
पुण्यात प्लेटलेटस् मागणी वाढली
पुणे : “रुग्णालयाशी संलग्न रक्तपेढीतील प्लेटलेस् संपल्या. आता बाहेरील रक्तपेढ्यांमधून तातडीने प्लेटलेस् आणा. रुग्णाच्या प्लेटलेस् कमी होत आहेत, असे म्हणत एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेने चिठ्ठी हातावर टेकवही. त्यानंतर सुरू झाली प्लेटलेटस् या रक्त घटकाची शोधाशोध,” रुग्णाचे नातेवाईक अक्षय पोतदार बोलत होते... अक्षय यांचा भाऊ अमोल याचा औषधे घेऊनही अमोलचा ताप उतरत नव्हता. अखेर रक्तचाचण्यातून त्याला डेंगी झाल्याचे निदान झाले. त्याच्या रक्तचाचण्यांचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्याच्या रक्तातील प्लेटलेस् या रक्तघटकाची संख्या कमी होत असल्याचे दिसले. रुग्णालयाशी संलग्न रक्तपेढीत प्लेटलेस् नाहीत. त्यामुळे तुम्ही तातडीने बाहेरील रक्तपेढीत जाऊन प्लेटलेस् घेऊन येण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे अक्षय याने सांगितले. रक्तपेढीत गेल्यानंतर तेथे रक्तगट तपासून लगेच प्लेटलेटस् मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रक्तपेढ्या म्हणतात...
- रुग्णालयाशी संलग्न, सरकारी रुग्णालयांमधील आणि धर्मादाय न्यासाच्या अशा तीनही रक्तपेढ्यांमधून प्लेटलेस् या रक्तघटकाची मागणी वाढली आहे. ससून रुग्णालयात गेल्या जूनमध्ये 10 ते 15 बॅग्ज प्लेटलेस् दरदिवशी लागत होत्या. ही संख्या आता 20 ते 25 पर्यंत वाढली आहे.
- शहरात डेंगीचे रुग्ण वाढत असल्याने प्लेटलेस् मागणीत वाढ झाली असली तरीही प्रत्येक रुग्णाला योग्य प्रमाणात त्या मिळत आहेत. प्लटेलस् मिळाल्या नाही, अशी स्थिती सध्या शहरात नाही.
- देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुढील दोन आठवड्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील महिनाभर प्लेटलेट्चा तुटवडा भासणार नाही, अशी एक अपेक्षाही रक्तपेढ्यांनी रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
- मात्र, या पुढील काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य प्लेटलेस् मागणी पूर्ण करताना दमछाक होण्याची शक्यता जास्त आहे.
- रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या डेंगीच्या रुग्णांच्या प्रमाणापेक्षा प्लेटलेस् लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे.
किती मागणी वाढली?
शहरात मे आणि जूनच्या तुलनेत प्लेटलेस् मागणीमध्ये 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीसारखी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षी रुग्णांना प्लेटलेटस् मिळविण्यासाठी नातेवाइकांची दमछाक होत होती. मागणीच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात प्लेटलेस् मिळत होत्या. त्यामुळे या वर्षी आतापर्यंत खूप मोठी मागणी वाढली नसल्याचेही रक्तपेढ्यांनी स्पष्ट केले.
“प्लेटलेटस् मागणी वाढत असली तरीही रक्तदान शिबिरे सुरू आहेत. रक्तदाते उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मागणी प्रमाणे प्लेटलेस् देणे सध्यातरी शक्य होत आहे. पण, रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत प्लेटलेस् रक्तघटकाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे,”
- डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी
“सध्या शिबिरे होत आहेत. पुढील शिबिरेही नियोजित आहेत. त्यामुळे रुग्णालयातील प्लेटलेस् मागणीप्रमाणे देता येईल. सध्या दररोज 15 ते 16 बॅग्ज प्लेटलेस् मागणी होत आहे. यापूर्वी ही मागणी सात ते आठ बॅग्ज होती. यावरून सध्या प्लेटलेटस् मागणीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसते,”
- डॉ. आनंद चाफेकर, विभाग प्रमुख, रक्तपेढी, केईएम रुग्णालय
“डेंगीच्या प्रत्येक रुग्णाला प्लेटलेस् देण्याची गरज नसते. बहुतांश रुग्ण योग्य औषधोपचाराने बरे होतात. मात्र, काही रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेस् संख्या वेगाने कमी होत असते. अशांना बाहेरून प्लेटलेट् द्याव्या लागतात,”
- डॉ. राहुल प्रभू, वैद्यकीय तज्ज्ञ
Web Title: Health News Demand For Platelets Increased In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..