शोध स्वतःचा : मनाचं भिरभिरलेपण थांबवण्यासाठी...

मागच्या आठवड्यात माझ्या एका मित्राशी फोनवर बोलताना तो मला म्हणाला, ‘आजकाल झोप नीट होत नाहीये.’ मी कारण विचारल्यावर म्हणाला, ‘कळत नाही का, पण विचार थांबत नाहीत.
Devyani M
Devyani MSakal

It is the inner that can control the outer.

The outer will be wise to obey.

- Shri Nisargdatta Maharaj

मागच्या आठवड्यात माझ्या एका मित्राशी फोनवर बोलताना तो मला म्हणाला, ‘आजकाल झोप नीट होत नाहीये.’ मी कारण विचारल्यावर म्हणाला, ‘कळत नाही का, पण विचार थांबत नाहीत. कधी झोप लागायला वेळ लागतो तर कधी पडल्या पडल्या झोप लागते पण मध्येच जाग येते आणि पुन्हा विचार चालू होतात. मग खूप वेळ जागा असतो, काय करू?’ अशी तऱ्हा अनेकांची आहे, नाही का? निसर्गानं दिलेल्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठीच्या अतिशय सुंदर, महत्त्वपूर्ण आणि फुकट अशा ‘झोप’ या उपचारावरच स्ट्रेस (विचार) घाला घालत आहे. झोपेचा उद्देशच पराभूत होतो आणि असं विषारी चक्र चालू राहतं. यावर मात करायची कशी? यासाठी क्विक सोल्यूशन म्हणून आपण तेवढ्यापुरता मार्ग काढतो. पुस्तक वाचतो, टीव्ही पाहतो, मोबाईलवर काहीतरी बघत बसतो. अशानं अखेरीस मेंदू थकून झोपी जाईलसुद्धा, पण तो उपाय नाही. असे शॉर्ट टर्म उपाय आपल्या जगण्याच्या आड येणार नाहीत, पण आरोग्यास अतिशय घातक ठरतील.

रोजचा स्वाध्याय गरजेचा

परीक्षेच्या दिवशी अभ्यास सुरू करून चालत नाही, तो आधी करावा लागतो; तरच विषय समजून परीक्षेत मांडू शकू. तसेच, रात्री मनातले विचार थांबावेत आणि विश्रांती मिळावी यासाठी त्याची प्रॅक्टिस दिवसा केली पाहिजे, तेही दररोज! कसं ते पाहू. सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरू आहेत, पण हे खेळाडू एकदम फ्लाइट घेऊन स्पर्धेत उतरले का? नाही! ते दररोज, महिनोंमहिने, वर्षानुवर्षं स्वतःवर मेहनत घेऊन स्वतःला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करतात. तसंच आपण दररोज काही गोष्टी mind-body co-ordination साठी पाळल्या, नेमानं केल्या तर रात्री हेच शरीर व मनाचं समन्वय उत्तम झोपेचं उत्तर ठरेल. दिवसातील काही वेळ अगदी ठरवून योगासने, प्राणायाम आणि ध्यान करायलाच हवं. या सरावाच्या काळात आपण जाणीवपूर्वक मन आणि शरीर यांचे संतुलन करण्याचा सराव करतो. किंबहुना योगातील या पद्धतींचा उद्देशच आपल्या व्यक्तिमत्त्वात समत्व आणणे हा आहे. विविध आसनांच्या माध्यमातून शरीराचा समतोल, विविध प्राणायामांच्या साहाय्याने श्वासाच्या माध्यमातून मनाचे नियमन. आणि मग हे स्थिरावलेलं शरीर व मन ध्यानावस्थेत शिरते. काही काळ या स्तब्धावस्थेत राहण्याची आणि मनाला चलबिचल न करता जरा थांबण्याची हळूहळू सवय लागू लागते. हा प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक केलेला रोजचा सराव खूप दूरपर्यंत साथ देईल, हे नक्की. याचबरोबर रोजचा स्वाध्याय होणं गरजेचं आहे. काय वाचावे, तर ज्यानं व्यक्तिमत्त्वाला वळण लागेल, विचारांना योग्य दिशेनं चालना मिळेल आणि आत्मविकास होईल असे. म्हणूनच त्याला वाचन न म्हणता स्वाध्याय म्हणूया.

Continuous Partial Attention

आपलं मन भिरभिरं का आहे? तर सध्या आपल्यापैकी अनेकांचं लक्ष सगळीकडंच अर्धवट असतं. म्हणजे फोनवर मेसेज टाइप करता करता आईशी बोलतो, त्यात समोर टीव्ही चालू.. किंवा सोशल मीडियावर काहीतरी पाहता पाहता जेवतोय आणि दुसरीकडं ईमेल वाचून रिप्लाय करतोय. म्हणजेच, कोणत्याही एका गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित नाही, सगळ अर्धवट. याला Continuous Partial Attention असं म्हणतात. आज जगात ८० टक्के लोकांमध्ये हा विखुरलेपणा आहे. हा Continuous Partial Attention स्वभाव बनत जातो आणि हे मनाचं भिरभिरलेपण डोळ्यात दिसू लागतं. मी हे अनेकांच्या डोळ्यात पाहते. आपले डोळे हे व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. आत काय चाललंय ते कितीही लपवलं तरी डोळ्यातून बाहेर दिसतंच आणि समजणाऱ्यांना समजतं. समोरचाही भिरभिरा असेल तर प्रश्नच नाही म्हणा!

हे मनाचं विखुरलेपण आरोग्यास हानिकारक आहे. याने स्ट्रेस वाढतो व श्वास बिघडतो, हे दोन्ही घटक शारीरिक व्याधींना जबाबदार ठरतात. मल्टिटास्किंग 'cool' आहे असं दाखवणाऱ्या संस्कृतीत, लक्ष एका ठिकाणी पूर्ण केंद्रित करायला जमलं, तर तुम्हाला समजेल की खरी मजा एकाग्र केलेल्या चित्तात आहे. कारण या एकाग्रतेत केलेलं कोणतेही कर्म पूर्ण समाधान देणारं असेल आणि समाधान असेल तिथं शांती असणारच. आता विचार करा दिवस संपल्यावर बिछान्यावर झोपताना आपल्याला शांतताच तर हवी आहे ना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com