esakal | कोरोनाची लक्षणं जाणवल्यास का करावी HRCT टेस्ट?

बोलून बातमी शोधा

कोरोनाची लक्षणं जाणवल्यास का करावी HRCT टेस्ट?
कोरोनाची लक्षणं जाणवल्यास का करावी HRCT टेस्ट?
sakal_logo
By
टीम इ सकाळ

देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्येच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्यास लगेच कोरोना चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर व प्रशासन यांच्याकडून वारंवार देण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना टेस्ट करण्याच्या मुलभूत पद्धती साऱ्यांनाच ठावूक झाल्या आहेत. मात्र, या व्यतिरिक्त HRCT ही टेस्टदेखील सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आतापर्यंत अनेक जणांची ही चाचणी करण्यात आली असून ही चाचणी करणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोनाची किरकोळ लक्षणे जाणवतात व काही दिवसांमध्येच हा विषाणू झपाट्याने शरीरात पसरतो. त्यातच हा विषाणू फुफ्फुस किंवा हृदयाजवळ पोहोचलाय की नाही हे HRCT च्या टेस्टमध्ये दिसून येतं. त्यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवल्यास ही टेस्ट करणं गरजेचं आहे.

HRCT या टेस्टमध्ये क्ष किरणे व संगणकीय प्रणालीचा वापर करुन छाती व अन्य अवयवयांचं निरीक्षण केलं जातं. यामध्ये क्ष किरणांचा प्रवाह हा छातीभोवती गोलाकार पद्धतीने प्रचंड गतीने फिरून वेगवेगळ्या प्रतिमांचे कट ( स्लाईस ) तयार केले जातात. त्यानंतर त्यांच्यावर संगणकाच्या माध्यमातून प्रोसेसिंग करून मॉनिटरवर अवलोकन करून तपासणी अहवाल डॉक्टरांकडून केला जातो. या प्रतिमांमधून एकंदरीत शरीराच्या कोणत्या भागात इजा आहे हे स्पष्टपणे दिसून येतं.

कोरोनाची लागण जर फुफ्फुसापर्यंत पोहोचली तर HRCT टेस्टमध्ये ती स्पष्टपणे दिसून येते. जर, कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहोचला असेल तर प्रतिमांमध्ये फुफ्फुसावर धुसर राखाडी रंगाचे पट्टे दिसून येतात. त्याला ग्राउंड ग्लास ऑपॅसिटी असंही म्हणतात. हे पट्टे पारदर्शक असतात अर्थात या पट्ट्यांच्या मागे असलेला फुफ्फुसाचा उरलेला भाग , रक्तवाहिनी , सूक्ष्म श्वासनलिका यात स्पष्टपणे दिसतात.

( डॉ. तरन्नुम खलीफे या रत्नागिरीतील प्राईम डायगनोस्टिक सेंटरमध्ये रेडिओलॉजिस्ट आहेत.)