नवदुर्गा व स्त्रीआरोग्य

डॉ. सुषमा देशमुख
Wednesday, 21 October 2020

अनेक अनाम स्त्रिया आपल्या आजुबाजुला आहेत. पोलिस, आर्मीमध्ये दुष्टांवर तुटून पडणाऱ्या, वैद्यकीय व्यवसायात कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी लढा देणाऱ्या व प्रसंगी स्वत:चा जीव गमावणाऱ्या या रणरागिणी आहेत. आपण सर्वांनी मिळून त्यांचे समर्थ हात आणखी बळकट केले पाहिजेत.
 

सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत. मला एका कार्यक्रमाला बोलावलं होतं. अतिशय सुंदर व्याख्यानमाला होती. मला सेवाभाव या विषयावर बोलायचं होतं आणि बाकीच्या आठ जणी वेगवेगळया क्षेत्रातल्या होत्या. 'स्त्री'च्या प्रत्येक गुणावर त्यांनी सुंदर शृंखला बनवली होती. मला जाणवलं, स्त्रीचं जर आरोग्य चांगलं असेल, तिला शिक्षण, प्रोत्साहन मिळालं तर ती तिच्या आवडत्या क्षेत्रात गरूडझेप घेऊ शकते.

या नवदुर्गांचे आपल्या आयुष्यात वैद्यकीय दृष्टीने काय महत्त्व आहे ? दुर्गामाता म्हणजे साक्षात एक अपुर्व, अलौकिक तेजस्वी, चैतन्य! सर्व देवांची शक्ती एकत्र होऊन एक सर्वश्रेष्ठ देवता म्हणून आपण दुर्गादेवीची मनोभावे पूजा करतो. ही देवी नऊ रूपांमध्ये नऊ शक्तींसह आपल्या समोर येते. खडतर तपस्या, सौम्यता, हिम्मत, शौर्य, चैतन्य, वात्सल्य, संरक्षक, बुद्धी, स्वाभिमानता हे गुण तर आहेतच पण इतर अनेक गुण तिच्यामध्ये सामावले आहेत.

हे गुण ग्रहण करण्याआधी समाजासाठी एक महत्त्वाचा आदर्श आपल्या भारतीय संस्कृतीने दिला आहे. नवरात्रीमध्ये कन्या पूजा (२ ते १० वर्षांमधील) करण्याची प्रथा आहे. ही पूजा आपल्याला कन्येप्रती लहानपणापासून आदरभाव शिकवते. कांही वर्षापासून स्त्री भृण हत्येचे किळसवाणे प्रकार चालू आहेत. सोनोग्राफीला कलंक लागलेला आहे. कन्यापुजेचे जर सार सर्वांना समजले तरी स्त्रीभृणहत्या, बलात्कार, स्त्री हिंसाचार बंद होईल व स्त्रियांकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टीकोण बदलेल. कारण हीच चिमुरडी उद्याची माता, घराची शोभा, चैतन्य, आहे.

अठराव्या शतकात कवि देवदासांनी रचलेल्या व्यंकटेशस्तोत्रात एक मौलिक ओवी आहे.

पुत्रार्थियाने तीन मास। धनार्थियाने एकवीस दिवस।
कन्यार्थियाने षण्मास। ग्रंथ आदरे वाचावा।
म्हणजेच पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीपेक्षा कन्याप्राप्ती श्रेष्ठ आहे.
आता आपण बघुया देवीची नऊ रूपे ऋतुरंगाच्या वेगवेगळ्या रूपात कशी सामावली आहेत.

१) पौगंडावस्था :- हा बाल्यावस्थेनंतरचा १० ते १९ वर्षांचा कालावधी. या वयातील मुलींना देवी शैलपुत्रीच्या रूपाप्रमाणे अन्यायाविरूद्ध लढा देणे, तसेच स्कंदमातेचे ज्ञान, विवेक देणे जरूरी आहे. मुलींच्या शारिरिक व मानसिक समस्येकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच हे वय अगदी कोवळे व निष्पाप असते. त्यामुळे तिला बाहेरील जगापासून सावध करावे. गुड टच – बॅड टच बद्दल माहिती द्यावी. सुरूवातीपासूनच तिला स्वसंरक्षणाने धडे द्या. अगदी लहानपणापासून योग्य संस्कार, वात्सल्य, शिस्तबद्ध व्यायाम, पौष्टिक आहार वाचनाची आवड या गोष्टी बिंबवाव्या.

२) युवाअवस्थेतील मुलींनी वरील गुणांबरोबरच देवी ब्रम्हचारिणीकडून हिम्मत व प्रेरणा घ्यावी. खडतर तपस्येचे व्रत द्यावे, जे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करेल. यामुळे शिक्षण, करियर यामुळे येणाऱ्या ताण-तणावाला तोंड द्यायची हिम्मत येईल व तब्येतीची हेळसांड होणार नाही. तसेच मोबाईल, इंटरनेट व इतर व्यसनांपासून दूर रहावे. या मुलींनी त्यांचे लक्ष ठरविले पाहिजे. योग्य आहार व व्यायामाची सवय असावी. स्वाभिमान असावा पण अहंकार नसावा.

३) विवाह होणाऱ्या गटातील तरूणी :- यात थोडक्यात विवाहपूर्वक सल्ला आला. कात्यायन मुनींच्या पोटी जन्मलेली देवी कात्यायनी आपल्याला सजग व्हायला शिकवते. प्रत्येक गोष्ट पारखून घ्यावी. विवाहाचा निर्णय पूर्व विचारांती घ्यावा. त्याआधी रक्तगट, हिमोग्लोबीन व इतर आजारांबद्दल माहिती मिळवावी. तसेच या गटातील मुलींनी चंद्रघंटेसारखी वीरता अंगी बाणवावी. निर्भय होऊन कुठे झुकावे कुठे झुकवावे हे कळले पाहिजे.

४) विवाह झालेला प्रजननशील गट :- या गटात मला देवी कूष्माण्डाचे रूप दिसते. स्त्रीला आदिशक्ती म्हणतात ते उगीच नाही. संसार उभा करणारी, श्रृंगार, रचनात्मक, कलात्मक, अवघं ब्रम्हांड रचणारी कूष्मांडा! स्त्रीपासूनच नव्या जीवाची उत्पत्ती होते. हे विधात्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न! या वयातील स्त्रीयांनी मुल होण्याआधीचे समुपदेशन डॉक्टरांकडून जरूर करून घ्यावे. योग्य वयात, योग्य वेळी मूल होणे खुप आवश्यक आहे. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या कमी होईल. त्याचबरोबर शरीर व मन तंदुरूस्त असणे हे खुप महत्त्वाचे आहे. गर्भवती स्त्रियांनी आहार, विश्रांती, माफक योगा प्राणायाम करणे जरूरी आहे. गर्भारपणात आनंदी असावे. स्वत:विषयी, गर्भारपणाविषयी, होणाऱ्या बाळाविषयी माहिती मिळवावी. तसेच बाळ झाल्यानंतर स्वतःचे आरोग्य चांगले ठेवणे व बाळावर योग्य संस्कार करणे हे खुप महत्त्वाचे आहे. तसेही स्त्रीमध्ये संसार सांभाळण्याची, घर कलात्मकतेने सजवण्याची अभिजात कला असते.

५) प्रौढावस्थेतील स्त्री :- मला हिचे रूप माँ महागौरीसारखे शांत वाटते. आयुष्यातील चढउतारामुळे तिला प्रगल्भता आली असते. कुठल्याही संकटांना शांतपणे तोंड देऊन मार्ग काढणारी अशी हिची ख्याती आहे. हिचे रूप बऱ्याचदा करीयर करणाऱ्या स्त्रीसारखे पण आहे. करियर घर यांचा समतोल राखून योग्य पद्धतीने सर्वांना सांभाळणारी. पण या स्त्रियांनी स्वत:कडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. अतिस्त्रावी मासिकपाळी, मानसिक स्थित्यंतरे यांना समर्थपणे तोंड दिले पाहिजे. या वयात येणारे कॅन्सरसारखे दुर्धर आजार, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा सर्व आजारांबद्दल माहिती असावी. आहार, आचार, व्यायाम यांचा समतोल असावा.

६) देवीचे एक विशेष रूप होममेकर स्त्रीयांसाठी. ते म्हणजे देवी सिद्धीदात्री! ही स्त्री स्वत:कडे दुर्लक्ष करून कुटुंब, समाजाला फक्त देतच असते. ही स्त्री पुर्ण कुटुंब, समाज बांधणारी आहे. सेवेचे अप्रतिम प्रतीक आहे. या स्त्रिया बरेचदा स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या स्त्रियांनी स्वतःचे इतर कलागुण जोपासावे. पण कुटुंबाने, समाजाने या स्त्रियांच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिलेच पाहिजे.

७) मला भावणारे आणखी एक रूप म्हणजे कालरात्री कालीमाता. वाईट प्रवृत्तींविरूद्ध लढणारी, दुष्टांची संहारक, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, आशा विश्वासाचे मूर्तीमंत रूप. मला वाटते आजच्या युगात प्रत्येक स्त्रीमध्ये हे रूप असणे खुप जरूरी आहे. मुली, स्त्रिया शिक्षण करीयरमुळे घराबाहेर पडलेल्या आहेत. मानवातील महिषासुर तिला ओळखता आला पाहिजे. स्वत:ला सामर्थ्यवान बनवणे, एकत्र राहणे, अन्यायाचा प्रतिकार करणे ही गरज आहे. खोट्या, मायावी मोहजाळात फसू नये. स्त्रीने स्त्रीला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.

अशा अनेक अनाम स्त्रिया आपल्या आजुबाजुला आहेत. पोलिस, आर्मीमध्ये दुष्टांवर तुटून पडणाऱ्या, वैद्यकीय व्यवसायात कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी लढा देणाऱ्या व प्रसंगी स्वत:चा जीव गमावणाऱ्या या रणरागिणी आहेत. आपण सर्वांनी मिळून त्यांचे समर्थ हात आणखी बळकट केले पाहिजेत.

सध्या कोरोनासारख्या आपत्तीने पूर्ण जगाला ग्रासले आहे. तसेच अवेळी पाऊस, पूर अशी अनेक संकटे उभी आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी पूर्ण स्त्रीशक्ती एकवटली पाहिजे.

आपल्या संस्कृतीने आपल्याला बरेच काही दिले आहे. वरील सर्व गुणांचा जागर झालाच पाहिजे व माता दुर्गेचा आशीर्वाद घेऊन आरोग्य निरामय व निरोगी बनवले पाहिजे. अजुनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे मास्क वापरा. स्वत:ला जपा, दुसऱ्यांना जपा.

थोडक्यात या नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गादेवीचे सर्वगुण अंगिकारण्याचा प्रयत्न करा. जर पूर्ण स्त्रीशक्ती एकत्र आली तर महिषासूर, कोरोना सारख्या शत्रूचे सहज निर्दालन होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Durgapuja and womans health