वाढते वजन आणि हृद्यरोग!

डॉ. झाकिया खान
Monday, 6 January 2020

हृदयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर वजन योग्य प्रमाणात राखणे हा हृदयाचे आरोग्य जपण्याच्या बाबतीतला महत्त्वाचा घटक आहे.

आपले वजन नियंत्रणात ठेवणे हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ताणतणाव म्हणजे हायपरटेन्शन, हृदयरोग, श्‍वसनक्रियेशी संबंधित अडचणी, पित्ताशयातील खडे, डायबिटीस आदी आजार उद्‌भवण्याची शक्‍यता असते. हृदयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर वजन योग्य प्रमाणात राखणे हा हृदयाचे आरोग्य जपण्याच्या बाबतीतला महत्त्वाचा घटक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध अहवालांतील आकडेवारीनुसार आपल्या आदर्श वजनामध्ये २० टक्केहून अधिक वाढ झाल्यास हृदयरोगाचा धोका वाढण्याची शक्‍यता असते. विशेषत: पोटाच्या भागात चरबीचे प्रमाण जास्त असल्यास हा धोका अधिक असतो. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या मते तुम्हाला अशाप्रकारचा कोणताही त्रास नसला तरीही केवळ लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका कैकपटींनी वाढतो. एखाद्या व्यक्तीच्या वजनामध्ये वाढ होण्यासाठी कुटुंबातील लठ्ठपणाचा पूर्वेतिहास, जनुकीय वारसा, परिसर, चयापचय क्षमता, सवयी आणि वर्तणुकी असे अनेक घटक कारणीभूत ठरत असतात. हृदयरोगाला कारणीभूत ठरणारी काही कारणे आपण बदलू शकत नाही हे खरे असले, तरीही जीवनशैलीशी निगडित सवयी बदलणे मात्र आपल्याला नक्कीच शक्‍य आहे.

या आजाराचा आपल्या लोकसंख्येवर नेमका किती भार आहे हे थोडे तपशिलात समजून घेऊ या. लॅन्सेटच्या अभ्यासानुसार १९९० मध्ये कार्डिओव्हॅस्क्‍युलर म्हणजे हृदय व धमन्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण २५.७ दशलक्ष इतके होते, जे २०१६ मध्ये ५४.५ दशलक्षांवर गेले. २०१६ मध्ये या कार्डिओव्हॅस्क्‍युलर आजारांचे प्रमाण सर्वाधिक आढळलेल्या राज्यांमध्ये केरळ, पंजाब आणि तमिळनाडू यांचा समावेश होता; तर त्याखालोखाल आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गोवा आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये हृदयरोगाचे सर्वाधिक रुग्ण  आढळून आले.

या वर्षीच्या जागतिक हृदय दिनाचे सूत्र आहे ‘माय हार्ट, युअर हार्ट’ ज्यामध्ये हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याचे वचन स्वत:ला, आपल्या कुटुंबाला आणि समाजाला देण्याचे वचन अध्यहृत आहे. आपण हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी अधिक चांगली जीवनशैली अंगीकारण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेऊ या. 

लठ्ठपणा आणि हृदयातील नाते
‘ओव्हरवेट’ असणे किंवा शरीराचे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा जास्त असणे याचा अर्थ स्नायू, चरबी आणि हाडे यांचे अतिरिक्त वजन असा आहे. म्हणूनच आपण आपल्या लठ्ठपणाचे मूल्यमापन/ मोजणी ‘बॉडी मास इंडेक्‍स’च्या (BMI) नियमित तपासणीद्वारे करायला हवी. लठ्ठ व्यक्तीच्या हृदयाच्या कार्याशी संबंधित गरजा अधिक असतात. त्यांच्या शरीराला रक्ताभिसरणाची क्रिया खूप मोठ्या प्रमाणात करावी लागते. कालांतराने काही व्यक्तींच्या हृदयाला ही गरज भरून काढता येत नाही आणि हळूहळू शरीरभर रक्तपुरवठा करण्याचे त्याचे काम मंदावू लागते. अशाप्रकारे हृदयावर अतिताण आल्यास हृदय निकामी होऊ शकते.

आपले आदर्श वजन राखण्यासाठी काही टिप्स : तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासामधल्या कोणत्याही टप्प्यावर असलात तरीही शरीराचे वजन आदर्श प्रमाणात राखण्याचे काम कठीण असते, पण काही विशिष्ट प्रकारचे अन्न हृदयरोगाच्या धोक्‍यामध्ये भर टाकू शकते या गोष्टीची तुम्हाला कल्पना असेलच. वर्षानुवर्ष निकस अन्न खाण्याची सवय सोडण्याची आस असो किंवा आपल्या आहाराच्या पद्धती अधिक परिपूर्ण बनवण्याची धडपड असो, प्रत्येक वेळी ‘कोणते अन्न खायला हवे’, ‘किती वेळा खायला हवे’ आणि ‘काय खाण्यावर बंधने आणायला हवीत’ हे तुम्हाला माहीत हवे. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्यायाम करणे. कारण व्यायामामुळे तुम्ही तुमच्या शरीराची तंदुरुस्ती राखू शकता व वजन कमी करू शकता. तेव्हा जमला तर व्यायाम करू हा दृष्टिकोन कधीही बाळगता कामा नये. आहार आणि व्यायाम यांचा योग्य समतोल साधणे एकदा का जमले, की निरोगी हृदयाच्या साथीने पुढील वाटचाल करण्याच्या दिशेने तुम्ही सज्ज झालात असे समजायला हरकत नाही. 

डॉ. झाकिया खानः कार्डिओलॉजिस्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased weight and heart disease