घडण-मंत्र : आई- बाबांचे नाते

आई-बाबा हा मुलांच्या अस्तित्वाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा गाभा आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यावर, त्यांच्या असण्यावर मुलांचे भावविश्व उभे असते आणि बहरतेसुद्धा.
mother and father
mother and fathersakal
Summary

आई-बाबा हा मुलांच्या अस्तित्वाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा गाभा आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यावर, त्यांच्या असण्यावर मुलांचे भावविश्व उभे असते आणि बहरतेसुद्धा.

- डॉ. भूषण शुक्ल

इयत्ता पहिलीसुद्धा सुरू न झालेल्या छोट्या मुलांबद्दल आपण गेले काही आठवडे मनन करतो आहोत. त्यांच्या मनोविश्वात काय चाललेय याचा कानोसा घेतो आहे. त्या मालिकेतला शेवटचा आणि सर्वांत महत्त्वाचा सांधा म्हणजे त्यांचे आई-बाबा.

मुले : एक रेकॉर्डिंग कॅमेरा!

आई-बाबा हा मुलांच्या अस्तित्वाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा गाभा आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यावर, त्यांच्या असण्यावर मुलांचे भावविश्व उभे असते आणि बहरतेसुद्धा. इतके छोटे मूल आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे, याची अनेकांना कल्पनासुद्धा नसते. ‘त्याला एवढं समजतं का?’ असा आश्चर्याचा प्रश्न अनेक आई बाबा विचारतात. चार-पाच वर्षांच्या वयापर्यंत मुलांना काही हजार शब्द समजतात. ते सर्व शब्द बोलताना वापरता येत नसले आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगता येत नसला तरी तो समजायला लागलेला असतो. संदर्भातून आणि आवाज, स्वर, हावभाव याची सगळी माहिती गोळा करून त्यांचा मेंदू अनेक अर्थ लावत असतो. आई-बाबांचे परस्पर नाते, त्यांचा शाब्दिक आणि शब्दापलीकडला संवाद तसेच देहबोलीतून व्यक्त होणारे नाते मूल आत्मसात करत असते. हे सर्व नकळत, शब्दांशिवाय होत असते. याच वयातच लिंग भावही स्थिरावतो आणि आपल्या पालकांच्या उदाहरणावरून स्व-त्वाची पायाभरणी होते. बहुतेक सर्व मुले पालकांचे भरघोस अनुकरण करतात आणि हेच अनुकरण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कायमचा भाग बनते. घरात लहान मूल असल्यास आपल्या वागण्या-बोलण्याचा रेकॉर्डिंग करणारा एक कॅमेरा आसपास, आहे याचे भान राहावे.

संस्कार कृतीतूनच...

आई-बाबा घरात काय काय करतात, कसे वागतात, कोणते काम कोण करतो, कोणते काम कोण कटाक्षाने टाळतो, यावरून मुले सतत स्वतःचा व्यक्ती-भाव घडवत असतात. यात लक्षात ठेवण्याची ज्या गोष्टी मुलांना वारंवार दिसतात त्या त्यांच्या मनावर ठसत असतात. आपण मुलांना सतत बोलून काहीतरी उपदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण काय बोलतो यापेक्षा कसे आणि केव्हा बोलतो यावर मुले जास्त शिकतात. आपल्या शब्दबंबाळ संस्कृतीमध्ये संस्कार कृतीचे होतात, भावनिक वातावरणाचे होतात. हा व्यक्तिमत्त्व घडणीतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे.

निकोप वातावरणाची गरज

नाते म्हटले की त्यात कमी-जास्त होणार. निसर्गाचा तो नियम आहे. ते कशावरून होते, हे बहुधा लहान मुलांना समजत नाही पण ती आपल्यामुळेच होते आहे असे त्यांना वाटते. अशा प्रकारची स्व-केंद्रित विचारसरणी हे या कोवळ्या वयाचे वैशिष्ट्य आहे. वादांच्या भावनिक पाऊलखुणा कायमच्या टिकतात व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात. त्यातून येणारी भीती, अनिश्चितता आणि नकोसेपणा जन्मभराचा सोबती बनतो. एकमेकांना आधार देत, हसत खेळत, आनंदाने आणि सौहार्दाचे नाते असलेली घरे म्हणजे स्वतंत्र आणि स्व-आश्वासक स्वभावाची खाण असते. त्यात मोठी होणारी मुले नात्यांच्या भक्कमपणावर विश्वास ठेवायला शिकतात. अनेक घरांमध्ये ‘अजून पैसे मिळाले तर आयुष्य सुधारेल,’ असे सतत बोलले जाते. अशा वातावरणात आर्थिक कमतरता ही मुलांना उमजत नाही, पण त्यामुळे करपलेली आणि शुष्क झालेली नाती त्यांना गरीब करून जातात. आर्थिक परिस्थितीपेक्षा भावनिक सुबत्ता लहान मुलांना समृद्धतेचा अनुभव देते. आश्वस्त करते. हे निकोप भावनिक वातावरण जोपासणे ही घरातल्या सर्व प्रौढांची जबाबदारी आहे. सतत मुलासमोर राहणाऱ्या फक्त आईची एकटीची नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com