बदलत्या ऋतुमानानुसार पायांची काळजी घेणे आवश्यक असते. पावले स्वच्छ, सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी करता येणे शक्य आहे. हवामानानुसार आपल्या पायांची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते, हिवाळ्यात कोरडी होऊन फुटते व पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होते त्यामुळे ऋतुमानानुसार पायांची काळजी घ्यावी लागते.
ही काळजी आवर्जुन घ्या
- बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवावेत. व्यवस्थित कोरडे करावेत. दोन बोटांमध्ये पाणी साठून बुरशी वाढू शकते.
- अंघोळीनंतर हात, चेहऱ्याप्रमाणे पायांनाही मॉईश्चरायझर लावल्यास फायदेशीर. त्वचेच्या प्रकारानुसार व हवामानानुसार मॉईश्चरायझर निवडावे.
- शक्यतो कॉटनचे सॉक्स वापरा. वुलनचे वापरणार असाल तर आतून कॉटनचे अस्तर लावा.
- पायांची नखे वाढवू नका.
- पादत्रांणाची निवड व्यवस्थित करा. पायांच्या बोटांकडे चिचोंळे असलेले शुज वापरू नये. त्यामुळे नखांवर दाब पडतो. नखे अंगठ्यांच्या मासांमध्ये वाढण्याचा विकार होतो.
- किमान दोन जोड शुज घ्यावेत. एक दिवसाआड ते वापरावेत. सॉक्सप्रमाणे शुज बदलले नाहीत तर बुटांमध्ये ओलावा राहतो. हे बुट वाळायला किमान 24 तासांचा वेळ लागतो.
- हाय हिल्स घालू नयेत. शक्यतो फ्लॅट चप्पल वापरावे. स्टाईल म्हणून हाय हिल्स वापरत असाल तर त्याची उंची 2 इंचापेक्षा जास्त नको. पेन्सील हिल तर वापरूच नयेत.
- पॅडीक्युअर करताना नखांच्या बाजूची पुर्ण त्वचा निघू नये याची काळजी घ्यावी.
- तळव्याची त्वचा कडक झाली असेल किंवा भेगा, घट्टे पडले असतील तर दहा मिनिटे पाण्यात पाय सोडून बसावे.
- स्क्रबरने हलक्या हाताने मृत त्वचा काढावी. अतिप्रमाणात त्वचा कडक झाली असेल तर रात्री झोपताना मलम लावून सॉक्स घालावेत.
- अनवाणी पायाने चालू नये. साबणाचे पाणी, धुळ, माती, चिखल आणि केमिकलच्या संपर्कात पाय येऊ देऊ नये. आल्यास लगेच पाय स्वच्छ धुवावेत.
- ज्यांना मधुमेह आहे. त्यांनी विशेष काळजी घ्यावी. रोज झोपताना आपल्या हाता, पायांना जखम झाली आहे का, हे तपून गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
हे व्यायाम करा
- तळव्यांचा व्यायामही गरजेचा आहे.
- टिव्ही पाहताना टेनिस बॉल पायाच्या तळव्यांनी रोल करा.
- बोटांमध्ये चिखल्या होऊ नये यासाठी रात्री झोपताना बोटांमध्ये कॉटनचे बॉल ठेवावेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम थेट त्वचेवर होतो. त्यामुळे ऋतुमानानुसार पायांची काळजी घ्यावी. पायांच्या स्वच्छतेसाठी धुण्याबरोबरच ते व्यवस्थित कोरडेही करावेत. जेणेकरून बुरशी होणार नाही.
- डॉ. माधवी लोकरे, त्वचाविकारतज्ज्ञ
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:
care of the feet