घडण-मंत्र : दुधावरची साय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family

आजी-आजोबा म्हटल्यावर भल्या थोरल्यांचा आवाज दाटून येतो. लहानपणी ज्यांना आजी आजोबांचा भरपूर सहवास लाभला ती माणसे भाग्यवंतच.

घडण-मंत्र : दुधावरची साय

- डॉ. भूषण शुक्ल

आजी-आजोबा म्हटल्यावर भल्या थोरल्यांचा आवाज दाटून येतो. लहानपणी ज्यांना आजी आजोबांचा भरपूर सहवास लाभला ती माणसे भाग्यवंतच. मुलांच्या पालकांना धीर देणे आणि दोन पिढ्यांमध्ये मायेने ‘शॉक ॲबसॉर्बर’ म्हणून राहणे हे थोरल्या पिढीचे मुख्य काम आहे. बाल संगोपनातील चार युक्तीच्या गोष्टी सांगून तात्कालिक अडचणी सोडवून देणे, यात आजीचा हात कोणी धरू शकत नाही. पालकत्वाची धार योग्य ठेवणे, पण त्याने जास्त कापले जाणार नाही याची दक्षता बाळगणारे थोरले घरात असणे ही नशिबाची गोष्ट आहे.

बदलती भूमिका

नवीन जगात जशा अनेक गोष्टी बदलल्या तशी आजी आजोबांची भूमिकासुद्धा बदलली आहे. काही घरांमध्ये सतत टीव्ही बघत राहणारे, नातवंडांच्या हट्टाला बळी पडून पटकन फोन किंवा भुस्कट खाऊ देणारे आणि शिस्तीपासून बचाव करणारे अशी त्यांची भूमिका झाली आहे. सतत काहीतरी जुन्या आणि कालबाह्य गोष्टींचा आग्रह धरणे किंवा ‘हे सगळं नवीन आहे, आम्हाला यातलं काही समजत नाहीस’ म्हणून अंग काढून घेणे अशा टोकाच्या भूमिकाही काही घरात दिसतात. शांतपणे विचार करून निर्णय घेतले, तर तिन्ही पिढ्यांचे नाते जोपासून सुखाने राहता येणे सहज शक्य आहे. आजी आजोबा कोठे राहतात, हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. वर्षात २-३ वेळाच प्रत्यक्ष भेटणारे आणि इतर वेळेस फक्त फोनवर बोलणारे आजी आजोबा हे व्हिजिटिंग असतात. भेटायला आल्यावर नातवंडांचे भरपूर लाड करण्याची आणि नेहमीचे नियम बाजूला ठेवून नातवंडांबरोबर ‘मज्जा’ करण्याची त्यांना मुभा असायलाच हवी. थोरल्या आणि धाकट्या पिढीचा तो हक्क आहे. या प्रेमप्रकरणात मध्ये पडण्याचा अधिकार आई बाबांना मुळीच नाही. घरात असणारे किंवा जवळ राहून मुलांना सांभाळायला मदत करणारे आजी आजोबा हे मात्र प्रति - पालकच आहेत. त्यांच्या प्रेमाची गणिते वेगळी असावीत. पालकांना सुसंगत असावीत. आता प्रत्येक पिढीत अंतर वाढल्याने आजी-आजोबा जास्त थकलेले असण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यांच्यावर अवखळ आणि खेळकर मुलांची जबाबदारी न टाकता छोट्या मुलांना पाळणाघरात पाठवणे जास्त चांगले आहे. त्यामुळे मुले लवकर स्वावलंबी होतात.

संघर्ष हानिकारक

लहान मुलांना भरपूर करमणूक आणि खेळणे हवे असते. बोलके, हसरे आणि खेळकर आजी-आजोबा त्यांचा जीव की प्राण असतो. अनेक मुले जेवण वगैरे कामे थोरल्यांबरोबर जास्त सहज करतात. झोपायला त्यांना आजी किंवा अजोबाच बरोबर लागतात. लहान असताना आपले पालक कसे वागायचे, पूर्वी लोक कसे राहायचे याचे छोट्या मुलांना फार कुतूहल असते आणि ते ऐकायला खूप मजासुद्धा येते. यासाठी आजी आजोबा पाहिजेतच. असे छान गणित जमले असल्यास आई-वडिलांनी उगाच आपल्या असुरक्षिततेच्या भावना मध्ये येऊ देऊ नयेत. मुलांवरून दोन पिढ्यांचा संघर्ष होणे हे सर्वांना हानिकारक आहे. लहान मुलाला सर्व कुटुंबाची गरज असते आणि ही गरज आजी आजोबांनंतरही टिकून राहणारी आहे. हे भान थोरल्या आणि मधल्या पिढीने ठेवावे हा खरा समजूतदारपणा. मुले कशी वाढवावीत यावर कोणत्याही दोन माणसांचे पूर्ण एकमत होत नाही मग दोन वेगळ्या पिढ्यांचे तरी कसे होईल? ती अपेक्षा सुद्धा चूक आहे. पण या मतभेदांचा विस्फोट मुलांसमोर होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी लागते. याची चर्चा ही मुले समोर नसतानाच व्हावी.

आता आईवडील दोघेही कामाला जातात, अशी खूप घरे आहेत. त्या मुलांना आजी-आजोबा खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या कुटुंबाशी, परंपरेशी आणि इतिहासाशी नाळ जुळलेली असावी असे सर्वांना वाटते. घरातल्या थोरल्या व्यक्ती हा तो जिवंत इतिहास आणि कुटुंब आहे.

आपल्या सर्वांना हा आनंद भरघोस मिळो.

Web Title: Dr Bhushan Shukl Writes Guardianship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health news
go to top