esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Devyani M
शोध स्वतःचा : शॉर्टकट नको..

शोध स्वतःचा : शॉर्टकट नको..

sakal_logo
By
देवयानी एम., योगप्रशिक्षक

माझा एक अमेरिकेत राहणारा क्लाएंट आहे. लग्नासाठी तो भारतात येणार होता. फ्लाइट बुक केल्यावर त्यानं मला लगेच विचारलं, ‘‘वीस दिवसांनी मी भारतात येतोय, तोपर्यंत माझी double chin जाईल असं काही शिकवता का?’’ माझ्या स्टुडिओमध्ये अनेक वेळेला मुली-स्त्रिया येऊन विचारतात, ‘‘योग केल्यानं वजन कमी होईल का?’’ मी म्हणते, ‘‘नक्की होईल.’’ ‘‘किती दिवसांत होईल?’’ असं लगेच पुढचा प्रश्न. मी जरा शास्त्रशुद्ध उत्तर दिलं, की लगेच त्या विचारतात, ‘‘पण तरी किती किलो किती दिवसांत कमी होईल?’’

असं काटेकोरपणे आपण कधी जगतो, की आपल्या गरजेच्या वेळेला आपल्याला काटेकोर उत्तराची अपेक्षा असते? मुळात कोणतातरी प्रसंग आहे म्हणून फिट दिसायचंय असा आटापिटा करण्यापेक्षा आपली जीवनशैली आणि दिनचर्या अशी आखून घेतली, की फिटनेस हा आयुष्याचा भागच आहे, तर असं डेडलाइन ठेवून फिट होण्याची गरज पडणार नाही.

भूक लागल्यावर आपण बाजारात जाऊन सामान आणतो का? पोटाची गरज भागवायला आपल्या घरात तयारी असतेच. मग लग्न किंवा कोणत्या समारंभासाठी फिट दिसण्यासाठी त्या बिचाऱ्या पंधरा-वीस-तीस दिवसांवर इतका लोड का द्यायचा? जीव खाऊन एक वेळ आपण व्यायाम करू, कमी खाऊ; पण याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होईल. त्यात अशा डेडलाईनच्या प्रेशरमध्ये काम करून जो स्ट्रेस वाढणार आहे, त्यानं तुमच्या प्रयत्नांमध्ये आणखीनच बाधा निर्माण होणार आहे.

Discouragement is the biggest Demotivator.

मुळात आपण झटपट रिझल्टची अपेक्षा करणंच अपयशाला आमंत्रण देणं आहे. कोणतीही गोष्ट करत राहण्यामागे त्या विषयात थोडं का होईना यश मिळणे आवश्यक आहे, तरच आपला मेंदू ते पुढेही करत राहण्याचं बळ देतो. कोणत्याही विषयात यश हे दीर्घकाळ आणि सतत केलेल्या प्रयत्नांनी आणि परिश्रमांनी मिळतं. इन्स्टंट रिझल्टच्या नादात आपण लक्ष फक्त डेस्टिनेशनवर ठेवतो, पण जर्नीशिवाय डेस्टिनेशन नाही हे विसरतो.

माफक खाणं, घरचं सात्त्विक जेवण; भूक लागली तरंच खावं- मनाच्या करमणुकीसाठी नाही; करमणूक बाजूला ठेवून वेळेवर आवश्यक झोप घेणं, नियमित व्यायाम करणं हे सगळं फिट होण्या व राहण्याच्या डेस्टिनेशनसाठीचा जो प्रवास करायला पाहिजे त्याचा भाग आहे.

धो-धो पडणारा पाऊस बराचसा वाहून जातो. जमिनीत मुरायचा असेल, तर त्याची संततधार पडली पाहिजे. तसेच आपले प्रयत्नसुद्धा सातत्याचे हवेत.

पेरणी केली, की शेत लगेच येत नाही, ते उगण्यासाठी अवधी दिला पाहिजे; तसंच आपल्यातली प्रगती दिसायला प्रयत्नांची पेरणी, त्यांना शिस्तीची निगराणी केली, तर हवे ते बदल दिसायला लागतील. आपणही निसर्गातूनच आलो आहोत त्यामुळे आपल्या शरीर-मन-बुद्धीचा विकास अनैसर्गिक पद्धतीनं कसा काय होईल?

पार्लरमध्ये जाऊन बाहेरून डागडुजी करून लगेचच फ्रेश दिसू आपण एक वेळ; पण मुळापासून आपल्यात परिवर्तन व्हायला हवं असेल, तर शॉर्टकटचा दृष्टिकोन ठेवून अजिबात चालणार नाही.

loading image
go to top