हॅलो डॉक्‍टर . . . तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना...!

चैतन्य शेंबेकर
मंगळवार, 30 जून 2020

1 जुलै हा दिवस डॉक्‍टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो.
त्या निमित्ताने डॉ. चैतन्य शेंबेकर यांचा हा लेख.

"हॅलो, कौन?'
"मी डॉ. चैतन्य शेंबेकर. मी शांतपणे उत्तर दिले.'
"हा, जरा रूम नं. 14 से अम्मी को बुलाना, कहना बब्बू का फोन है।'
आता हा बब्बू म्हणजे कोणी "भाई' ग्रुपवालाही असू शकतो., असा विचार माझ्या मनात चमकून गेला. मी नम्र आवाजात त्याला म्हटले - "भाईसाहब (यातला भाई हा शब्द मी विचारपूर्वक जाणूनबुजून वापरला होता.) आपने मोबाईल फोन किया है। मै जरा बाहर हूँ। आप हॉस्पिटल के नंबर पर फोन किजीए प्लीज.'

"-- तो हॉस्पिटल का नंबर तो दिजीए.'
आता माझा संयमाचा बांध सुटत चालला होता. परंतु, मला चांगलं ठाऊक होतं, चिडून काहीच उपयोग नाही. आज बब्बू तर उद्या पप्पू आपल्याला फोन करून आपल्या संयमाची परीक्षा पाहणार. मी शांतपणे त्याला हॉस्पिटलचा नंबर सांगितला व मोबाईल बंद केला.

1998 साली मोबाईल फोन बाजारात उपलब्ध झालेत आणि सुरुवातीला आम्ही सगळेच आमच्या आयुष्यातील या नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदित झालो. पण, लवकरच या मोबाईलचा त्रास अनुभवास यायला लागला आणि "असून अडचण नसून खोळंबा' चा अर्थ कळायला लागला.
सुरुवातीला या व अशा प्रकारच्या असंख्य फोन कॉल्सला मला सामोरे जावे लागत असे. आणि हे शब्दांचे मार हसतखेळत सहन करावे लागत असत.

एकदा तर गंमतच झाली. सायंकाळी सात-साडेसातच्या सुमारास ओपीडीमध्ये गर्दी असताना "रामाकोना' या गावाहून मला "मोबाईल' आला. समोरची व्यक्ती माझा जवळचा मित्र असल्यासारखी बोलत होती. म्हणाली, "डॉक्‍टर, माझ्या पत्नीला तुम्हाला दाखवायचं आहे. उद्या सकाळी सहाच्या बसने आम्ही रामाकोन्याहून निघतो आहोत. दुपारपर्यंत पोहोचू. तुम्ही आहात ना?' .
"हां-मै हूँ ना' - मी "शाहरुख' स्टाईल उत्तरलो.

"ठीक, तर डॉक्‍टर उद्या भेटू' इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण, सकाळी पावणेसहाला मी साखरझोपेत असताना पुन्हा मोबाईल खणखणला. पलीकडचा आवाज रामाकोन्याहून होता.
डॉक्‍टर, आम्ही निघतो आहोत.'

मी न चिडता त्याला, "ठीक आहे. या असं म्हटलं. दिवसभराच्या कामात पेशंट आली नाही हे मी विसरून गेलो. दुपारी जेवण आटोपून वामकुक्षी घेत असताना पुन्हा मोबाईल वाजला-
"डॉक्‍टर, कोराडीपर्यंत आलो आहोत. इथे हिची बहीण राहते म्हटलं थांबून जावं. आता निघतोच आहे. यावेळी मात्र मला हसावं का रडावं हेच कळेना. आणि मग त्या प्रकरणाचा क्‍लायमॅक्‍स जवळ आला. मी रात्री दहा वाजता घरी येऊन जेवत असताना पुन्हा त्या रामाकोनावाल्याचा फोन वाजला. तोच चिरपरिचित आवाज. "डॉक्‍टर, मी सेंटर पॉइंटजवळ आलो आहे.' (सेंटर पॉइंटपासून माझा दवाखाना हाकेच्या अंतरावर आहे.) आणि... मी मागचा पुढचा विचार न करता त्या न पाहिलेल्या व्यक्तीला अद्वातद्वा बोललो आणि मोबाईल खाली पटकला.
परिणाम... ते रामाकोन्याचं जोडप सेंटर पॉइंटजवळ आलं, पण माझ्या दवाखान्यात काही आलं नाही. मी एक पेशंट गमावला......-- आणि असले अनुभव तर हळूहळू रूटीन व्हायला लागलेत....

"डॉक्‍टर, वैभवीला न फार उलट्या होताहेत आणि जीवही घाबरतो आहे...'
"बरं, तू असं कर...'
माझं बोलणं मध्येच तोडत तो म्हणतो
"थांबा थांबा डॉक्‍टर, वैभवीशीच बोला मग वैभवी पुन्हा तिला होणारा त्रास रंगवून रंगवून सांगते. मी शांतपणे ऐकून घेतो व तिला औषध कोणतं घ्यायचं याबद्दल सांगणार तोच ती म्हणते-
"थांबा डॉक्‍टर, औषधाचं न ह्यांनाच सांगा- अहो, जरा औषध लिहून घ्या बरं'
मग मी वैभवीच्या ह्यांना औषध सांगणार तोच ओरडतो-"अग ए, जरा वही आणि पेन आण बरं' वैभवी धावत जाते. वही-पेन आणते मग तो खेकसतो-
"वैभवी पेन चालत नाही. काय हे, एकसुद्धा पेन ठीक नसतो. मग स्पेलिंग वरून काही मिनिटे जातात व शेवटी मी सुटलो एकदाचा म्हणून मोबाईल बंद करतो व दुसरा फोन वाजेपर्यंत समोरच्या पेशंटशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो.

कधी कधी मला फोन येतो - "डॉ. मी शिल्पा बोलते आहे'
"कोण शिल्पा? माझ्या आठ पेशंटचं नाव शिल्पा आहे, "असं माझ्या जिभेच्या टोकावर येते. परंतु, मी आवंढा गिळतो व "हं, बोल शिल्पा, काय म्हणतेस?' असं म्हणून बोलायला लागतो. कारणं, मला डॉक्‍टर ओळखत नाही, ही कल्पनाच शिल्पाला सहन होणं शक्‍य नसतं.
काही लोकांना मोबाईलवर, कुठे आहेस? काय करतो आहे? असले प्रश्न विचारण्याची सवय असते. कोणी असं विचारलं की, मला संकोचल्यासारखं, अवघडल्यासारखं होत.
"एकदा माझ्या पेशंटचा फोन आला. "डॉ. माझी नणंद "सिरियस' झाली आहे. तिला ब्लिडींगचा खूप जास्त त्रास होतो आहे.'

"मग-तिला ताबडतोब दवाखान्यात आण."मी उत्तरलो. "नाही डॉक्‍टर, तशी ती ठीक आहे. रविवारी पंचशील टॉकीजमध्ये सिनेमा पाहायला आम्ही येणारच आहोत. म्हटलं तुम्ही भेटाल ना?' तिने लाडिकपणे विचारले. आणि मी या अशा सिरियस' पेशंटचं कसं करावं. या विचारांनी त्रासून गेलो.
काही अतिश्रीमंत व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मोबाईलवर सतत बोलण्याची सवय असते. असे लोक दवाखान्यात आले की, चेंबरच्या समोर उभे राहून फोन करतात.
"डॉक्‍टर, मी बाहेर उभा आहे (उंबरठ्यावर) बस्स आत येतोच आहे.'
मी बिच्चारा त्याचा स्वागतासाठी दाराशी लगबगीने उठून जातो. आणि एकदा माझ्यावर पेशंट बनण्याचा प्रसंग आला. म्हणजे काय की, माझ्या मुलाला ताप होता व माझ्या बालरोगतज्ज्ञ असलेल्या मित्राकडे जाणं जरुरी होतं. मी अगदी सहजपणे त्याला मोबाईल केला व तो चेंबरमध्ये असल्याची खात्री करून घेतली आणि साक्षात्कार झाला. अरे, हे असं चालायचच। डॉक्‍टरांसाठी. जरी तुम्ही अनेक पेशंटमधले एक असलात तरी त्या वेळी, त्या प्रसंगी डॉक्‍टर ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती असते व हे आपण डॉक्‍टर म्हणून समजून घ्यायलाचं हवं.

कोरोना अर्थात कोविड-19 ने मनुष्याच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. या काळात मोबाईल आणि इंटरनेटमुळे आपलं आयुष्य बरच सुखकर झालं. मोबाईल व इंटरनेट नसते तर काय असतं? याची कल्पनादेखील करवत नाही. याच काळात आम्हा डॉक्‍टरांना व आमच्या रुग्णांनादेखील टेलिमेडिसीन व व्हिडिओ कंसल्टेशनचं महत्त्व पटलं. आज या सोयीमुळे रुग्णांना घरबसल्या डॉक्‍टरांच्या सेवेचा लाभ घेता येतो व अनेक प्रश्न चुटकी सरशी सोडवता येतात.आणि आताशा या अविरत वाजणाऱ्या मोबाईलच्या घंटीची सवय व्हायला लागली आहे.
तर असं आहे मोबाईलचं आणि माझं नातं-
तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना...!
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hello doctor...