त्या पहिल्या रात्री...!

wedding-couple-
wedding-couple-

आतापर्यंतच्या लेखांमध्ये वैवाहिक सौख्य कसे निर्माण होते, यावर चर्चा केली. मात्र, वैवाहिक सौख्याची सुरुवात फार महत्त्वाची असते. पहिल्याच रात्री संबंध व्यवस्थित झाला तरच पुढील कामजीवन सुरळीत होईल असा एक समज आहे. मी प्रॅक्‍टिसदरम्यान अनुभवले आहे की, पहिल्याच रात्री चांगला सेक्‍स झाल्याचे फार कमी वेळा घडतं. "वेल बिगन इज्‌ हाफ डन' हे जरी खरे असले तरी चांगली सुरुवात झाली नाही, तरीदेखील पुढे सगळं सुरळीत होऊ शकते. मात्र, पहिल्या रात्री सेक्‍समध्ये अपयश आल्याने मनावर ताण येतो व या ताणामुळेच पुढील समस्या वाढतात. त्यामुळे पहिल्या रात्री सेक्‍समध्ये अपयश आले तरी घाबरून जाऊ नये.

अलीकडल्या काळात प्रेमविवाह आणि स्वतःहून ठरवून लग्न करण्यास सुरुवात झाली असली, तरी बहुतांश विवाह आईवडिलांनी ठरविलेलेच असतात. यात व्यक्तीचे दिसणे, शिक्षण, आर्थिक बाबी, जात अथवा कुटुंब बघूनच लग्न ठरते. प्रेमविवाहात मात्र एकमेकांना अनुभवून लग्न ठरत असते. पण, प्रत्येक प्रेमविवाहात लग्नापूर्वी संबंध होतीलच, असे निश्‍चित सांगता येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त विवाहांमध्ये पहिल्या रात्री प्रथमच संभोग होणार असतो. जीवनात जी गोष्ट प्रथमच करणार आहोत, ती शंभर टक्के यशस्वी होईलच याची शाश्‍वती नसते. पण, लैंगिक संबंधादरम्यान जोडीदारांना वाटत असते की, पहिल्याच रात्री संबंध व्यवस्थित व्हायला हवा. मात्र, बहुतांश वेळा पहिल्या रात्रीचा संभोग अपयशी ठरतो. पहिल्यांदा केलेली कुठलीही गोष्ट शंभर टक्के यशस्वी होत नसते; अगदी त्याच प्रमाणे पहिल्या रात्री केलेला संभोगदेखील कुठल्याही कारणाशिवाय अथवा आजाराशिवाय अपयशी ठरू शकतो.

त्यानंतर जेव्हा जोडपी पुन्हा सेक्‍स करतात, तेव्हा पहिल्या रात्रीचे अपयश नेहमी आपला मानसिक प्रभाव पाडत असते. त्यामुळे अडथळे येऊन पुढील संबंध असफल ठरतात. मग असा निष्कर्ष काढला जातो की, मुलगा नपुंसक आहे अथवा मुलीमध्येच काही समस्या आहे. आपल्याकडे छोट्या-छोट्या समस्या आईवडिलांना सांगितल्या जातात. मग आईवडील या भांडणात गुंतले की, भांडणे वाढतात. हे प्रकार पोलिस स्टेशन व कोर्टापर्यंत जातात.

आज या लेखाच्या माध्यमातून मला सगळ्यांना आवाहन करायचे आहे की, अशा प्रकारची प्रकरणे फार ताणू नका. कधी कधी बऱ्याचशा समस्या आपोआप दूर होतात. मात्र, त्याचा ताण घेतला तर दूर होत नाही, हेदेखील तितकेच खरे. त्यामुळे काही दिवस संभोगातील अपयश स्वीकारायला हवं. पण, काही दिवसांनी ठीक झालं नाही, तर आईवडील, मित्रांना अथवा नातेवाइकांना सांगण्याऐवजी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायला हवा. तो मग तुमचा फॅमिली डॉक्‍टरदेखील असू शकतो. डॉक्‍टर तुम्हाला नेहमीच विवेकी सल्ला देतील.

आता या समस्या का होतात? कारण लग्नापूर्वी सेक्‍सबद्दल फारशी माहिती नसते. मुलांच्या बाबतीत घेतलं तर आधी सेक्‍स झाला नसेल तर आपण सेक्‍स करू शकू का, आपल्या लिंगाला कडकपणा येईल का, आपण पत्नीला समाधानी करू शकू का असे अनेक प्रश्‍न मनात असतात. याच्या चिंतेमुळे पहिल्या काही रात्री लैंगिक संबंध व्यवस्थित होऊ शकत नाही. काही मुलांनी लग्नापूर्वी सेक्‍स केला असेल आणि त्यामध्ये त्यांना अपयश आले असेल तर पूर्वीच्या अपयशाच्या आठवणीने आता सेक्‍स करताना यश मिळेल की नाही, अशी चिंतादेखील भेडसावत असते. त्याचप्रमाणे मुलींनादेखील लैंगिक संबंधांमध्ये खूप वेदना होतात, खूप रक्तस्त्राव होतो याबद्दलची भीती असते.

माझ्या स्वतःच्या शोधनिबंधाचा निष्कर्ष असा होता की, लग्नाआधी ज्यांना लैंगिक समस्या आहे असे वाटते, ते पुढे मैत्रिणीशी अथवा वारांगनेशी लैंगिक संबंध करू पाहतात. मात्र, तो जमत नाही व चिंता आणखी वाढते. आपल्याला लैंगिक संबंध जमेल की नाही हे बघण्यासाठी कुण्या स्त्री सोबत शारीरिक संबंध करून बघण्यापेक्षा डॉक्‍टरांचा सल्ला घेणे कधीही योग्य आहे. त्यामुळे मनातील चिंता कमी होईल.

पहिल्या दिवशी जर लैंगिक समस्या उद्भवत असेल तर त्याला ही पूर्वीपासूनच होती, असा समज जोडीदाराने करून न घेता जोडीने डॉक्‍टरांकडे जायला हवे. याला "कपल कौन्सिलिंग' असे म्हणतात. डॉक्‍टर दोघांच्या मनातील प्रश्‍नांचे समाधान करू शकतात. नवपरिणीत जोडप्यांनी तर डॉक्‍टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. कारण अनेकदा नवपरिणीत जोडप्यांना हे ठावूकच नसते की, लैंगिक संबंध कसे करतात. डॉक्‍टरांकडून योग्य माहिती घेतली तर संबंध प्रस्थापित होऊ शकतात.

सेक्‍समध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक स्थिरता आणि नात्यांमधील सुदृढता असायला हवी. पहिले काही दिवस एकमेकांच्या नात्यांमध्ये सुदृढता नसते; त्यामुळेदेखील या समस्या येऊ शकतात. त्यासाठी लैंगिक समुपदेशन गरजेचे आहे. शिवाय अशा समस्या येऊ नयेत म्हणून विवाहपूर्व समुपदेशन पण आवश्‍यक आहे. सध्या विवाहपूर्व समुपदेशन करताना एकमेकांसोबतच्या व्यवहाराला प्राधान्य दिले जाते. विवाहापूर्व लैंगिक समुपदेशनासाठी कोणीच जात नाही. मात्र, स्वतः अगदी निरोगी असलो तरीदेखील प्रत्येकाने विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन करवून घेतलेच पाहिजे. विवाहापूर्वी लैंगिक समुपदेशन करवून घेतले तर पुढे येणाऱ्या बहुतांश समस्या आणि पर्यायाने होणारा मानसिक त्रास टाळता येईल. समुपदेशनामुळे विवाह करणाऱ्या स्त्री-पुरुषांना हेदेखील कळेल की, लैंगिक समस्या कुणालाही होऊ शकतात आणि त्या दुरुस्तही होऊ शकतात. अगदी औषधाशिवायही अनेक समस्या दूर होऊ शकतात, याची जाणीवही होईल.

मात्र, लैंगिक समुपदेशन न केल्याने लैंगिक समस्यांची जाणीव नसते. मग कालांतराने वैवाहिक समस्या वाढू लागतात, भांडणे होतात आणि वैवाहिक सौख्याला ग्रहण लागते. म्हणून वैवाहिक संबंध सुरू होण्यापूर्वी लैंगिक समुपदेशन करणे आवश्‍यक असते.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com