प्लॅन करण्यात आयुष्य घालवू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Don t spend your life planning Life should go according to plan

एखादा प्लॅन म्हणजे केवळ एक कल्पना आहे आणि आपले सगळे प्लॅन आपल्याला आधीच जे माहीत आहे, त्यातून निर्माण होतात. आपले प्लॅन म्हणजे भूतकाळाचीच एक सुधारित आवृत्ती असते.

प्लॅन करण्यात आयुष्य घालवू नका

प्रश्न : मी माझं आयुष्य प्लॅन करत असतो आणि मीच त्या प्लॅनमध्ये इतका हरवून जातो, पण तरीही गोष्टी मला हव्या त्याप्रमाणे घडत नाहीत. मी काय करावे?

सद्‌गुरू : प्लॅन तुम्ही तुमच्या मनात करता, पण तुम्ही काम करू शकता ते केवळ आत्ता तुमच्या हातात काय आहे त्यासोबत. तुम्ही किती वेळ प्लॅन करण्यात घालवता आणि तुम्ही किती काम करता हे प्रत्येकाने त्यांच्या जीवनाच्या स्वरूपावरून ठरवले पाहिजे. तुम्ही प्लॅन करणाऱ्या टीमचा भाग असाल, तर तुम्ही फक्त प्लॅनच करता - कारण तेच तुमचे काम आहे. ते प्रत्यक्षात उतरवणे इतर कुणाचे तरी काम आहे. तुमच्या कामाची प्रकृती काहीही असो, जीवनाचे स्वरूप असे आहे, की तुम्ही फक्त आत्ताच खाऊ शकता, तुम्ही फक्त आत्ताच श्वास घेऊ शकता, तुम्ही फक्त आत्ताच जगू शकता. प्लॅनदेखील तुम्ही फक्त आत्ताच करू शकता. तुम्ही उद्याबद्दल प्लॅन करू शकता, पण तुम्ही उद्याचा दिवस प्लॅन करू शकत नाही.

जीवन प्लॅननुसारच घडावं?

एखादा प्लॅन म्हणजे केवळ एक कल्पना आहे आणि आपले सगळे प्लॅन आपल्याला आधीच जे माहीत आहे, त्यातून निर्माण होतात. आपले प्लॅन म्हणजे भूतकाळाचीच एक सुधारित आवृत्ती असते. एखादा प्लॅन म्हणजे भूतकाळाचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडासा मेकअप चढवण्यासारखे आहे. जगण्याचा हा अगदी क्षुद्र मार्ग आहे. होय, आपल्याला प्लॅनची गरज आहे, पण तुमचे आयुष्य तुमच्या प्लॅननुसार घडले, याचा अर्थ तुम्ही क्षुद्र जीवन जगला आहात. तुमचे जीवन अशा प्रकारे घडले पाहिजे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

जीवनाची शक्यता इतकी अफाट आहे, की कुणीच तेवढे सगळे प्लॅन करू शकत नाही. तुमच्यापाशी प्लॅन असलेले चांगले आहे, पण तुम्ही जीवनाला घडू दिले पाहिजे. या क्षणी जीवन जसे आहे, त्यातल्या शक्यतांचा तुम्ही शोध घेतला पाहिजे. न जाणो तुमच्यासाठी कधी काय खुले होईल. जे आत्तापर्यंत कुठल्याच मनुष्यासोबत घडले नाही, ते कदाचित तुमच्यासोबत घडेल. पण तुमचे आयुष्य प्लॅननुसार घडल्यास जगामध्ये यापूर्वीच घडलेला फालतूपणा तुमच्यासोबतही घडेल. काहीच नवीन तुमच्यासोबत कधीच घडणार नाही, कारण तुमचा प्लॅन तुम्हाला आधीच माहीत असलेल्या गोष्टींपासून निर्माण होतो, भूतकाळाच्या माहितीतून आणि अनुभवातून.

तुम्हाला कितपत प्लॅन करायचं ते कळाले पाहिजे. तुमच्याकडे काहीच प्लॅन नसेल, तर कदाचित तुम्हाला उद्या काय करायचे ते कळणार नाही. तर हा जीवनाबाबतचा एक ठराविक समतोल आणि एक प्रकारचे शहाणपण आहे, की कुठल्या गोष्टी प्लॅन करायच्या आणि कुठल्या गोष्टींमध्ये मुक्तपणे जगायचे. बहुतेक लोकांचा प्लॅन काही कुठल्या महान दूरदृष्टीतून येत नसतो. त्यांचा प्लॅन मुळात अनपेक्षित गोष्टींना सामोरे न जाता येण्याच्या भीतीतून येत असतो. एकमेव दुःख जे मनुष्यांना त्यांच्या जीवनात होत आहे ते म्हणजे त्यांचे आयुष्य त्यांना हवे होते तसे घडत नाहीये.

सकाळी उठल्यावर, तुम्हाला कॉफी हवी होती, पण कॉफी मिळाली नाही, म्हणून तुम्ही दुःखी आहात. पण, इतका सुंदर सूर्योदय झाला आणि त्याकडे तुमचे लक्षच नाही. फक्त तुमचा एक फालतू प्लॅन घडून आला नाही, पण त्याहून कितीतरी मोठे असे काहीतरी घडत आहे. या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात आणि तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या जीवनाच्या नृत्यामध्ये, तुमचा प्लॅन ही एक अगदी छोटी गोष्ट आहे. तुमच्या प्लॅनला इतके महत्त्व देऊ नका. हो, तुम्हाला प्लॅनची गरज आहे, उद्या सकाळी काय करायचे हे समजण्यासाठी, पण कधीच तुमचे आयुष्य प्लॅननुसार जाईल अशी अपेक्षा करू नका. मुख्य म्हणजे, कायम ही इच्छा ठेवा की तुमचे आयुष्य तुमच्या प्लॅनपेक्षाही पुढे, तुमच्या कल्पना आणि तुमच्या सर्व अपेक्षांच्याही पुढे जाऊन घडून येईल.

Web Title: Don T Spend Your Life Planning Life Should Go According To Plan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top