शोध स्वतःचा : शक्यतेच्या सीमा ओलांडा...

पण नशिबावर आपण सगळंच कुठे सोडतो. प्रयत्न थांबले नाही पाहिजेत. शक्यतेच्या सीमा पहिले मनात ओलांडल्या पाहिजेत. आहे त्या परिस्थितीत आपण स्वतःला अडकवून ठेवतो आणि अपयशासाठी अनेकदा कोणालातरी दुसऱ्याला दोष देण्याची सवय नकळत लावून घेतो. आपणच आपल्या आयुष्याची जबाबदारी झटकू पाहतो.
शोध स्वतःचा
शोध स्वतःचाsakal

आयुष्यात काहीही साध्य करायचं असेल तर कष्ट केले पाहिजेत. ‘Hard work is the key to success’ वगैरे आपण कायमच ऐकतो. हे शंभर टक्के खरं आहे परंतु प्रयत्न किंवा परिश्रमांना आणखीही अनेक गोष्टींची साथ लागते. कष्ट तर या जगातील प्रत्येक माणूस करतोच. आपापल्या क्षेत्रात, आपापल्या क्षमतेनुसार आणि आकलनानुसार. पण मग यश मात्र सर्वांना सारखे मिळत नाही. यात खूपसा भाग आपल्या भाग्याचा असतोच, नशिबात असेल तेवढेच मिळेल असं आपण ऐकत आलो आहोतच. पण नशिबावर आपण सगळंच कुठे सोडतो. प्रयत्न थांबले नाही पाहिजेत. शक्यतेच्या सीमा पहिले मनात ओलांडल्या पाहिजेत.

आहे त्या परिस्थितीत आपण स्वतःला अडकवून ठेवतो आणि अपयशासाठी अनेकदा कोणालातरी दुसऱ्याला दोष देण्याची सवय नकळत लावून घेतो. आपणच आपल्या आयुष्याची जबाबदारी झटकू पाहतो. यश मिळण्यामागे कारणे अनेक असतात. आत्ता पुरतं आपण ‘काहींकडे पैसे जास्त असतात, ओळखी-वशिले असतात’ हे बाजूला ठेवू. त्यांचा फायदा जरी खूप होत असला तरी ते आपल्याकडे नाही हे धरून बसण्यात आणि त्यामुळे मी पटापट पुढे जाण्यात अडथळा येतो हे म्हणण्यात नुसताच वेळ वाया जाईल. त्यापेक्षा करायला काय पाहिजे यावर आपली यंत्रणा लावली तर मुद्द्यावर लवकर पोहोचू.

बलस्थान

प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असते, गुण असतात, अव्यक्त क्षमता असतात त्या पहिले ओळखायला पाहिजेत. नसूदेत तुमच्या आई-वडिलांकडे भरपूर पैसे, नसूदेत ओळखी.. तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या जोरावर खूप काही उभं करू शकता. तुम्हाला आयुष्यात हरवल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही कोण आहात ते आधी शोधा मग तुम्हाला काय हवे ते नक्की सापडेल. आपण स्वतःला स्वतःच्या नजरेने पाहत नाही, इतर आपल्याला कसे पाहतात याही नजरेनं पाहत नाही. ‘आपण इतर आपल्याला कसे पाहतात याचा आपल्याला जो तोडका मोडका अंदाज असतो त्या अर्धवट नजरेने पाहतो आणि तपासतो.’ स्वामी विवेकानंद म्हणतात ‘All the powers in the universe are ours. It is we who put our hands before our eyes and cry that it is dark.’

पॅशन

उत्साह आणि उत्कटता हे ध्येयप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. मग ते ध्येय भौतिक आयुष्यातील असो, राष्ट्रकार्य किंवा वैयक्तिक उद्दिष्टे. याचे महत्त्व एवढे आहे की हठयोगातील पाच साधक तत्त्वांपैकी सर्वात पहिले तत्त्व ‘उत्साह’ आहे. म्हणजे योगमार्गातही यश मिळवायचे असेल तर उत्साहाने आणि उत्कटतेने कर्म व साधना करणे गरजेचे आहे. सकारात्मकता, उमेद, स्फूर्ती, आंतरिक प्रेरणा या सर्वांना पॅशन या शब्दात समेटूया. स्वामी विवेकानंद या पॅशनला आचरणात कसे आणायचे ते सांगतात - “Take up one idea. Make that one idea your life, think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body, be full of that idea, and just leave every other idea alone. This is the way to success”

चिकाटी

कोणतीही गोष्ट सोडून देणं हे सर्वांत सोपं आहे. चिकाटीनं करत राहणं अवघड पण त्यातच यश दडलं आहे. आपल्याला हव्या तशा गोष्टी घडत नसतील तर निराशा येणं नैसर्गिक आहे, परंतु लक्षात ठेवा प्रत्येक छोट्या गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देणं आणि तेही भावनिक प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही. तुमच्या निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत प्रयत्न थांबता कामा नये. यासाठी ध्येयाप्रती वचनबद्धता महत्त्वाचे आहे. डगमगतं मन, ध्येयापासून वारंवार लांब नेणारे विचार, नकारात्मकता आणि स्वतःवरचा अविश्वास यांना कटाक्षाने दूर ठेवा. आपल्या इतिहासात श्रीकृष्णार्जुनापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि त्यानंतरही अनेकांनी चिकाटीची विलक्षण उदाहरणे आपल्यासमोर जगून दाखवली आहेत.

उद्देश

सर्वांत शेवटी परंतु महत्त्वाचा आहे आपला ‘उद्देश’. महागडी गाडी आहे, फुल टॅंक पेट्रोल भरले, उंची कपडे घालून आवरून आत बसलो, मात्र जायचं कुठे हेच निश्चित नसेल तर सगळ्यात तामझामाचा काय फायदा? इतर सर्व गुण, विचार, सामर्थ्य, क्षमता आणि उत्साहाला दिशा कोणती द्यायची हे पहिले माहीत करा. नोकरी ही पगारासाठी करतो, पैसे हे उदरनिर्वाह व चांगले राहण्यासाठी करतो, नाती ही सहजीवनासाठी जोपासतो, रिकाम्या वेळात करमणूक शोधतो.. पण यातील कोणतेही जीवनाचे ध्येय असू शकत नाही. तुमच्या आयुष्याचा उद्देश तुम्ही शोधायचा. या शोधण्याची भूक उत्कट असेल आणि उत्तरासाठीची हाक आर्द्र असेल तर मार्गदर्शक कोणत्याही रूपाने समोर येऊन ठाकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com