
योग साधना करताना येणारी अनेक विघ्ने व त्यांच्या लक्षणांची बाधा साधकाला होऊ नये, यासाठी पतंजली अजून एक मार्ग सांगत आहेत.
योग- जीवन : विषयवती प्रवृत्ती
- किशोर विष्णू आंबेकर, अय्यंगार योग शिक्षक
योग साधना करताना येणारी अनेक विघ्ने व त्यांच्या लक्षणांची बाधा साधकाला होऊ नये, यासाठी पतंजली अजून एक मार्ग सांगत आहेत.
विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसः स्थितिनिबंधनी ll समाधिपाद सूत्र- ३५ ll
अर्थात, दीर्घ अभ्यासाने विषयवती प्रवृत्ती उत्पन्न केली तर मन स्थिर होते.
कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ह्या ज्ञानेंद्रियांमार्फत अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या विषयांचा उपभोग आपण घेत असतो. असा उपभोग घडताना चित्त विषयांच्या संगतीने तदाकार होते. त्याचा चित्तावर संस्कार होतो त्यातून विषयसुखाची आसक्ती निर्माण होते. प्रत्येक सुखाचा परिणाम अनेक प्रकारे दुःखालाच कारणीभूत ठरत असतो. म्हणून ज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयांकडे जाऊ न देता अंतर्मुख करणे (प्रत्याहार) आवश्यक असते.
विशिष्ट ज्ञानेंद्रियांवर धारणा करून, पूर्वी घडलेल्या विषयोपभोगाची स्मृती जागृत करणे आणि त्या संवेदनांचा अनुभव घेणे म्हणजे विषयवती प्रवृत्ती उत्पन्न करणे होय. धारणा म्हणजे अशा ज्ञानेंद्रियावर एकाग्र अवधान आणि सखोल विचाराधीनता होय. विशिष्ट आलंबनावर धारणा केल्यास विशिष्ट प्रवृत्ती उत्पन्न होतात. उदा.
1) नासिकेवर धारणा केल्यास, पूर्वी घडलेल्या गंधाविषयीच्या संस्कारावर स्मृतिशक्तीच्या साहाय्याने, चित्ताची एकतानता राखल्याने, बाह्य गंधविषय नसताही गंधाचा प्रत्यय येतो. ही गंधविषयवती प्रवृत्ती होय. हा दिव्यगंध होय.
2) जिभेच्या अग्रावर धारणा केल्यास पूर्वी घडलेल्या रसाविषयी संस्कारावर, स्मृतिशक्तीच्या साहाय्याने चित्ताची एकतानता राखल्याने, बाह्य रसाविषय नसताही रसाचा प्रत्यय येतो. ही रसविषयवती प्रवृत्ती होय. हा दिव्य रस होय.
ह्या अभ्यासाचा अंतर्भाव आसन- प्राणायाम शिकताना, सराव करताना आणि शिकवताना करणे शक्य असते.
विषयवती प्रवृत्ती ही सिद्धी आहे, जी साधकासाठी खूप महत्त्वाची आहे. दिव्यगंध आणि दिव्यरस यांचा प्रत्यय आल्यावर बाह्य विषयांची आसक्ती सहजच नाहीशी होऊन वैराग्य दृढ होते. योगशास्त्राविषयी अनुभवजन्य श्रद्धा उत्पन्न होते. त्यामुळे अभ्यास जास्त उत्साहाने केला जातो. हा उत्साह, म्हणजे वीर्य त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. त्यामागून स्मृती आणि समाधी प्रज्ञा यांचा त्यास लाभ होतो. त्यामुळे अनेक अंतराय व त्यांचे सहचर यांची साधकाला बाधा होत नाही. योगशास्त्राने, सद्गुरूंनी फलश्रुतीसंबंधी अनेक गोष्टी सांगितलेल्या असतील, पण जोपर्यंत आपल्याला त्याची थोडीसुद्धा अनुभूती येत नाही, तोपर्यंत खरी श्रद्धा उत्पन्न होत नाही.
या विषयाचे विस्तृत वर्णन प्रशांत अय्यंगार यांच्या व्यासभाष्यावरील टीका ग्रंथात आलेले आहे.
त्र्यंग-मुखैकपाद पश्चिमोत्तानासन
दंडासनात बसा.
उजवा पाय विरासनात वाकवा. उजव्या पोटरीची आतली बाजू उजव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला स्पर्शून राहील.
डावा पाय सरळ दंडासनात ठेवून उजव्या गुडघ्यावर शरीराचा भार टाकून तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा.
दोन्ही हात लांब करून कमरेतून पुढे वाका व डावे पाऊल पकडा.
धड वाकवलेल्या पायाच्या बाजूला झुकलेले असावे.
श्वास सोडत धड वाकवा आणि पोट, छाती व हनुवटी अनुक्रमे मांडी, गुडघा व नडगी या भागांवर टेकवा.
या अंतिम स्थितीत ३० ते ६० सेकंद थांबा.
हेच आसन दुसऱ्या बाजूला करा.
फायदे...
घोट्यातील आणि गुडघ्यातील लचक बरे होते.
तळपाय सपाट असल्यास किंवा कमानी कोसळलेल्या असल्यास त्यावर इलाज होतो.
पोटातील अवयव सुदृढ बनतात. पचनक्रिया सुधारते.