फिटनेस कॉर्नर : आहारावरचे प्रयोग; आरोग्यावरचा परिणाम

श्रुती जहागिरदार
Friday, 1 May 2020

आपल्याला वजन कमी करायचं असताना (फॅट लॉस) आहारात बदल करणं जरुरीचं असतं, हे खरं आहे. आपण मनाची तयारी करतो आणि आपल्या आहारात बदल करायला तयार होतो. मात्र, मी माझ्या मागील लेखात म्हटल्याप्रमाणं, प्रत्येक शरीर भिन्न असतं आणि एखाद्या डाएटचा परिणाम दिसून येण्यास वेळ लागतो किंवा आहार आपल्यासाठी योग्य नसतो, असंही होऊ शकतं.

आपल्याला वजन कमी करायचं असताना (फॅट लॉस) आहारात बदल करणं जरुरीचं असतं, हे खरं आहे. आपण मनाची तयारी करतो आणि आपल्या आहारात बदल करायला तयार होतो. मात्र, मी माझ्या मागील लेखात म्हटल्याप्रमाणं, प्रत्येक शरीर भिन्न असतं आणि एखाद्या डाएटचा परिणाम दिसून येण्यास वेळ लागतो किंवा आहार आपल्यासाठी योग्य नसतो, असंही होऊ शकतं. आपल्याला अपेक्षित परिणाम दिसत नाही, तेव्हा आपण स्वीकारलेल्या आहार पद्धतीचा त्याग करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या डाएटचा शोध घेऊन, तो सुरू करतो. काही लोकांसाठी हे चक्र वर्षानुवर्षं सुरू असतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला प्रश्‍न पडतो, नक्की काय अधिक वाईट आहे ः जास्त काळ एकाच अवैज्ञानिक आहारावर राहणं की वेगवेगळे आहार ट्राय करणं? खरं तर दोन्ही वाईटच आहेत!

डाएट बदलत राहणं वाईट का?
आपण सारखे भिन्न आहार घेतल्यावर ते आरोग्य सुधारण्याऐवजी चयापचयाची गती कमी करतात. प्रत्येक वेळी आपण नवीन आहार सुरू केल्यावर (असा आहार, जो संतुलित नसतो किंवा अवैज्ञानिक असतो.) केवळ कॅलरीज कमी घेतल्यामुळं आपल्या चयापचयाची गती तात्पुरती वाढते आणि म्हणून आपले वजन थोडे कमी होते. वास्तविक चरबी कमी होते आहे, की मसल्सचा लॉस होतोय हे आहारावर अवलंबून आहे, पण वजन कमी व्हायचे थांबले, स्थिर झाले किंवा तुम्हाला ते डाएट करायला कंटाळवाणे झाल्यास तुम्ही मधेच सोडून देता.

सुरू केलेले डाएट थांबवल्यानंतर आपल्या चयापचयाची गती बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि आधीपेक्षा खालावते. या प्रक्रियेमध्ये चरबी वाढते आणि दुसऱ्या आहारासह चयापचय पुन्हा वाढवणे आणि हवे असलेले परिणाम मिळवणे कठीण होते. डाएट सारखे बदलल्यास हे चक्र सुरूच राहते. अशाप्रकारे आपले वजन सतत खाली-वर होत राहते आणि त्या बरोबरच चरबीही वाढत जाते. यालाच ‘Yo - Yo Dieting’ असेही म्हणतात.

पुढील वेळी आपण आपली जीवनशैली बदलू इच्छित असाल व हेल्दी डाएट सुरू करणार असाल तेव्हा आपला आहार संतुलित आणि टिकणारा (sustainable) असेल, याची आधी खात्री करा. अधीर न होता नवीन आहार पद्धतीस प्रतिसाद देण्यास आपल्या शरीरास पुरेसा वेळ द्या, त्यामुळे चांगले परिणाम नक्की अनुभवायला मिळतील. चांगला आहार आपल्याला मजबूत आणि ऊर्जावान बनवितो आणि आपल्याला नेहमीच आनंदी वाटेल, असा त्याचा परिणाम असतो.

(लेखिका राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉलपटू, प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट आहेत. त्या HaloMiFitness या स्टार्टअपच्या संस्थापक सीईओ आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shruti jahagirdar on experiment on food and health effect

Tags
टॉपिकस
Topic Tags: