चेतना तरंग : अपार श्रद्धा....!

श्री श्री रविशंकर
Tuesday, 27 October 2020

पिकांची कापणी झाल्यावर, शेतकरी खळ्यामध्ये एका उंच जागी उभा राहतो आणि चाळणीत धान्य घेऊन ते उंचीवरून पाखडतो. अशावेळी टरफले वाऱ्याच्या झोताबरोबर हवेत उडून जातात आणि धान्याचे दाणे जमिनीवर पडतात. आयुष्य असेच घडते. आपली कशावर तरी श्रद्धा पाहिजे. श्रद्धा आपल्या अंतर्मनात वसलेली असते. जीवनात अनेक चढ-उतार होत असतात. अडीअडचणींच्या वेळी शांतपणे, स्थिर मनाने आणि श्रद्धेने आपण त्यांना तोंड देतो का? तुमची कशावर श्रद्धा नसल्यास तुम्ही धास्तावून जाल.

पिकांची कापणी झाल्यावर, शेतकरी खळ्यामध्ये एका उंच जागी उभा राहतो आणि चाळणीत धान्य घेऊन ते उंचीवरून पाखडतो. अशावेळी टरफले वाऱ्याच्या झोताबरोबर हवेत उडून जातात आणि धान्याचे दाणे जमिनीवर पडतात. आयुष्य असेच घडते. आपली कशावर तरी श्रद्धा पाहिजे. श्रद्धा आपल्या अंतर्मनात वसलेली असते. जीवनात अनेक चढ-उतार होत असतात. अडीअडचणींच्या वेळी शांतपणे, स्थिर मनाने आणि श्रद्धेने आपण त्यांना तोंड देतो का? तुमची कशावर श्रद्धा नसल्यास तुम्ही धास्तावून जाल. तुम्ही एखाद्या टरफलासारखे वाऱ्यावर हेलकावे खात राहाल. तुमचे अस्तित्वच धोक्यात येईल. कसलाच आधार तुम्हाला मिळणार नाही. असल्या लोकांना कोणी किंमतही देत नाही, कोणी विचारत नाही. तुमच्याजवळ श्रद्धा असल्यास तुम्हाला आधार मिळेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ईश्वर तुमच्याकडून फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा करतो. ‘अढळ श्रद्धा’, तुमची श्रद्धा डळमळीत असली किंवा कशावरच नसल्यावर कठीण प्रसंगात तुमची गत एखाद्या टरफलासारखी होईल. ‘तुम्ही नुसते टरफल आहात का दाणा आहात?’ हे तुम्हाला ठरवायचे आहे. जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात, त्यांना तोंड देताना तुमचे मानसिक संतुलन राखले जाते का? मानसिक स्थैर्य राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. या जगात नेहमीच सगळ्या गोष्टी मनासारख्या आणि चांगल्या घडत असतात, असे नाही. कधी कधी वाईट गोष्टींची चवही तुम्हाला चाखायला लागते. दाण्याला टरफल घट्ट चिकटून बसते, तसे तुम्ही श्रद्धेला घट्ट चिकटून बसल्यास कठीण परिस्थितीमधून तुम्ही निभावून जाल.

‘काही झाले तरी मी जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा राहीन. ईश्वराचे संरक्षण मला आहेच. काही झाले तरी मी डगमगून जाणार नाही. ईश्वराचा वरदहस्त माझ्यावर नेहमीच असतो,’ एवढा विचार तुम्ही मनात घोळविलात, तरी आलेल्या संकटातून तुम्ही व्यवस्थित बाहेर पडाल. कोणत्याही कठीण प्रसंगात तुमचे मन शांत राहील. इतके जरी तुम्ही केलेत तरी पुरेसे आहे. हे जग प्रेममय आहे. प्रत्येकामध्ये प्रेमाचा ओलावा असतो. तुम्हाला ते प्रेम तुमच्यात शोधायचे आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही इतरांकडे कधी बघितले आहे का? तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असताना तो प्रेमाचा प्रचंड सागरच आहे, अशी कल्पना करा.

जीवनात तुम्ही आनंदी असले पाहिजे. बाकी सर्व बाबतीत चढ-उतार होत राहणे, हे स्वाभाविक आहे. शरीर असल्यास त्याला सर्दी, ताप किंवा आजार होणारच. पण, ते येतील आणि जातील. अशा परिस्थितीत सुद्धा तुमच्यातला आनंद कायम राहिला पाहिजे. यालाच ‘पुरुषार्थ’ म्हणतात. आपले प्रेम, श्रद्धा, विश्वास यांची पाळेमुळे अंतर्मनात खोलवर रुजवावी लागतात; म्हणजे बाकी सर्व गोष्टी आपोआप होत जातील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar