हेल्दी डाएट : शेतीपासून तुमच्या ताटापर्यंत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Diet
हेल्दी डाएट : शेतीपासून तुमच्या ताटापर्यंत...

हेल्दी डाएट : शेतीपासून तुमच्या ताटापर्यंत...

- डॉ. रोहिणी पाटील

आपले हे सुंदर जग अनेक चविष्ट, चवदार आणि आनंददायी पदार्थांनी भरलेले आहे. अन्नसुरक्षा आपल्या शारीरिक आणि आर्थिक आरोग्याशी निगडीत आहे. ‘जागतिक अन्नसुरक्षा दिन’ ७ जून या दिवशी जगभर साजरा केला जातो आणि त्याचा उद्देश अन्नपासून निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधणे, त्यांना ओखळणे व ते टाळण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. या आंतरराष्ट्रीय दिनाचा उद्देश लोकांना एकत्र आणून अन्नापासून होणाऱ्या अपायांपासून ग्राहकांचे संरक्षण करणे हा आहे. यासाठी शिक्षण, व्यवस्थेतील बदल, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळावी यासाठी योग्य ती गुंतवणूक करणे, हा आहे. अन्नाच्या शेतापासून तुमच्या ताटापर्यंतच्या प्रवासातील पिकाच्या वाढीवासून सुगीपर्यंत, अन्नाची वाहतूक आणि साठवण या सर्वच प्रक्रियांमध्ये अन्न खाण्यासाठी सुरक्षित राहण्यावर भर द्यायला हवा.

ताजे, स्थानिक, सिझनल आणि सेंद्रिय अन्न खाण्याचे फायदे

  • फळे, भाज्या, धान्ये व डाळी आपल्या जवळच्या स्थानिक शेतकऱ्याच्या शेतीतून आपल्या घरात येतात, त्यामुळे त्यांची किंमत कमी असते.

  • हे पदार्थ प्रक्रिया न केलेले व साठवणुकीसाठी रसायनांचा वापर न केलेले असतात.

  • ते अधिक रसदार, गोड, चविष्ट असतात.

  • काढणी, वाहतूक आणि दुकानांतील साठवणुकीदरम्यान पदार्थांतील पोषक घटक कमी होऊ लागतात. मात्र, स्थानिक शेतकऱ्याकडून खरेदी केल्यास अधिकाधिक पोषक मूल्ये शाबूत राहतात.

  • स्थानिक पदार्थांचेच सेवन केल्यास तुमचे अन्न कोठून आले हे तुम्हाला समजते.

तुमच्यासाठी सॅम्पल डाएट प्लॅन

नाश्ता

  • पर्याय १ - एक प्लेट शेंगदाणे घातलेले कांदे-पोहे.

  • पर्याय २ - एक प्लेट साबुदाणा खिचडी व एक वाटी दही.

  • पर्याय ३ - मिश्र धान्याचे छोटे थालिपीठ, ठेचा व एक वाटी दही.

दुपारच्या जेवणाआधी -एक ग्लास कच्च्या कैरीचे पन्हे किंवा मसाला ताक किंवा नारळ पाणी किंवा कोकम सरबत.

दुपारच्या जेवणात

  • पर्याय १ - हाताच्या तळव्याच्या आकाराची ज्वारीची भाकरी, एक वाटी दाळ-कांदा, एक वाटी मेथीची भाजी व एक चमचा शेंगादाण्याची चटणी.

  • पर्याय २ - हाताच्या तळव्याच्या आकाराची तांदळाची भाकरी, एक वाटी झुणका, एक चमचा जवस-लसणाची चटणी व एक वाटी काकडीची कोशिंबीर.

  • पर्याय ३ - हाताच्या तळव्याच्या आकाराची नाचणीची भाकरी, एक वाटी वांग्याची भाजी, एक चमचा कोर्टा चटणी, एक वाटी फोडणीचे वरण आणि १ चमचा तूप.

संध्याकाळचा नाश्ता

  • पर्याय १ - एक कप आल्याचा चहा व एक वाटी भडंग.

  • पर्याय २ - एक कप दालचिनी चहा व एक वाटी मखना.

  • पर्याय ३ - एक कप गवती चहा, एक वाटी पोह्याचा चिवडा.

रात्राीचे जेवण

  • पर्याय १ - एक वाटी फोडणीचा भात, एक वाटी आमटी, एक वाटी बटाट्याची भाजी व एक चमचा कच्च्या कैरीची चटणी

  • पर्याय २ - एक वाटी हातसडीच्या तांदळाचा भात, एक वाटी सोलकढी, शंभर ग्रॅम भाजलेला मासा व एक वाटी टोमॅटो सलाड.

  • पर्याय ३ - एक वाटी पॉलिश न केलेल्या तांदळाचा भात, शंभर ग्रॅम सुके महाराष्ट्रीय चिकन किंवा अंडा मसाला, एक वाटी अळणी व एक वाटी कांदा-टोमॅटो सलाड

दिवसभरात मिळणारी पौष्टिक मूल्ये

  • उष्मांक - १०९४ कॅलरी

  • प्रोटिन - ४२.५ ग्रॅम

  • कार्बोहायड्रेट्स - १५१ ग्रॅम

  • फॅट्स - ३७.३ ग्रॅम

  • फायबर - २३.२ ग्रॅम

हे लक्षात ठेवा - तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, पीसीओडी, थायरॉईड, हृदयविकार किंवा इतर काही आजार असल्यास हा आहार घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा. हा एक सर्वसामान्य डाएट प्लॅन आहे.