शोध स्वतःचा : मनातला पसारा

आपल्या सर्वाना कायम चांगल्या गोष्टी हव्या असतात. आपलं आणखी चांगलं व्हावं, आपली प्रगती व्हावी, आणखी वरच्या पातळीवर आयुष्य जावं, कामात आणि वैयक्तिक जीवनातही.
Devyani M
Devyani MSakal

आपल्या सर्वाना कायम चांगल्या गोष्टी हव्या असतात. आपलं आणखी चांगलं व्हावं, आपली प्रगती व्हावी, आणखी वरच्या पातळीवर आयुष्य जावं, कामात आणि वैयक्तिक जीवनातही. विचार चांगला आहे. यासाठी आपण प्रयत्न ही करत असतो. कधी ते कमी पडतात, मग पुन्हा शक्ती लावून प्रयत्नांचा जोर वाढवावा लागतो. हे चालूच राहतं. परंतु याच्या आड काही गोष्टी येतात. त्यातील एकाचा आज विचार करूया. कोणत्याही विषयातील प्रगतीच्या आड येते - गर्दी, गोंधळ, अव्यवस्थितपणा, पसारा, ज्याला इंग्रजी मध्ये ''clutter'' म्हणतात. आपल्या आयुष्यात-रोजच्या जीवनात आपणच साठवलेला पसारा असतो. जसे कोणीतरी जागा अडवून ठेवावी, ज्यामुळे पुढे जाता येऊ नये अशी गर्दी ठिकठिकाणी आपणच करून ठेवतो.

Declutter

आता एक काम करा, तुमचं कपाट उघडा आणि बघा त्यातील किती कपडे व वस्तू अशा आहेत ज्यांना महिनोंमहिने हातही लावला नाहीये. कपाट भरलं असलं, तरी कित्येकदा ‘अरे घालायला काहीच कसं नाही,’ असा प्रश्न तुमच्यापैकी बहुतांश लोकांना पडत असणार आहे. हे वाक्य वाचून तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलंच आहे. आता फ्रिज उघडा आणि पाहा किती भांडी व डबे अनेक आठवडे तसेच आत पडून आहेत. ‘फ्रिज अगदी भरलाय’ असं होतं, पण खाण्याजोगे कमीच आहे त्यात. जे आपल्याला हवं आहे ते सोडून इतर अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, अशानं गर्दी कमी होऊन स्वच्छ, स्पष्ट, सोपं वाटतं व व्यवस्थितपणा येतो.

अशीच गर्दी व पसारा आपण आपल्या मनातही करत असतो. मनातला पसारा आणि विस्कटलेपणा बाह्य आयुष्यात पसारा व विस्कटलेपणा निर्माण करतो. कुठल्याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नाही. अनेकदा तुम्हाला असं वाटलं असेल, की मन अगदी विचारांनी भरून गेलं आहे आणि खूप साऱ्या विषयांनी जड झालं आहे. असं खूप काही चालू आहे अशी अवस्था एक सिग्नल आहे - असं समजा मनाला ‘डी-क्लटर’ करण्याची गरज आहे. जितकं जीवन सोपं, साधं, हलकं आणि फापटपसाऱ्या विरहित असेल, तितकं आनंदी होईल. अनेकदा असं होतं, की काही गोष्टी व प्रसंग आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या असतात. खरं आहे! परंतु त्यातही हार मानून असंच चालू ठेवण्यापलीकडं उपाय नाही अशी पराभूतता येऊ न देणं हे आपल्या हातात आहे. खरंतर आपली क्षमता आपल्याला वाटते त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त असते. पण जी गोष्ट आजवर केली नाही, ती पुढंही करू शकणार नाही अशा गैरसमजात आपण राहतो. तो गैरसमज मोडा आणि एकदा न केलेली गोष्ट करून तर बघा.

If you want to travel far, pack less

ही मनातली गर्दी काय करते, तर लिफ्ट घेऊन दहाव्या मजल्यावर जायचं असल्यास डायरेक्टली दहावं बटण दाबता येतं किंवा प्रत्येक मजल्याचं बटण दाबून त्या त्या मजल्यावर उगीच रेंगाळत दहा वेळा लिफ्ट थांबवून वेळ वाया घालवू शकतो. मनाला डी-क्लटर करा आणि जिथं तुम्हाला जायचंय त्या अंतिम मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचा. आपलं मन अत्यंत शक्तिशाली आहे. उद्देशापर्यंत ते आपल्याला पोहोचवू शकतं आणि त्यापासून भरकटवूही शकतं. असं सतत मनानं उगाच बिझी राहणं हानिकारक आहे. हेच आपल्या प्रगतीच्या आड येतं. आयुष्यातील माणसं, वस्तू, वेळ, पैसा, एनर्जी याबाबतीत सिलेक्टिव्ह राहायला हवं. मनाचा पसारा आवरला नाही, तर महत्त्वाच्या गोष्टींकडं दुर्लक्ष होतं आणि त्यांना आपण न्याय देऊ शकत नाही. सगळीकडेच अर्धवट जगत राहतो. खरंतर जीवन जगताना खूप कमी गोष्टींची खरी गरज असते. फार भारंभरती न केल्यानं काहीच फरक पडत नाही. याची प्रचिती गेल्या दीड वर्षात आली आहेच. कित्येक महिने अत्यावश्यक वस्तू व सेवा मिळत होत्या. काय फरक पडला दैनंदिन जीवनात? फार नाही. जगायला लागतं ते मिळत होतं, जे मिळत नव्हते, ते होते मनाचे चोचले.

कसा आवराल पसारा?

१. जरा पॉज घेऊन पाहा, काय चालू आहे.

२. पसारा आहे आणि तो कमी करायला हवा, हे स्वीकारा.

३. सगळ्या गोष्टींवरचा ताबा जरा सैल सोडा.

४. काय महत्त्वाचं यावर वेळ व एनर्जी फोकस करा, निश्चय पक्का ठेवा.

५. कोणत्या वेळी काय करायला हवं, याची प्रायॉरिटी समजून घ्या.

६. स्वतःला धारेवर न धरता, पण मनाचे फाजील लाडही न पुरवता; ज्याची गरज नाही त्यांना धरून न ठेवता अक्षरशः बाहेर काढून टाका.

Let it go!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com