esakal | स्त्री-पुरुष संबंधांचा वैद्यकीयदृष्ट्या विचार
sakal

बोलून बातमी शोधा

doctor.

विविध व्यक्तींमध्ये वेगवेगळी लैंगिक समस्या असू शकते, त्याची तीव्रता देखील वेगळी असू शकते; मात्र, सर्दी-पडसे होणे जेवढे सामान्य आहे, तेवढ्याच सामान्य लैंगिक समस्या देखील आहेत. या समस्या कोणालाही आणि केव्हाही होऊ शकतात.

स्त्री-पुरुष संबंधांचा वैद्यकीयदृष्ट्या विचार

sakal_logo
By
डॉ. संजय देशपांडे लैंगिक विकारतज्ज्ञ, नागपूर

गेल्या भागात आपण लैंगिक सौख्य आणि त्याचे फायदे जाणून घेतले. लैंगिक सौख्य प्राप्त करण्यात ‘लैंगिक समस्या’ अडथळा बनतात. लैंगिक समस्यांबद्दल काही गैरसमज आहेत की, लैंगिक समस्या पूर्वीपासून, लहानपणापासून अथवा जन्मतः असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की, विविध व्यक्तींमध्ये वेगवेगळी लैंगिक समस्या असू शकते, त्याची तीव्रता देखील वेगळी असू शकते; मात्र, सर्दी-पडसे होणे जेवढे सामान्य आहे, तेवढ्याच सामान्य लैंगिक समस्या देखील आहेत. या समस्या कोणालाही आणि केव्हाही होऊ शकतात.

लैंगिक समस्येचे वर्गीकरण स्वतःच्या मानसिक विचारांमुळे, शारीरिक व्याधींमुळे आणि स्त्री-पुरुष परस्पर संबंधांमुळे अशा तीन प्रकारात केल्या जाते. कुठलीही लैंगिक समस्या उद्भवली की, या तीन बाबींचा उहापोह करणे आवश्यक आहे. केवळ शारीरिक,मानसिक अथवा नातेसंबंधांच्या बाबी न घेता सर्वांगिण दृष्टीकोन ठेवून उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे जो या तिन्ही बाबींचा विचार करतो, तो लैंगिक विकारांवर चांगले उपचार करू शकतो. लैंगिक समस्या पुरुष व महिलांमध्ये वेगवेगळ्या असतात. पुरुषांच्या लैंगिक समस्यांची चर्चा अधिक होते. त्या तुलनेत स्त्रियांच्या लैंगिक समस्यांची चर्चा कमी होत असते.

पुरुषांच्या लैंगिक समस्यांबाबत आपण मास्टर्स अ‍ॅन्ड जॉनसनच्या नॉर्मल सेक्सुअल रिस्पॉन्स सायकल संबंधी जाणून घेतले होते. पुरुषांच्या लैंगिक समस्यांचे वर्गीकरण इच्छा, उत्तेजना आणि कामतृप्ती या तीन प्रकारात करता येते.

त्या अनुषंगाने उत्तेजना येण्यास समस्या येणे म्हणजे पुरुषाचे लिंग ताठर न होणे, ही एक सामान्यतः आढळणारी समस्या आहे. यास पूर्वी नपुंसकत्व किंवा इंपोटंस असे म्हणायचे. त्याचा सर्वसाधारण अर्थ पुरुषी ताकदीचा अभाव असा काढल्या जायचा. मात्र, लैंगिक संबंध होत नाही म्हणून नपुंसक आहे, असे म्हणणे योग्य नाही. कारण ही लैंगिक समस्या असली तरी अन्य बाबतीत ती व्यक्ती पुरुषार्थ गाजवू शकते. ती व्यक्ती किंबहुना मोठी व्यावसायिक, डॉक्टर, राजकारणी असू शकते. तिने अन्य क्षेत्रातही उल्लेखनीय यश प्राप्त केलेले असू शकते. या समस्येचा पुरुषार्थाशी जोडलेला संबंध अयोग्य असल्याने कारणाने त्यास इरेक्टाईल डिस्फंक्शन असे नामकरण करण्यात आले.

इरेक्टाईल डिस्फंशन म्हणजे पुरुषाच्या लिंगास उत्तेजना न‌ येणे किंवा ताठरता कमी होणे अथवा त्यात व्यत्यय येणे असे म्हणतात. जर लिंग ताठर होण्यात व्यत्यय आले तर लैंगिक संबंधच होणार नाहीत. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना योग्य लैंगिक सौख्य प्राप्त होत नाहीत. एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के लोक या विकाराने ग्रासीत असल्याचे आढळून आले आहे. वाढते वय अथवा अन्य आजारामुळे ही समस्या उद्भवू शकते. त्याचे सविस्तर विवेचन पुढील लेखांमध्ये करणार आहोत.

त्यानंतर इरेक्टाईल डिसफंक्शनहून अधिक आढळून येणारी समस्या आहे ती म्हणजे शीघ्रपतन. शारीरिक संबंध होताना, दोन्ही जोडीदाराचे समाधान होण्यापूर्वी वीर्यपतन होणे, त्यास म्हणतात शीघ्रपतन. त्यास इंग्रजीत ‘अरली इजॅक्युलेशन’ असेही म्हणतात. या समस्येला देखील मानसिक कारणे, अन्य आजार अथवा एकमेकांशी असलेल्या संबंधांमधील बिघाड कारणीभूत ठरू शकतो. या समस्येने ग्रासित असलेल्या पुरुषांचे प्रमाण हे २५ ते ४० टक्के असू शकते, असा अंदाज आहे.

इच्छा न होणे (डिजायर डिस्फंक्शन) ही आणखी एक समस्या आहे. या समस्येला मानसिक कंगोरे आहेत. कधी कधी पुरुष लैंगिक संप्रेरकांचा अभाव असल्याने देखील ही समस्या उद्भवते.

महिलांच्या लैंगिक समस्या
लैंगिक संबंधांच्या वेळेस वेदना होतात, हीच एकमेव लैंगिक समस्या आहे, असा सर्वसामान्य समज लोकांच्या मनात आहे. मात्र, महिलांच्या लैंगिक समस्यांचे वर्गीकरण इच्छा न होणे, उत्तेजना न होणे, कामतृप्ती न होणे आणि शारीरिक संबंधांमध्ये वेदना होणे, अशा चार प्रकारात करता येईल.

लैंगिक समस्यांची इच्छा न होण्यास अनेक कारणे आहेत. मानसिक कारणे, कामतृप्ती होत नसल्याने इच्छा न होणे, शारीरिक कारणांनी, वैवाहिक कारणे जसे जोडीदाराद्वारे मारझोड होणे, जोडीदाराने त्याच्या शरीराची योग्य निगा न राखणे अशी सगळी कारणे लैंगिक समस्यांची इच्छा न होण्यास कारणीभूत ठरू शकतील. लैंगिक उत्तेजना न होण्यास देखील कामतृप्तीचा अभाव, बळजरीने लैंगिक संबंध स्थापित करणे, ही कारणे असू शकतात.

कामतृप्तीचा अभाव ही महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारी समस्या आहे. पुरुष जोडीदाराने केलेला फोरप्ले अथवा कामक्रीडा, लैंगिक संंबंधांचा वेळ आणि मनस्थितीवर कामतृप्ती अवलंबून असते. शारीरिक संबंध बनविताना होणाऱ्या वेदनेस अज्ञान हे प्रमुख कारण असू शकते. सुरुवातीला लैंगिक संबंध कसे करावे, याचे ज्ञान असते. अनेकदा चुकीच्या पोजिशनमुळे देखील वेदना होतात. मनात आपल्याला त्रास होईल अशी भावना आली तरी व्हजायनिसमस सारखे विकार म्हणजे योनी व ओटीपोटाचे स्नायु कडक होतात.