी लक्षणानुसार उपचार केले जातात. वंध्यत्व असल्यास ओव्ह्युलेशन नीट होण्यासाठी औषधे दिली जातात. इन्शुलिन सेन्सिटायझर दिल्याने ‘पीसीओएस’चा त्रास आटोक्यात आणता येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr mamata dighe on wwomen health