
उन्हाळ्यात आपल्या शरारीरातील हायड्रेशन स्तरावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. यासाठी अनेक प्रकारची आरोग्यदायी पेये आहेत जी तुम्हाला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करतात.
हेल्दी डाएट : उन्हाळ्यातील पेय बनवण्याच्या कृती
- डॉ. रोहिणी पाटील
उन्हाळ्यात आपल्या शरारीरातील हायड्रेशन स्तरावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. यासाठी अनेक प्रकारची आरोग्यदायी पेये आहेत जी तुम्हाला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करतात. चला तर मग, या उन्हाळ्यासाठी उत्तम असलेली स्वादिष्ट उन्हाळी पेये बनवायची कशी ते पाहू.
कैरीचे पन्हे
कैरीचे पन्हे हे उन्हाळ्याशी लढण्यासाठी सर्वांत प्रसिद्ध आणि पारंपरिक पेयांपैकी एक आहे. कैरीच्या पन्ह्यासारख्या चवदार आणि आंबट-तिखट पेयामध्ये व्हिटॅमिन ए, बी१, बी२ आणि सी असते, यासह ते कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक खनिजांचादेखील उत्तम स्रोत आहे. हे पेय दृष्टीसाठी चांगले आहेच, शिवाय त्याने पचन सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
साहित्य :
एक मोठी कैरी , पाव कप गूळ, अर्धा टीस्पून वेलची पावडर, पाव टीस्पून भाजलेले जिरे, अर्धा टीस्पून मिरपूड पावडर, एक टेबलस्पून रॉक मीठ (सैंधव), दोन कप पाणी, तीन चमचे पुदिन्याची ताजी पाने
पद्धत :
एक कैरी धुवून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये ठेऊन त्यात दोन कप पाणी घालून ४-५ शिट्ट्या घ्या.
हे करून झाल्यावर कुकर थंड होऊ द्या, आणि मग कैरीतील बाठ काढून टाका आणि शिजवलेल्या कैरीचा लगदा काढा, हा लगदा ब्लेंडरमध्ये घाला.
तीन चमचे ताजा पुदिना, पाव कप गूळ घाला.
पाणी न घालता हे मिश्रण ब्लेंडरमध्ये घालून एकजीव होईस्तोवर ब्लेंड करा .
अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून मिरपूड आणि तुमच्या चवीनुसार मीठ घाला.
हे सगळं एकत्र मिक्स करा आणि कॉन्सट्रेटेड पन्ह तयार आहे.
सर्व्ह करताना ग्लासमध्ये १-२ चमचे कॉन्सट्रेटेड पन्हे घ्या, ह्यात थंड पाणी घाला, चांगले ढवळा आणि वरून पुदिन्याच्या पानांनी सजवा.
मँगो स्मूदी
आंब्यामध्ये अनेक पोषक घटक (विशेषतः व्हिटॅमिन ए, सी, के आणि ई) मोठ्या प्रमाणावर असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
साहित्य :
एक कप चिरलेला आंबा, एक गोठलेले इलायची केळी, अर्धा कप गाईचे दूध / बदाम / नारळाचे दूध, अर्धा कप घरगुती दही, दोन चमचे चिरलेले बदाम, काजू आणि न खारवलेले पिस्ते, एक टीस्पून भिजवलेला सब्जा, केशराच्या दोन-तीन काड्या
पद्धत :
सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घाला आणि एकजीव प्यूरी तयार होईपर्यंत मिक्स करा.
वरून चिरलेला काजू आणि भिजवलेला सब्जा घाला आणि त्यावर केशर घालून सजवून सर्व्ह करा.
सातू ड्रिंक
सातूचे पीठ हे अंकुरलेले आणि भाजलेल्या काळ्या चण्यापासून बनलेले असते, जे प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमने समृद्ध असते. सातूचे पेय पचन सुधारते आणि ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. ते तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते.
साहित्य :
तीन चमचे अंकुरलेले आणि भाजलेले सातूचे पीठ, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून भाजलेले जिरे पावडर, २-३ पुदिन्याची पाने, एक टीस्पून चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, एक टीस्पून लिंबाचा रस, पाव टीस्पून हिरव्या मिरच्या चिरलेल्या, पाव टीस्पून गूळ, एक ग्लास पाणी, आवश्यकतेनुसार बर्फाचे तुकडे
पद्धत :
ब्लेंडरमध्ये सातूचे पीठ, जिरेपूड, आमचूर पावडर, धणे, पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, गूळ, लिंबाचा रस, सैंधव आणि बर्फाचे तुकडे घाला.
हे सर्व चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
ग्लासमध्ये सर्व्ह करा आणि आपल्या पेयाचा आनंद घ्या.
Web Title: Dr Rohini Patil Writes Health Diet Summer Cold Drinks
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..