शोध स्वतःचा : प्रतिपक्ष भावना आणि स्वच्छ मन!

तुमच्याही आयुष्यात असे दिवस आले असती,ल की डेड एन्डला पोहोचलो, असं वाटत असेल, आपल्याला हवं तसं होत नाहीये, काही गोष्टी ठीक झाल्या नाहीत.. अशावेळी लक्षात ठेवा तुमच्या दिवसाचे व आयुष्याचे पायलट तुम्हीच आहात. सगळं आपोआप ठीक होईल, याची वाट पाहत बसू नका.
शोध स्वतःचा : प्रतिपक्ष भावना आणि स्वच्छ मन!
शोध स्वतःचा : प्रतिपक्ष भावना आणि स्वच्छ मन!sakal

काही दिवसांपूर्वी एक दिवस असा आला, जेव्हा सकाळपासून ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्यांच्यामुळं असं वाटू लागलं की आजचा दिवस काही नीट चालला नाहीये. पण ‘आजचा दिवसच खराब आहे,’ हे वाक्य मला अजिबात पसंत नाही आणि प्रयत्न न करता परिस्थितीला सरेंडर करणं मला पटत नाही. त्यामुळं कटाक्षानं मी ते मनातही म्हणण्याचं टाळलं. मात्र, छान वाटत नव्हतं आणि थोडी नकारात्मकता येऊन उमेद कमी झाल्यासारखं वाटलं. त्या माझ्या मनाच्या अवस्थेला मी जरा निरखून पाहिलं आणि लगेच विचार केला, की दिवस सुरू होऊन काहीच तास झाले आहेत, आणखी बरंच काही घडू शकतं किंबहुना मी ते घडवून आणू शकते. पुढचा दिवस कसा जाईल हे सर्वस्वी माझ्या हातात आहे, असं म्हणून त्याक्षणी पॅसेंजर सीट वरून ड्रायव्हर सीटवर आले आणि ‘I can turn this day around’ असं स्वतःला ठामपणे सांगितलं. ‘कर्मण्येवाधिकारस्ते..’ कर्म करण्याचा पूर्ण अधिकार मला आहे, हे ठरवलं आणि सूत्र हातात घेतली. तुमच्याही आयुष्यात असे दिवस आले असती,ल की डेड एन्डला पोहोचलो, असं वाटत असेल, आपल्याला हवं तसं होत नाहीये, काही गोष्टी ठीक झाल्या नाहीत.. अशावेळी लक्षात ठेवा तुमच्या दिवसाचे व आयुष्याचे पायलट तुम्हीच आहात. सगळं आपोआप ठीक होईल, याची वाट पाहत बसू नका.

विचार सकारात्मकच ठेवा

बाहेरच्या गोष्टींमुळे, विषयांमुळे, माणसांमुळे आपल्या मनावर रोज दर काही मिनिटाला पडसाद उठत असतात. काही पॉझिटिव्ह, तर काही निगेटिव्ह. पॉझिटिव्ह विचार व भावना असतील, तर चित्तात प्रसन्नता असते, छान व हलकं वाटतं. पण निगेटिव्ह विचार व त्यानं उत्पन्न झालेल्या भावभावना अतिशय त्रासदायक असतात आणि मन अस्वस्थ होऊन जातं. ही परिस्थिती आपल्या सर्वांवरच कधी ना कधी येते. ह्याला कोणीही अपवाद नाही. अशावेळी हे अप्रसन्न, अस्वस्थ, दु:खी, जड मन घेऊन कोणतेच काम नीट करू शकत नाही. मन खात राहतं. कोणी आपलं मन दुखावलं, तर त्याचा राग येतो, कोणाचं आपल्यापेक्षा खूप चांगलं चाललं असेल तर स्पर्धात्मक भावना तयार होते, मग त्यातून द्वेष उत्पन्न होतो. ही भावना टोकाला गेली, तर दुसऱ्याचं वाईट व्हावं असं वाटू लागतं. या सर्वांचा त्रास आपल्यालाच होतो. यातून सुटका कशी करून घ्यावी आणि आपल्या मूळ शांत-प्रसन्न मनःस्थितीला कसं यावं, तर महर्षी पतंजली यांच्या भाषेत ‘वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम्’. म्हणजे, जेव्हा जेव्हा मनात असे नकारात्मक, अशुभ विचार येतील, तेव्हा त्यांच्या अगदी विरोधी विचारांवर लक्ष ठेवून त्यावर मन केंद्रित करा. उदाहरणार्थ, कोणामुळं आपण दुखावलो गेलो तर त्यांचा राग येतो.

या क्रोधाला शांत करायला त्या व्यक्तीतील चांगल्या गुणांवर, तुमच्या त्या व्यक्तीबरोबरच्या चांगल्या आठवणींवर, त्यांनी आजवर केलेल्या चांगल्या कृतींवर लक्ष वळवा. हळू हळू राग शांत होईल. श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्रकार बाबा बेलसरे यांच्या ‘आनंद साधना’ या पुस्तकात ते म्हणतात, ‘मनातील द्वेष नामस्मरणाला भाजतो आणि साधनेला जाळतो.’ मनात विविध विचार येणं नैसर्गिक असलं आणि वेळोवेळी अशा टोकाच्या भावना उत्पन्न झाल्या, तरी त्यांच्यात मन रेंगाळू न देणं यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. स्वयंसूचना देऊन प्रतिपक्षभावना म्हणजे शत्रुत्व, क्रोध, द्वेष, तीव्र नावड, हिंसा या वितर्कांची बाधा होईल तेव्हा त्यांची तीव्रता कमी करून, त्यांना नाहीसे करण्यासाठी सद्भावना, मैत्रीभावना, समोरच्यातील सद्गुण यांवर मन वळवावे. असे वारंवार केल्याने अशा अशुभ व नकारात्मक विचारांचे पुन्हा पुन्हा उचंबळ येणं कमी होऊ लागतं. काही काळ हे प्रयत्नपूर्वक केल्यानं कोणतंही निमित्त घडलं, तरी त्या भावना जागृत न होता शुभ वृत्तीलहरींमुळं दबलेले राहतात किंवा उत्पन्न झालेच तरी फारशा प्रयत्नांची आवश्यकता न लागता ते सहजच क्षीण व्हायला लागतात.

अशा नकारात्मक वृत्ती कायम ट्रिगर होत राहिल्या, तर आपण कायम कोणाशी ना कोणाशी मानसिक युद्धच करत राहू. पुढच्या वेळी तुमच्या मनात अशा विचारांनी थैमान घातलं, तर त्याचं मूळ शोधून काढा आणि त्यात गुरफटून राहून मनातील विष शरीरभर पसरण्याआधीच स्वयंसूचनेद्वारे ‘प्रतिपक्षभावना’ या मंत्राची मदत घेऊन मन पुन्हा स्वच्छ करा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com