Health Blog: उष्ट्रासन;नियमित सरावाने लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते,आणि.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yoga

Health Blog: उष्ट्रासन;नियमित सरावाने लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते,आणि..

हे बैठकस्थितीमधील आसन आहे. उष्ट्र म्हणजे उंट. या आसनाची अंतिम स्थिती उंटाप्रमाणे दिसते असे समजून यास उष्ट्रासन म्हणतात.

प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर आसनस्थिती घेण्यासाठी गुडघ्यावर उभे रहावे.

दोन्ही पाय-गुडघे-मांडी जुळलेले असावे. परंतु सुरवातीला आसनात तोल सांभाळणे अवघड जात असेल तर दोन्ही पायात-गुडघ्यात खांद्याएवढे अंतर घेऊन सराव करता येईल.

आता कंबरेतून सावकाश मागच्या दिशेला वाकावे. डाव्या हाताचा तळवा डाव्या टाचेवर/तळपायावर, उजव्या हाताचा तळवा उजव्या टाचेवर/तळपायावर ठेवावा.

हात कोपरातून ताठ असावेत मान मागच्या दिशेला वळलेली असावी. नजर स्थिर व श्‍वसन संथ सुरू असावे.

जेवढा वेळ स्थिर रहाता येईल तेवढा वेळ आसन टिकवावे. आसन सोडताना सावकाश उलटक्रमाने आसन सोडावे व पुन्हा वज्रासनात बसावे.

या आसनाच्या नियमित सरावाने लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते. गळा, छाती, पोट, मांडी यावर उत्तम ताण आल्याने तेथील स्नायू, शिरा ताणल्या गेल्याने तेथील कार्यक्षमता वाढते, रक्तप्रवाह सुधारतो. श्‍वसन, पचन या संस्थांच्या तक्रारी कमी होतात.

बालदमा, मधुमेह, थायरॉइड या व्याधींवर लाभदायी आसन लहान मुलांना व्यक्तिमत्त्वविकास, आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी उपयुक्त. लठ्ठपणा-अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त.

पाठीच्या कण्यावर दाब आल्याने तेथील लवचिकता वाढते, ताकद वाढते. कंबरदुखी, पाठदुखी कमी होण्यास मदत होते. बॉडी पोश्‍चर सुधारते. गॅसेस, वात, मलावरोध, आम्लपित्त, पोटफुगी या त्रासांवरसुद्धा उपयुक्त.

गुडघेदुखी, व्हर्टिगो किंवा काही तीव्र, मोठी दुखणी असतील तर डॉक्‍टरांचा सल्ला घेणे खूप आवश्‍यक आहे.

टॅग्स :BlogFitness Specialhealth