esakal | योग ‘ऊर्जा’ : पाठदुखीवर उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

Devyani-M

जगात दहापैकी आठ लोकांना पाठदुखीचा त्रास त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी होतोच. पाठदुखीची कारणे अनेक असू शकतात; जसे स्लीपडिस्क, अर्थरायटिस, स्पोर्ट्‌स इन्जुरी, सांध्यांचे डिजनरेशन इत्यादी. परंतु, सर्वाधिक प्रमाणात पाठदुखी ही कमकुवत स्नायू व कमी झालेल्या लवचिकतेमुळे होते. त्यातही कंबरदुखी आणि त्यानंतर मानेचा भाग दुखणे यांचे सर्वाधिक प्रमाण आहे.

योग ‘ऊर्जा’ : पाठदुखीवर उपाय

sakal_logo
By
देवयानी एम., योग प्रशिक्षक

जगात दहापैकी आठ लोकांना पाठदुखीचा त्रास त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी होतोच. पाठदुखीची कारणे अनेक असू शकतात; जसे स्लीपडिस्क, अर्थरायटिस, स्पोर्ट्‌स इन्जुरी, सांध्यांचे डिजनरेशन इत्यादी. परंतु, सर्वाधिक प्रमाणात पाठदुखी ही कमकुवत स्नायू व कमी झालेल्या लवचिकतेमुळे होते. त्यातही कंबरदुखी आणि त्यानंतर मानेचा भाग दुखणे यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. याचे कारण म्हणजे मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू कडक आणि दीर्घकाळ त्रासदायक स्थितीत आखडलेले असतात. त्यांचे मूळ आहे चुकीचे बसणे, दीर्घकाळ बसणे, दीर्घकाळ उभे राहणे, अयोग्य खुर्ची वापरणे इत्यादी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असे अनेक दिवस व महिने चालू राहिल्यास पाठीचे स्नायू आणखी कडक होऊन कायम दुखत राहतात. दिवस संपेपर्यंत हे दुखणे वाढत जाते आणि सकाळी उठल्यावर पाठ काही मिनिटे दुखत राहते. मला अनेक जण सांगतात, सकाळी उठल्यावर पाठ धरलेली असते आणि सरळ होताच येत नाही, थोड्या हालचाली झाल्यावर सुसह्य होऊ लागते.

या त्रासावर आपल्याकडे कायमस्वरूपी उपयोगी पडतील अशी आसने आहेत. यांचा रोज सराव केला आणि सवयच करून घेतल्यास दिवसातील काही काळ मी स्वतःच्या आरोग्यासाठी देईनच, तर पाठदुखी होण्याची वाट पाहावी लागणार नाही आणि दुखत असल्यास ही ‘पाठदुखी कायमची लागली’ असेही समजायची गरज नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुमच्या कामामुळे तुम्हाला अनेक तास एकाच स्थितीत बसावे लागत असल्यास पाठीकडे दुर्लक्ष करून वाकडेतिकडे बसू नका. अनेक जणांच्या पाठीच्या मणक्याचा आकार बदललेला पाहण्यात आला आहे. कधीही-कुठेही बसाल तर सरळ बसा. अशाने आपला पाठीचा कणा त्याच्या नैसर्गिक स्थितीत राहतो. मणक्यातील डिस्कवर ताण येत नाही आणि डिस्क व पाठीचे स्नायू आरामदायक स्थितीत राहतात. त्यांचे रक्ताभिसरण योग्य राहते. ऑफिस किंवा कॉम्प्युटरवर काम करताना थोडे पुढे झुकून बसले जाते, अशाने डिस्कवरचे प्रेशर वाढते आणि पुढे जाऊन स्पाँडिलिसिससारखे त्रास होऊ शकतात. पाठीचे स्नायू अशा सवयीमुळे कडक राहतात किंवा वारंवार स्पाजममध्ये जातात. सरळ बसण्याचा फायदा श्वासावरही होतो. छाती, पोट व पाठीवर दाब येत नसल्याने श्वसनसंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहते. श्वास घेण्या-सोडण्यास त्रास होत नाही व फुप्फुसांचे कार्यही सुरळीत चालू राहते.

घाई न करता, झटका न देता, हळुवारपणे खालील आसने रोज कमीत कमी वीस मिनिटे करावीत.
1) कंबर व पाठ : अर्ध शलभासन, शलभासन, उष्ट्रासन, भुजंगासन, व्याघ्रासन, पवनमुक्तासन, नीरालंबासन, धनुरासन, मर्कटासन, कटिचक्रासन, मत्स्यक्रीडासन, अर्धकटिचक्रासन.
2) खांदे व मान : द्विकोनासन, सर्पासन, भुजंगासन, ब्रह्ममुद्रा, पर्वतासन, मार्जारासन, सेतुबंधासन, उत्तान मण्डुकासन, गोमुखासन.
3) शिथिलीकरण : शवासन, मकरासन.

Edited By - Prashant Patil

loading image