esakal | शोध स्वतःचा : फुफ्फुसे, आरोग्य आणि एजिंग...
sakal

बोलून बातमी शोधा

Devyani M

शोध स्वतःचा : फुफ्फुसे, आरोग्य आणि एजिंग...

sakal_logo
By
देवयानी एम.

गेले काही दिवस ‘सकाळ’च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व लेखांमधून तुम्ही ‘कोविड’नंतरच्या रेंगाळणाऱ्या लक्षणांसाठी व होत असलेल्या आरोग्याच्या समस्यांसाठी ‘पोस्ट कोविड रिकव्हरी’ कार्यशाळेबद्दल वाचत आहातच. ही कार्यशाळा ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्र येऊन तुमच्यासाठी खास तयार केली आहे. या दोन महिन्यांच्या कार्यशाळेचा काल पहिला दिवस होता. याची नोंदणी गेले दहा दिवस चालू होती. तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! अजूनही जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर जरूर संपर्क करू शकता.

फुफ्फुसांची क्षमता आणि लवचिकता

आपलं वय वाढतं, तसं आपल्या शरीरामध्ये ठराविक बदल व्हायला सुरू होतात हे सर्वांनाच माहीत आहे. जसे एका वयानंतर स्नायूंची क्षमता कमी होत जाते आणि हाडे ठिसूळ होऊ लागतात तसेच साधारण वयाच्या ३५व्या वर्षानंतर फुफ्फुसांची क्षमता व लवचिकता हळूहळू कमी होऊ लागते, डायाफ्रॅम कमकुवत होतो, छातीचा पिंजरा कडक व लहान होत जातो, ज्याने फुफ्फुसांचा विस्तार होण्यात अडचण निर्माण होते. या सर्वांचा परिणाम आपल्या श्वासोच्छवासावर होतो आणि श्वास घ्यायला अडचण वाटू लागते. लंग कपॅसिटी कमी होणे म्हणजे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे. अशाने आरोग्यावर, झोपेवर व एकूणच सर्व आंतरेंद्रियांच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो.

तुम्हाला निरोगी व दीर्घायुषी व्हायचं असेल, तर जेनेटिक्स, डाएट आणि व्यायाम यांचाच फक्त विचार करून पुरेसं नाही तर संशोधन सांगत आहे की फुफ्फुसांची क्षमता यावर तुमचे एजिंग अवलंबून आहे. लहान व कमकुवत फुप्फुसे ही रोगांना आमंत्रण देतात व आयुष्य अल्प करतात. वयाच्या ३० ते ५०मध्ये साधारण १२ टक्के लंग कपॅसिटी कमी होते आणि त्यापुढे आणखी लवकर ऱ्हास होऊ लागतो. एजिंगमुळं वर सांगितलेल्या दुष्परिणामांचा आपल्या हृदयावर, रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि उच्च रक्तदाब, ॲंगझायटी, पोश्चर, झोपेचे त्रास व सर्व आंतरिक इंद्रियांच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळं श्‍वास घेणं व सोडणं इतकंच कार्य श्वसन संस्थेचं व फुफ्फुसांचं नाही, तर त्या घेतलेल्या प्रत्येक श्वासाचा पेशींपर्यंत होणारा प्रवास ध्यानात घेतला पाहिजे. फुफ्फुसं ऑक्सिजन आत घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकतात इतकंच आपल्याला माहीत आहे, पण प्रत्येक श्वासाला २४०० किलोमीटरचा प्रवास करायचा असतो, इतके वायुमार्ग आपल्या शरीरात आहेत.

डायाफ्रॅम - दुसरे हृदय

दिवसातून साधारण ५०,००० वेळा वर-खाली होणाऱ्या डायाफ्रॅममुळे दररोज साधारण ७२०० लिटर रक्त शरीरभर फिरवलं जातं. हृदयापासून सर्व इंद्रियांपर्यंत शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त पुन्हा परत हृदयाकडं असे एक चक्र पूर्ण व्हायला साधारण एक मिनीट लागते. नियमित व लयबद्ध झालेलं रक्ताभिसरण सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा करते व अशुद्ध टॉक्सिन बाहेर फेकते. ही सर्व प्रक्रिया श्वासाच्या लयबद्धतेवर अवलंबून असते. श्वास बिघडला असल्यास त्याचा अतिरिक्त ताण हृदयावर पडतो. त्यामुळं तुम्ही श्वास बरोबर घेतला, म्हणजे प्राणायामाचा सराव केला, तर हृदयावरचा ताण कमी होणार आहे. मी अनेकांचा उच्च रक्तदाब प्राणायामाच्या अभ्यासाने कमी झालेला आणि गोळ्यांवरचं अवलंबित्व कमी झालेलं पाहिलं आहे. जसं ‘Gut is the second brain’ म्हणतात तसंच ‘Diaphragm is the second heart’ उगाच म्हणत नाहीत.

या सगळ्यासाठी Pulmonary Rehabilitation म्हणजे श्वसनसंस्थेचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आहे. छोटे, उथळ व अनियमित श्वास ब्लड प्रेशर व हार्ट रेट वाढतात. स्ट्रेस हॉर्मोन ‘कॉर्टिसॉल’ वाढतो आणि एजिंग लवकर होते. मेंदूलाही पुरेसा ऑक्सिजन नाही पुरवला गेला, तर मेंदूतील पेशी पाच मिनिटांच्या आत मरू लागतात. श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था या दोन्हींचा समतोल राखला गेला, तर आरोग्यही संतुलित राहील. खेळाडूंमध्येही श्वसन व्यवस्थित राहिल्याने त्यांची रिकव्हरी लवकर होते. प्राणायामाने श्वासाची सुधारणा तर होईलच त्याचबरोबर फुप्फुसांची लवचिकता, क्षमता, डायाफ्रामची लवचिकता, श्वसन संस्थेतील स्नायू व अवयव आणि त्यांची रचना योग्य ठेवली जाईल.

असे करा श्वसनाचे पुनर्वसन

  • धूम्रपान करू नका

  • वायू प्रदूषणापासून दूर राहा

  • नियमित व्यायाम करा

  • वजन कमी ठेवा

  • अति झोप आणि एका जागी

  • दीर्घकाळ बसणे टाळा

  • तोंडाने श्वास न घेता नाकाने घ्या

  • प्राणायाम करा

loading image