esakal | पाण्यामुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती; जाणून घ्या फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

benefits of drinking water

पाण्यामुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती; जाणून घ्या फायदे

sakal_logo
By
शर्वरी जोशी

आपल्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे पाणी (water). पाण्यामुळे शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीतपणे पार पडत असते. त्यामुळेच पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीराला अनेक पोषकघटकांचा पुरवठा होत असतो. म्हणूनच वेळच्या वेळी पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शरीरातील ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी हायड्रेट होते, शरीर डीटॉक्स (detox) होते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. इतकंच नाही तर पाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते असं म्हटलं जातं. म्हणूनच आपल्या जीवनात व खासकरुन आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचं आहे ते जाणून घेऊयात. (benefits of drinking water)

१. पेशींच्या बांधणीची अखंडता -

केस, त्वचा, नखे यांच्यातील पेशींची बांधणी टिकवून ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि काही प्रमाणात कोलेजनच्या निर्मितीतही पाणी आवश्यक असते. वय वाढल्याच्या खुणा दिसू नयेत यासाठी कोलेजन फार महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे सांध्यांची अखंडता आणि कण्याची मजबुती टिकवण्यासाठीही पाणी हवं आहे. भरपूर पाणी प्यायल्याने त्याचा वंगणासारखा वापर होतो. ज्यामुळे सांध्यांचे घर्षण कमी होते.

२. शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते -

शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रावांचा समतोल राखण्यासाठी पाणी गरजेचं आहे. आपल्या शरीरातील द्रावांचे कार्य योग्य पद्धतीने चालावे यासाठी शरीराचे तापमान योग्य राखणे आवश्यक असते. तसे न झाल्यास अनेक शारीरिक क्रिया बंद पडू शकतात.

३. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते-

आजवरच्या अनेक संशोधनातून हे स्पष्ट झालंय की, पाणी प्यायल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. काही अंशी ते बरोबरदेखील आहे. अधिक पाणी प्यायल्याने वजन कमी झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: तुरटीच्या पाण्यामुळे कोरोना बरा होतो?

४. डीहायड्रेटशनचा त्रास कमी होतो-

तहान लागणे म्हणजे डीहायड्रेशनचं शेवटचं लक्षण आणि त्यामुळेच प्रत्येकाने दिवसभर पाणी पित राहणं गरजेचं असतं. डीहाड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे व त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होणे. या कारणामुळे रोगप्रतिकारशक्तीही मंदावते. अनेकदा मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्याला प्रचंड घाम येतो, त्यामुळे अशा वेळी शरीराला सतत हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. जर शरीर डी हायट्रेड झालं तर पायात किंवा शरीरावरील अन्य भागांमध्ये क्रॅम्प्स किंवा पेटके येतात. यात प्रचंड मेहनत घेणारे अॅथलेट्स आणि बास्केटबॉलपटूंमध्ये हायपरथर्मियाचा त्रास निर्माण झाल्याचं पााहायला मिळतं. पाण्याची कमतरता आणि डीहायड्रेशन झाल्यामुळे रक्तदाबही कमी होतो. अतिसार, पाणी कमी पिणे, पोटाचा फ्लू, अतिरिक्त औषधे, मद्यपान अशा कोणत्याही कारणाने डीहायड्रेशन झाले असेल तर तातडीने पाणी पित राहणं गरजेचं आहे.

५. पचनक्रिया सुरळीत होते -

'पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवणाच्या आधी? की जेवणानंतर? की जेवताना?' असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. परंतु, या तीनही वेळा पाणी प्यायल्यामुळे अन्नपचन अधिक चांगल्या प्रकारे होते. पाणी प्यायल्यामुळे तोंडात लाळ तयार होण्यास मदत मिळते. यातील इलेक्ट्रोलायटस, म्युकस आणि एन्झाइम्स अन्न पचवण्यास मदत करते. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मौखिक आरोग्य चांगले राहते. अन्नाचे पचन तोंडातच सुरू होते आणि वयानुसार लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तोंड कोरडे पडल्यासारखे वाटत असेल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा.

६. डीटॉक्स करण्यातही मदत -

पाण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे डीटॉक्स करणे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढते. दिवसभरात शरीरात अनेक टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक जमा होत असतात, त्यातील काही पर्यावरणातील असतात, काही अन्नातून येतात. डीटॉक्स होण्याची क्रिया मूत्रातून, मलातून आणि घामातून होते. शरीरातील हे अनावश्यक घटक शरीराबाहेर गेल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

सध्या कोविड काळात प्रत्येक जण घरातच आहे. त्यामुळे अनेक जण पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शरीरात कमी पाणी गेल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा मूतखड्याचा त्रास होतो. पाणी कमी पिणाऱ्या लोकांना मूत्रविर्सजनाचा त्रास होतो आणि त्यातून खडे तयार होतात. मूत्र योग्यरितीने द्राव म्हणून बाहेर पडावे यासाठी पुरेसं पाणी प्यायला हवं. मलविसर्जन योग्य रितीने होण्यासाठीही याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे, रक्तातील प्रवाहीपणा कायम राखण्यासाठीही आपण पुरेसं पाणी प्यायला हवं. त्यामुळे पोषक घटक शरीरात सर्वत्र सहज पोहोचतात. यामुळे सक्रियता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतोच. शिवाय, चयापचयही सुधारते. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनोलॉजी अॅण्ड मेटॅबोलझिमने केलेल्या संशोधनानुसार,500 मिली. पाण्यामुळे चयापचय 30 टक्क्यांनी सुधारते.

(डेलनाझ चंदुवाडिया हे जसलोक हॉस्पिटलमध्ये विभाग प्रमुख आणि चीफ कन्सलटंट –डायटेटिक्स आहेत. )