फॅब-अ‍ॅब : शरीराची ठेवण सुधारण्यासाठी...

Backside-Bend
Backside-Bend

आपले व्यक्तिमत्त्व शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर अवलंबून असते. आत्मविश्‍वासू आणि आरोग्यदायी दिसण्यात शारीरिक ठेवण महत्त्वाची भूमिका कशी बजावते, हे आज पाहूया. काही लोकांच्या पाठीला किंवा पाठीच्या कण्याला बाक असतो. कण्याच्या नैसर्गिक ‘एस’ आकारामध्ये बदल होणे चांगले नसतेच. त्यामुळे लहान वयातच शारीरिक स्थितीचे प्रशिक्षण द्यायला हवे. त्याचप्रमाणे, मुलांनीही सरळ उभे राहण्याची वा बसण्याची गरज आहे. वय वाढत असताना बेढप शारीरिक ठेवण विकसित होते. ती दुरुस्तही करता येते. तुम्ही बसताना पाठ झुकवून बसता का, उभे असताना पार्श्‍वभाग बाहेर काढता का, हे जरा तपासून पाहा. 

  • तुमच्या पायांत सहा इंच अंतर ठेवून भिंतीसमोर उभे राहा. 
  • तुमच्या खांद्याचा मागील भागाचा आणि पार्श्‍वभागाचा भिंतीला स्पर्श व्हावा. 
  • आदर्श शरीरस्थितीमध्ये तुमची मान आणि भिंतीदरम्यान केवळ दोन इंचांचे अंतर असावे. त्याचप्रमाणे, पाठीची खालील बाजू आणि भिंतीत ते एक इंचाचे अंतर असावे. 
  • हे अंतर कमी-जास्त असल्यास शरीर त्याप्रमाणे बदलून घ्या आणि योग्य स्थिती टिकविण्याचा प्रयत्न करा. हे करताना शरीरात काही वेदना जाणवल्यास किंवा आरामदायी न वाटल्यास तो शरीराची ठेवण दुरुस्त करण्याचा संकेत आहे. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ किंवा फिजियोथेरेपिस्टची मदत घेऊ शकता. तुमच्या शरीर स्थितीच्या ठेवणीने आयुष्यात मोठा फरक पडू शकतो. तुमचे व्यक्तिमत्त्व चांगले दिसण्याबरोबर योग्य अवस्थेतील पाठीच्या कण्यामुळे शरीराची कार्ये सुरळीत चालण्यासही मदत होते. 

पाठीला बाकावरचे घरगुती उपाय 
1) खांदे फिरवून आणि त्यांना मागे खेचून शरीरस्थिती सुधारण्यास सुरुवात करा. 
2) तर्जनी हनुवटीवर ठेवून हनुवटी मागील दिशेला खेचा. ही कृती ३० सेकंद करून पुन्हा करा. 
3) सरळ उभा राहा. गुडघे थोडेसे वाकवा. तुमची नाभी, पोट पाठीच्या मणक्याकडे खेचा. 
4) सपाट पृष्ठभागावर पाठीवर झोपा. गुडघे वाकवा. पाठीच्या बाकाखाली मऊ टॉवेल ठेवा. त्यानंतर पाठीने टॉवेल दाबा व सोडा. 

अशा काही साध्या व्यायामांतून तुमच्या पाठीवरचा ताण कमी होण्यास सुरुवात होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शरीराची ठेवण सुधारण्यासाठीचे व्यायाम करणे. तुमच्या शरीराचा मध्यभाग पाठीच्या कण्याला साह्य करून शरीराची ठेवण योग्य ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीराचा गाभा किंवा मध्यभाग म्हणजे काय, तो मजबूत कसा करावा हे पुढील भागात जाणून घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com