esakal | शोध स्वतःचा : श्वास...!!

बोलून बातमी शोधा

Devyani M
शोध स्वतःचा : श्वास...!!
sakal_logo
By
देवयानी एम.

अशी कोणती गोष्ट आहे जी आपण काहीही करत असलो तरी चालू असते आणि काहीही करत नसू तरीही? कुठल्याही त्रासामुळे ज्यावर सर्वांत पहिला परिणाम होतो आणि ज्यावर नियंत्रण मिळवल्याने अनेक समस्यांचं निराकरण होऊ शकतं? जी आपल्याला कोणीही शिकवावी लागत नाही, ती सतत बरोबर असते आणि ज्यावर आपलं सर्वस्व अवलंबून आहे? - श्वास. आपण एक वेळ अन्नपाण्याविना राहू शकू पण श्वासाविना नाही. शरीर अन्न-पाण्याचा साठा काही काळ तरी करू शकते, श्वासाचा नाही. इतका महत्त्वाचा हा श्वास पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्यापैकी बहुतांश जणांची श्वासोच्छ्वासाची पद्धत चुकीची असते!

ज्या श्वासाद्वारे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयव, इंद्रिय आणि पेशीपर्यंत पोषण पोहोचत असतं, तो कसा चुकतो आणि बरोबर कसा करावा हे माहीत असणं फार गरजेचं आहे. मुळात हा चुकीचा चालू आहे हेही अनेकांना माहीत नसतं.

उथळ आणि जलद

आपल्या फुफ्फुसांची ६ लिटर हवा साठवण्याची क्षमता असताना आपल्या नैसर्गिक उथळ श्वासोच्छ्वासामध्ये त्याची बहुतांश क्षमता वापरलीच जात नाही, कारण आपला प्रत्येक नैसर्गिक उथळ श्वास फक्त ५०० मि.ली इतकाच असतो. उरलेली फुफ्फुसांची क्षमता न वापरल्याने संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी मिळतो आणि वापरात नसलेल्या फुफ्फुसांच्या भागात इन्फेक्शन लवकर होऊ शकतं. घरातील प्रत्येक कोपरा वापरात आणि साफ ठेवतो तसा फुफ्फुसांचा देखील संपूर्ण वापर करून त्यांना कार्यरत ठेवावे.

मनाचा श्वासावर होणारा परिणाम

कोणतीही भावना सुखद किंवा त्रासदायक, ही सर्वप्रथम आपल्या श्वासाची गती आणि नियमिततेवर आघात करते. राग, भीती, स्ट्रेस यामुळे श्‍वास जलद आणि अनियमित होतो. तसेच आवडीचे काम करताना, आनंदात असताना, शांततेत किंवा झोपेत श्वासही संथ आणि लयबद्ध असतो. मनाच्या अवस्थेवर श्वास अवलंबून असतो पण श्वास कायम असाच उत्तेजित राहिला तर मनही शांत करणे अवघड होते आणि हे दुष्टचक्र चालूच राहते. अशाने चयापचयही नियंत्रित राहण्यास अडथळा येऊ शकतो. क्रॉनिक फटिग, पाठ-मान दुखणे, फायब्रोमायल्जिया, डिप्रेशन, अँगझायटीसारखे त्रास उद्भवू शकतात.

खांदे व छातीवर ताण घेऊन श्वास घेणे

लहान बाळाला श्वास घेताना पाहिले कधी? ते पोटाचा वापर करतं, आपण मोठे होतो आणि छातीचा वापर करू लागतो. तोंडानं श्वास घेणं किंवा छातीच्या वरच्या भागाचा व खांदे यांचा अतिवापर व्यायाम करताना आणि स्ट्रेसमध्ये होतो. परंतु चुकीच्या श्वासोच्छ्वासाच्या पद्धतीने इतर वेळी सुद्धा आपल्या नकळत अशीच पद्धत चालू राहते. योग्य श्वास घेण्याची पद्धत म्हणजे डायफ्रॅमचा वापर करणे. म्हणजे श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना आत कसा सराव करावा. दिवसातून २-३ वेळा तरी डोळे मिटून, शांतपणे, एका जागी बसून, पोटावर हात ठेऊन दीर्घ श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना पोट आत असे निरीक्षण करत काही श्वास घेण्याचा सराव करावा. याने श्वासाच्या पद्धतीत सुधारणा होऊ लागते व मनही शांत होते, आणि थोडा काळ का होईना ध्यानाचाही थोडा अनुभव घेता येईल.