शोध स्वतःचा : मेंटल डिस्टंसिंग 

देवयान एम.
Tuesday, 12 January 2021

आपले विचार - भावना - प्रतिक्रिया, तसेच आजूबाजूची माणसे व त्यांचे वर्तन तटस्थपणे पाहिल्यास स्पष्ट दिसू लागतील. या मेंटल डिस्टंसिंगचा खूप सराव करावा लागतो. खरेतर ही साधनाच आहे. 

आपली सर्वांत मोठी समस्या आहे आपले ‘मन’! धर्मक्षेत्राप्रमाणे पवित्र अशा आपल्या शुद्ध अस्तित्वावर आपल्याच मनाने वरचढ होऊन कुरुक्षेत्रासारखी रणभूमी मांडली आहे. आपल्या मनात संकल्प-विकल्पांचे पांडव व कौरव यांच्यात अखंड युद्ध सुरू असते. अर्जुनाशी आपली कोणतीही बरोबरी होऊ शकत नाही, पण उदाहरण म्हणून रणांगणावर उभ्या असलेल्या अर्जुनाप्रमाणे आपल्याही मनाची घालमेल होत असते. या घालमेलीवर श्रीकृष्णासारख्या खंबीर फ्रेंड - फिलॉसॉफर - गाईडची भूमिका आपल्याच सद्सद्विवेक बुद्धीला घ्यायची असते. उत्तरे बाहेर मिळतील या आशेत आपण चाचपडत राहतो आणि त्याने निराश होतो व एकटे पडू शकतो. 

कोणतीही अवघड परिस्थिती, मग ती बाहेरून उद्भवलेली असो किंवा आपल्या कल्पनेने निर्माण केलेली असो, सर्वप्रथम त्यापासून अंतर निर्माण करावे. आपण सोशल डिस्टंसिंग प्रमाणेच मेंटल डिस्टंसिंगची प्रॅक्टिस करायला हवी. जवळून पाहिलेल्या वस्तूपेक्षा थोड्या अंतरावरून पाहिलेली वस्तू जशी जास्त स्पष्ट दिसते, तसेच आयुष्यातील प्रसंग, परिस्थिती, आपले विचार - भावना - प्रतिक्रिया, तसेच आजूबाजूची माणसे व त्यांचे वर्तन तटस्थपणे पाहिल्यास स्पष्ट दिसू लागतील. या मेंटल डिस्टंसिंगचा खूप सराव करावा लागतो. येथे योगाभ्यास आपल्या विवेक बुद्धीला तयार करून धार लावतो. खरेतर ही साधनाच आहे. 

हेही वाचा : शोध स्वत-चा: माझी डायरी, माझे रेझोल्युशन्स...

‘मी’पणाचा चष्मा काढा... 
एकदा हे अंतर निर्माण करून सर्व गोष्टींकडे ‘द्रष्टा’ म्हणून पाहायला यायला लागल्यावर दृष्टिकोन तयार होऊ लागतो. परिस्थिती पडताळून पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह तयार होऊ लागला, की सापेक्षता समजू लागते. आपले मन उद्विग्न करणाऱ्या, आपल्या मनाची घालमेल करणाऱ्या गोष्टींची सापेक्षता ध्यानात येऊ लागल्यावर आपोआप त्रास कमी होतो. आपले मन अनेकदा दुखावले जाते, कारण आपण सर्व गोष्टींकडे आपल्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहात असतो. म्हणजे आपल्या सोयीने आपल्या भूमिकेतून निष्कर्ष काढतो. थोडक्यात, आपण नेहमी आपल्या ‘मीपणाचा’ चष्मा घालून वावरत असतो. उदाहरणार्थ दोन व्यक्तींमध्ये जर गैरसमज झाला असेल तर सर्वात आधी व्यक्तीपासून नाही तर मनात ज्या प्रतिक्रिया आणि जे ग्रह करून बसतो त्यापासून अंतर निर्माण करावं. त्यानंतर या परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची सापेक्षता समजून घ्यावी. दोघांनी हे समजून घ्यायला हवे की दुसरी व्यक्ती वेगळ्या परिस्थिती व मनस्थितीप्रमाणे वागत आहे. आणि त्यानंतर विवेक बुद्धीने उत्तर शोधावे. आपल्या ‘मी’ पणाच्या चाकोरीतून जगत राहिलो तर आपण अत्यंत सीमित राहू. आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते अहंकार बाजूला ठेवून शोधले तर काय धरून ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं ही कला विकसित होऊ लागेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आपलं नेमकं उलट होतं. जे धरून ठेवायचं ते सोडून देतो आणि जे सोडून द्यायचं ते धरून बसतो. अशाने होणाऱ्या‍ मनाच्या घालमेलीत आपला वेळ व शक्ती वाया जाते. पुढच्यावेळी अवघड परिस्थितीच्या चौरस्त्यावर येऊन गोंधळलात, तर प्रतिक्रिया देण्याची घाई न करता तटस्थ होऊन पाहा, सापेक्षता समजून घ्या व विवेकबुद्धीने सामोरे जा. 

कठोपनिषदात म्हटल्याप्रमाणे - 
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु | 
बुद्धिं तु सारथिं विद्धि मन: प्रग्रहमेव च || 

मनाने बुद्धीचे ऐकले पाहिजे, बुद्धीने मनाचे नाही. आपल्या मनाचे लगाम आपल्याच हाती घेऊन आपणच सारथी होऊया! 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devyani M write article about Mind

Tags
टॉपिकस
Topic Tags: