पाठ दुखतेय? करा हे उपाय

back_pain
back_pain

नागपूर : पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. डोकेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा, तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी खूप बेफिकीर असतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर त्रास जास्त वाढतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ भरते, तर कधी सकाळी झोपेतून उठतानाच पाठीने बंड पुकारल्याचे लक्षात येते.
पाठीला आधार देणारे स्नायू, हाडे, सांधे यांना त्रास झाला की पाठीचा खालचा भाग दुखायला लागतो. हे दुखणे म्हणजे शरीराने दिलेली धोक्याची सूचना असते. ती वेळीच ओळखली तर पुढचा त्रास वाचतो. मात्र अनेकदा या सूचनेलाच दुखणे समजून दुर्लक्ष केले जाते.

पाठदुखी होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. जड ओझे उचलणे, सतत खाली वाकणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे. मात्र या कारणांपेक्षाही कार्यालयातील खुर्चीत तासन्तास एकाच स्थितीत बसण्याची सवय पाठ दुखीसाठी अधिक कारणीभूत ठरते. म्हणजे सहजसाध्य पद्धतीने बदलू शकणारी सवय न बदलल्याने अनेकांना पाठदुखीला सामोरे जावे लागते. वाढलेले वजन, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, शारीरिक काम यामुळे पाठदुखी वाढते.

पाठदुखीसाठी शारीरिक कारणांसोबतच मानसिक कारणेही जबाबदार असतात. मनावरील ताण, रोजच्या आयुष्यातील तणाव हेदेखील पाठदुखीला आमंत्रण देतात. मनाचा आणि पाठीचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र मनावरील ताणामुळे शरीराच्या सर्वच अवयवांवर परिणाम होतो, असे लक्षात आले आहे. कार्यालयातील कामाचा ताण, अस्वस्थता यामुळे पाठदुखी होत असेल तर शरीरासोबत मनाचेही आरोग्य जपणे गरजेचे आहे.

पाठदुखी होण्यामागे काही वेळा गंभीर कारणेही असतात. मणक्याला फ्रॅक्चर झाल्यास, स्लिप डिस्क, संधिवात, सांधेदुखी, मणक्यांमध्ये गाठ आल्यास, मूतखडे यामुळेही पाठदुखी होऊ शकते. ओटीपोटात सूज आल्याने स्त्रियांना पाठदुखी होते. अशा गंभीर कारणांवेळी थेट डॉक्टरकडे जायला हवे. मात्र रोजच्या चुकीच्या सवयींमुळे पाठीचा खालचा भाग दुखत असेल तर घरच्या घरी उपाय करता येतात. मात्र वेळीच उपचार केले नाहीत आणि हे दुखणे मांडय़ा, पाय, पावले येथपर्यंत पोहोचले की वैद्यकीय उपचारांची गरज पडते. मात्र एक्स रे, सीटी स्कॅन, महागडे उपचार येथपर्यंत पोहोचायचे नसेल तर काही अयोग्य सवयी जरूर बदला.

पाठदुखीची कारणे
*बसण्याची स्थिती- खूर्चीत बसताना शरीराचे वजन पाठीवर येते. कंबरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठदुखी नक्की होते.
*मोटारसायकल – दुचाकी चालवताना पाठीला कोणताही आधार नसतो. रोज लांबचा प्रवास करणाऱ्या तसेच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी हाकणाऱ्यांना हमखास पाठदुखी सतावते.
* वाकून उभे राहण्याची सवय पाठदुखीला निमंत्रण देते.
* अयोग्यपणे जड वस्तू उचलल्याने, ढोपरात न वाकता वस्तू उचलल्यामुळे, पाठीवर भार आल्याने.
* अयोग्य गादीवर आखडलेल्या स्थितीत झोपल्याने
*अपघात- कारला झालेला अपघात, घसरून पडल्यामुळे मणक्याला इजा होते, पाठ सुजते.
*सांधेदुखी – सांध्याना संरक्षण देणारे कार्टलेिजचे आवरण वयोमानानुसार झिजते. त्यामुळे उतारवयात मणका दुखायला लागतो.
*हाडे ठिसूळ होणे – बहुतांश स्त्रियांना उतारवयात हाडे ठिसूळ होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हात, पाय यासोबत पाठदुखीही यामुळे होते.
*मानसिक – शरीरासोबतच मनावरील ताण-तणाव अनेक आजारांना निमंत्रण देतात. निराशा, अस्वस्थता, असमाधान यामुळेही पाठदुखी होऊ शकते.

पाठदुखीत भर घालणारे घटक
वाढलेले वजन, वृद्धापकाळ, महिला, अवजड वस्तू उचलण्याचे काम, तणावपूर्ण काम, निराशा.

प्रतिबंधात्मक उपाय
* वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.
* एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. ठरावीक वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या.
* टेबलावर कोपरे ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा.
* गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा,
* झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.
* आखडलेल्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेला आधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा.
* पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा.

पाठ दुखीवर सोपे घरगुती उपाय
पाठ दुखीचा त्रास होत असल्यास रोज झोपताना नारळाच्या अथवा मोहरीच्या तेलाने मालिश करा. यामध्ये चार-पाच लसूण पाकळ्या टाकून ते तेल गरम करून थंड झाल्यानंतर पाठीला मालिश केल्याने वेदना कमी होतात. हे तेल लावल्यानंतर अर्ध्या तासांनी अंघोळ करावी.

योगासन हा पाठ दुखीवरील उत्तम उपाय आहे. त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन ही योगासने रोज करा. यामुळे दंडाचे स्नायू, पायांचे स्नायू, ओटीपोटीचे स्नायू यांची कार्यक्षमता वाढते. पाठीचा कणा लवचिक बनतो आणि पाठदुखी नाहीशी होते.

पाठ दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकुन आंघोळ करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. पाठ दुखीपासून आराम मिळतो.

पाठ दुखीसाठी आहार देखील महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या आहारात चार ते पाच चमचे साजूक तूप, दूध, डिंक, उडीद अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

बसताना कुबड काढून न बसू नये. एका ठिकाणी एक दीड तासापेक्षा जास्त वेळ बसू नका. अधून मधून थोडे चालणे उत्तम. नियमित व्यायाम, योग्य आहार व पुरेशी झोप ही त्रिसूत्री पाठ दुखीपासून दूर ठेवते.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com