शोध स्वतःचा : ...तो राजहंस एक!

देवयानी एम.
Tuesday, 19 January 2021

एक छोटीशी मुलगी होती, तिचं नाव होतं - चिनू. वेगळीच होती ती. खरंतर बाहेरून अगदी सामान्य, रूपा-रंगाने बेताची, डोळ्यावर मोठा चष्मा, आत्मविश्वास कमी, पण लाजरी नव्हती. तिला मनात माहीत होतं, की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. पण तिचं वेगळं असणं तिला व्यक्त करता यायचं नाही.

एक छोटीशी मुलगी होती, तिचं नाव होतं - चिनू. वेगळीच होती ती. खरंतर बाहेरून अगदी सामान्य, रूपा-रंगाने बेताची, डोळ्यावर मोठा चष्मा, आत्मविश्वास कमी, पण लाजरी नव्हती. तिला मनात माहीत होतं, की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. पण तिचं वेगळं असणं तिला व्यक्त करता यायचं नाही.

वर्गातल्या मुली एकट्या पाडायच्या, शाळेतल्या शिक्षिका पुढं-पुढं करणाऱ्या मुलींकडंच लक्ष द्यायच्या, सोसायटीतही तिला फार काही छान वागवायचे नाहीत, तिच्या सामान्य दिसण्यावरून तिला वाटणारा प्रचंड न्यूनगंड असं तिचं लहानपण. खेळात मात्र तिचा हात कोणी धरू शकायचं नाही. तिथं तिला ‘ती’ सापडायची. कायम स्पोर्टस्मध्ये पहिली येणारी अतिशय बोल्ड मुलगी, चिमुरडी असल्यापासूनच तिला कसलीही भीती नव्हती. रात्री उशिरा एकटी घरी चालत येऊ शकायची. अगदी पहिली-दुसरीमध्ये असल्यापासून आईला सांगायची, की मी एकटी जाईन शाळेत. रस्त्यावरच्या कोणाला तरी ‘मला क्रॉस करून द्या,’ असं सांगायची. मित्रमैत्रिणी अनेक होत्या, पण जवळचं असं कोणी नव्हता ज्यांच्याकडं सगळं मनातलं बोलता येईल. घरात, वर्गात शांत-अव्यक्त, पण गल्लीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळणार, मैदानावर धावण्यात-खेळण्यात कोणी बरोबरी करू शकत नाही, अशी ही छोटी चिनू विचित्र दुहेरी आयुष्य जगत होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ती मोठी झाली, आणखी बोल्ड झाली; पण व्यक्त अजूनही होता येत नव्हतं. कला-क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात कायम अव्वल, यामुळं नाव कमावलं पण आतून एकटीच होती. सामान्य दिसण्याचा न्यूनगंड तसाच होता. पुढं कॉलेजमध्ये गेल्यावर आजूबाजूच्या मुलींना, प्रोफेसरांना तिच्या वेगळेपणाचा राग यायचा. याचं कारण तिला खूप नंतर समजलं, की चारचौघांसारखं असण्यानं इतरांना इनसिक्युअर होत नाही. रंगात रंग मिसळल्यास सगळे कम्फर्टेबल असतात. या सगळ्यानं तिचा एकटेपणा वाढत राहिला, पण तिला कोणी थांबवू शकत नव्हतं. एका बाजूला शिक्षण पूर्ण झालं, जॉब सुरू झाला आणि दुसऱ्या बाजूला तिचा स्वतःचा शोध सुरूच होता. वेगवेगळ्या छंदांना, आवडींना, कौशल्यांना जोपासत वेळ पडेल, तेव्हा घरापासून लांब जाऊन तिनं स्वतःवर मेहनत घेतली आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास चालू ठेवला. तिला लहानपणापासूनच मोठं आणि सक्षम व्हायचं होतं. मोठी स्वप्नं बघत आणि आत्मविश्वास कसा विकसित करता येईल या विचारांनी तिनं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अस्तित्वाची मशाल पेटत ठेवली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ती अजून मोठी झाली आणि स्वाध्याय, वाचन, योग आणि प्रवास करू लागली, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढत गेला. तिला स्वतःची ओळख पटू लागली. ‘ती’च स्वतःची सर्वांत जवळची मैत्रीण झाली आणि तिला समजलं, तिनं स्वतःलाच स्वीकारायची गरज होती. आपल्या सगळ्यांचं असंच होतं, आपण बाहेर शोधत राहतो. इतरांनी आपल्याला अंतरावर ठेवलं, तरी आपण ‘स्वतःजवळ’ असल्यास त्रास कमी होतो, इतरांनी कुचेष्टा केली तरी आपण स्वतःवर प्रेम करत राहिल्यास वेदना कमी होतात.

ही गोष्ट सांगायचं कारण म्हणजे आपल्यात अशीच एक छोटी चिनू दडलेली असते. जी अजाणत्या वयापासून, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःचा शोध घेत असते. आज थोडा वेळ काढा आणि आपल्या आतल्या छोट्या चिनूला पुन्हा भेटा. आयुष्याच्या रेसमध्ये धावताना थांबा आणि बघा की छोटी चिनू आता मोठी झाली आहे, पण तिला जे हवे आहे ते मिळवून द्यायला विसरू नका. कारण आतून हळूच ती डोकावून पाहत असते. तिच्या डोळ्यातली चमक ‘भीड का हिस्सा’ होऊन घालवू देऊ नका. ती वेगळी आहे, तिचं वेगळेपण टिकवा. ही चिनू आता नोकरी करणारी असेल, बिझनेस वुमन झाली असेल किंवा गृहिणी असेल. ती वेगळीच आहे.

तू वेगळी आहेस! इतर कोणीही सांगण्याची किंवा संधी देण्याची वाट पाहू नकोस. तुझी बलस्थानं तूच शोध, तूच ठरव तुला काय करायचं आहे, तूच मार्ग काढ. तुझी स्वतःची वाट बनव आणि चाल, चालत राहा आणि घे भरारी. समाजातील अशा अनेक चिनू तुझ्या पाठोपाठ तुझा आदर्श ठेवून आत्मविश्वासाने वाटचाल करतील.

गदिमांचं एक प्रसिद्ध सुरेख काव्य आहे -
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक...
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले... 
तो राजहंस एक!

(लेखिका योगऊर्जा या संस्थेच्या संस्थापिका आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devyani M Writes about Girl