शोध स्वतःचा : चित्र आनंदाचे...

आनंदाची खरी ओळख आपल्या आतच होत असते. मी क्षणिक आनंदाबद्दल बोलत नाहीये. अखंड टिकणाऱ्या मनाच्या प्रसन्नतेबद्दल बोलत आहे.
Happy
HappySakal

‘मला प्रमोशन मिळालं, की मी आनंदी होईन’, ‘मोठं घर झालं, स्वतःची मोठी गाडी घेतली, की मी आनंदी होईन’, ‘लग्न झालं की मी आनंदी होईन’, ‘मूल झालं की मी आनंदी होईन’, ‘आणखी पैसे मिळाले की मी आनंदी होईन’, ‘जरा व्यवसायात जम बसला की मी आनंदी होईन’, ‘हा जॉब सोडून दुसरीकडे जॉइन झालो की आनंदी होईन’, असं आपलं सारखं होत असतं, नाही का? आनंदाला उद्यावर ढकलून किंवा कोणत्याही बाह्य गोष्टीवर त्याला अवलंबून ठेवून ती गोष्ट होईपर्यंत चालढकल करण्याची जणू आपल्याला सवयच लागलेली असते. लहानपणी आई किंवा बाबा म्हणायचे ना, ‘चांगले मार्क पडले की तुला बक्षीस देईन,’ असं काहीतरी मिळाल्याशिवाय आपण आनंदी होऊ शकत नाही अशी आपली मानसिकता होऊन जाते.

आतून प्रसन्न व्हा

आनंदाची खरी ओळख आपल्या आतच होत असते. मी क्षणिक आनंदाबद्दल बोलत नाहीये. अखंड टिकणाऱ्या मनाच्या प्रसन्नतेबद्दल बोलत आहे. खरंतर काहीतरी मिळालं, तरच आनंदी होऊ ही विचारधारा चुकीची आहे, किंबहुना काहीही साध्य करायचं असेल तर आधी आनंदी आणि प्रसन्न मन असणं ही त्या ध्येय गाठण्यासाठीची प्राथमिक गरज आहे. अशी मुळातच आतून प्रसन्न असणारी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत तिच्या आनंदाला कमीत कमी धक्का लागेल असंच जगते. नाहीतर विचार करा, जरा काही झालं की ‘मूड ऑफ’ झाला, दोन दिवस चेहरा पडलेला घेऊन वावरणे याला काय अर्थ आहे? कारण बाह्य परिस्थिती व इतरांचं वागणं आपल्या हातात नाही. फुलांचं काम आहे उमलणं आणि सुगंध पसरवणं. आजूबाजूला काय चालू आहे हे बघण्यात फुलं त्यांचे सौंदर्य व सुगंध वाया घालवून त्यांच्या अस्तित्वाचा आनंद वाटण्यात दिरंगाई करत बसत नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्याची व्याख्या ‘Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease’ अशी आहे. रोगरहित जीवन हेच आणि इतपतच फक्त आरोग्य असू शकत नाही, तर जीवनाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक पातळीवरचा दर्जा वाढवण्याचे ध्येय असणे, हे खरे आरोग्य! तसेच फक्त दुःखरहित जीवन याला आनंद म्हणू शकत नाही, कारण जीवनात दुःखच नाहीत असं होऊ शकत नाही, तर कोणत्याही अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदानं, शांतीनं, प्रसन्नतेनं जगता येणं अपेक्षित आहे. अर्थात, हे जाणीवपूर्वक विकसित करावं लागतं.

नाज़िम हिक़मत या तुर्की कवीनं त्याच्या प्रसिद्ध चित्रकार मित्राला, अबिदीन दिनोंला, आनंदाचं चित्र काढायला सांगितलं. त्यावर त्यानं काय चित्र काढलं असावं? एक गरीब कुटुंब, लहानशा खोलीत, ज्यात आई-वडील व त्यांची मुलं पाळलेल्या कुत्र्यासह, एकाच तुटलेल्या पलंगावर, गळणाऱ्या छताखाली, एकमेकांना बिलगून एकाच चादरीखाली झोपले आहेत. पण त्या सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता दिसत आहे. त्याही परिस्थितीत ते सर्व चेहरे शांत व प्रसन्न होते. या उदाहरणावरून असे म्हणावेसे वाटते, की वेदना, भोग, दुःख आयुष्यात नाही म्हणजेच आनंद असे नाही. तर ते असूनसुद्धा शांतीयुक्त प्रसन्नतेत समाधानी राहणं हेच आहे खरं अखंड आनंदात राहणं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com