शोध स्वतःचा : कल करे सो आज...

मी आज तुम्हाला एक छोटासा टास्क देणार आहे. डोळे बंद करा आणि विचार करा, की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायची खूप इच्छा आहे.
Devyani M
Devyani MSakal

मी आज तुम्हाला एक छोटासा टास्क देणार आहे. डोळे बंद करा आणि विचार करा, की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायची खूप इच्छा आहे, तुमच्यात क्षमता आहे पण कुठल्यातरी कारणामुळे तुम्ही ती करू शकत नाही. दोन मिनिटं वेळ घ्या आणि शोधा. उघडा डोळे, सापडलं? एक तरी अशी गोष्ट असेलच, की जी तुम्हाला साध्य करण्यात काहीतरी अडथळा जाणवत आहे. आत्मविश्‍वास कमी पडतो, धैर्य कमी पडतं, पैसे नाहीत, लोक काय म्हणतील याची लाज वाटते, अपयशाची भीती, नीट नाही जमलं तर, मला झेपेल का, वेळ मिळत नाही, ओळखी नाहीत, एनर्जी कमी पडते, इच्छाशक्ती कमी पडते, वय पुढं गेलं असं वाटतंय... यांपैकी काय आड येतंय? आता पुन्हा डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुमच्या जीवनाचा अल्पावधीच उरला आहे आणि या उरलेल्या कमी वेळात तुम्हाला शक्य असेल तेवढं कार्य करायचं आहे. काय विचार येतो मनात? असं वाटतंय का, ‘वेळ इतका कमी आहे की आता कोण काय म्हणेल याची फिकीर नाही फक्त उडी मारायची आणि जे होईल ते होईल, किमान मनात आहे ते केलंच नाही याची खंत तरी राहणार नाही, वेळ होता पण मी प्रयत्नच केला नाही असं तरी वाटणार नाही...’

कामाला लागा...

प्रॉब्लेम हा आहे, की आपल्याला वाटतं आपल्याकडं वेळ खूप आहे. आपल्याकडं असलेल्या वेळेची मर्यादा समजून घेतली, तर वर दिलेल्या अडचणींना काही अर्थच उरणार नाही. ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात जेव्हा मिल्खा सिंगजींना विरोधी पक्षातला अधिकारी म्हणतो, ‘ये तुम्हारी आखरी रेस हो सकती है,’ त्यावर मिल्खासिंग उत्तर देतात ‘दौडुंगा भी वैसे ही.’ आता पुन्हा डोळे बंद करा आणि कल्पना करा, की आजच्या सारखी संधी पुन्हा मिळणार नसल्यास हा दिवस ढकलाल, की हाती आहे ते कर्म nothing but excellence, म्हणजे उत्कृष्ट दर्जाचंच करेन, असं म्हणाल?

आपण अनेक वर्ष ‘संधी चालून येते.. चालून आलेली संधी,’ अशी वाक्ये ऐकली आहेत. पण खूपदा संधी येत नाही, तर ती निर्माण करावी लागते किंवा संधीपर्यंत आपल्यालाच जावं लागतं. खरंतर प्रत्येक क्षणात संधी असते - आरोग्य सुधारण्याची, वेळेचा अपव्यय टाळण्याची, विचार सुधारण्याची, आळस झटकून टाकण्याची, स्वतःवर मेहनत घेण्याची, कौशल्यांना आणखी धार लावण्याची... ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ म्हटलं जातं. पण आपलं ‘आज करे सो कल (उद्या)’ असं असतं. आपल्याला माहीत आहे की उद्या कधीच येत नाही. कारण फाजील मनाला रोज आयुष्य उद्यावर ढकलण्याची सवय होते. मित्रांनो, उद्या विसरा, जे आहे ते आजच आहे आणि आत्ताच अशा वृत्तीने कामाला लागा.

यशस्वी जीवनासाठी काही गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत

  • वचनबद्धता - जे ठरवाल त्या ध्येयाप्रती वचनबद्ध राहा आणि ते साध्य होईपर्यंत थांबू नका

  • टिकून राहा - कितीही अडचणी - अडथळे आले, अनपेक्षित वळणे आली तरी मार्ग काढून टिकून राहा

  • जबाबदारी - तुमच्या मार्गात जे काही येईल त्याची पूर्ण जबाबदारी घ्या. कारणे शोधून कोणालाही दोष देऊ नका

  • परिश्रम - कष्टाला परिश्रमाला घाबरू नका. आळस करू नका

  • प्रबळ इच्छाशक्ती - बाह्य प्रोत्साहनावर खूप अवलंबून राहता येत नाही. आतला साठा वाढवा

  • आत्मविश्वास - स्वतःवर आणि वैश्विक शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा

  • स्वतःची काळजी - व्यायाम, आहार, झोप, विश्रांती, सकारात्मकता यांना कमी लेखू नका. शेवटपर्यंत याच साथ देणार आहेत

  • शिकत राहा - शिकणे कधीच संपत नाही, आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असं होऊ शकत नाही. चुकांमधूनही शिकत राहा

भगवद्गीतेत म्हटलं आहे उद्धरेत् आत्मना आत्मानम्... आपणच आपला उद्धार करून घायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com